शीर्षक:- कानमंत्र
भाग:-१
"सकाळपासून रात्री झोपेपर्यंत राब राब राबा, वरून यांची बोलणी खा. कितीही काम केले तरी कदरच नाही कुणालाच. मोलकरीण सारखं राबायचे नुसते." सायली किचन ओटा आवरत कुरकुरली.
"ए बास कर तुझं रडगाणं.. रोज रोज तेच ते ऐकून कान विटलेत माझे. ऑफिसमध्ये त्या बाॅसची कटकट आणि घरी आलं की तुझं कुरकुर. दोन मिनिटं डोक्याला शांतता नाही माझ्या. " सायलीचा नवरा प्रमोदही कपाळावर दोन बोटे दाबत चिडचिड करत तिच्यावर खेकसला.
"ते ऑफिसचं पुराण मला सांगू नका. तिथलं तिथं ठेवा. जगात काय कोणी नोकरी करत नाही का? जे तुम्ही एवढे चिडचिड करताय." ती ही चिडून नाकपुड्या फुगवत म्हणाली.
"ए बाई, जरा शांत बस की. सांगितलेले समजत नाही का तुला?" तो ही दात ओठ खात म्हणाला.
"का बरं शांत बसू? हा, सांगा ना का बरं? तुम्ही बोलता ते चालत आणि मी बोलले की लगेच तुम्हाला झोंबत, नाही का? " ती भांडी आपटत म्हणाली.
"अगं ए, काही अक्कल आहे का नाही तुला? भांडी का आदळत आहेस? माझा राग त्या भांड्यावर का काढतेस? " तो तिचा दंड आवळत रागाने म्हणाला.
त्याच्याकडे रागाने पाहत ती दंड सोडवून घेत त्वेषाने म्हणाली," मग काय करू तरी काय शकते मी या शिवाय? मी बीन अकलीची आहे ना, नाही समजत मला काही."
"तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. मी जातो इथून. नसती कटकट नकोय मला." असे म्हणत तो पाय आपटत तिथून निघून गेला.
"हो, जा ना जा, त्या शिवाय काही येत का तुम्हाला? जेव्हा बघावं तेव्हा हेच करता तुम्ही." जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत हातवारे करत मोठ्याने म्हणाली.
तो मात्र तिच्याकडे एकदाही न बघता तसेच निघून गेला. या गोष्टीने तिच्या रागात आणखी भर पडली. त्याचा सगळा राग तिने भांड्यांवर काढला. आदळ आपट करत तिने रागात बडबडत किचन आवरलं आणि तीही झोपायला निघून गेली.
बेडरूममध्ये तिला पाहून मोबाईल बघणारा प्रमोद कुस वळवून झोपला. तिनेही पदराला झटका देत नाक तोंड मुरडत पाठ फिरवून झोपी गेली.
सायली आणि प्रमोद यांच दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. नवीन नवीन सगळं छान सुरळीत चालू होतं. नव्याची नवलाई संपली, तशी छोट्या छोट्या गोष्टीवरून त्या दोघांत नेहमी खटके उडू लागले. अगदी शुल्लक कारणावरूनही त्या दोघांत वाद होई. दोघेही माघार घेत नसायचे. कधी कधी वाद फारच चिघळला जायचा. तेव्हा तर फक्त हमरीतुमरीवरून प्रमोद हात उचलता उचलता राहायचा.
एकदा रोजच्या प्रमाणे प्रमोद ऑफिसमधून घरी आला. त्याला यायला नेहमीपेक्षा जास्त उशीर झाला होता. ती वाट पाहत बसली होती. पण तिच्या चेहऱ्यावर वैताग स्पष्ट दिसत होता.
"सायली, पटकन जेवायला वाढ. खूप भूक लागली आहे. मी फ्रेश होऊन लगेच येतो." तोही खूप दमला होता, गळ्यातील टाय सैल करत तो सायलीला म्हणाला.
ती वैतागत उठली आणि किचनमधून जेवणं गरम करून ताटात वाढून डायनिंग टेबलावर ठेवलं. पाण्याचा तांब्या आणि सोबत ग्लास ठेवला.
तो फ्रेश होऊन आला आणि जेवणं करू लागला. काही वेळ गेला असेल तोच सायलीने तोंड उघडले.
क्रमशः
मिटेल का यांचे भांडण की आणखी विकोपाला जाईल जाणून घेऊया पुढील भागात..
जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा