चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
जलदलेखन कथा
कानपिचक्या
भाग १
भाग १
©® सौ.हेमा पाटील.
"वहिनी, आईच्या बेडवरचे बेडशीट बदल ना! किती खराब झाले आहे."
" दोन दिवस तर झालेत बदलून. दर दोन दिवसांनी बदलायचे म्हटले तर अवघड आहे."
"अगं, किती जीर्ण झाले आहे . कसे दिसतेय ते. मी येईन तेव्हा कायम तेच दिसते मला. घरात बेडशीट नाहीत का?"
"आहेत. बदलते." असे फणकाऱ्याने बोलून निशा वहिनी आत निघून गेली.
आपण काय चुकीचे बोललो हे स्नेहाला समजेना. वहिनीला कशाचा राग आला? या विचारात ती पडली. तेवढ्यात निशा वहिनी दुसरे, जरा बरे बेडशीट घेऊन आली व तिने बेडवरचे बेडशीट बदलले. तिच्या देहबोलीवरून समजत होते की ती खूप चिडली आहे. आता आपण अधिक काही न बोलणेच योग्य असा स्नेहाने विचार केला व ती शांतपणे उभी राहिली. बेडशीट बदलून निशा निघून गेली.
आज पहाटेच स्नेहा बेंगळुरूहून आली होती. रात्रभर प्रवास केला होता, पण आल्यावर आईने मिठीत घेतले होते, त्यामुळे सगळा शीण दूर झाला होता. झोपण्याऐवजी ती आईशी गप्पा मारत बसली. त्यानंतर तिने एक डुलकी काढली. ती उठली तेव्हा आई आंघोळीला गेली होती. तिने खोलीमध्ये इकडेतिकडे नजर फिरवली. पूर्वीसारखीच खोली होती.
तिचे बेडशीटकडे लक्ष गेले आणि ती चमकली. चार महिन्यापूर्वी आपण आलो होतो तेव्हा सुद्धा हेच बेडशीट गादीवर घातलेले होते.आई आंघोळ करून आल्यावर तिने आईला विचारले,
"हे बेडशीट तुला इतके प्रिय आहे का, की बदलू पण देत नाहीस कुणाला?" आई म्हणाली,
" असे काही नाही गं. तेच पुन्हा आले असेल म्हणून तुला तसे वाटतेय." आईने नजर चुकवली हे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने वहिनीला बेडशीट बदलायला सांगितले होते.
ब्रेकफास्ट,चहा घेऊन झाल्यावर स्नेहा आईला घेऊन घराबाहेर पडली. "दुपारी आम्ही दोघी जेवायला नसू." असे तिने निशाला सांगितले.
" तुला काय खावेसे वाटते? सांग. आधी आपण थोडे काहीतरी खाऊन घेऊ. मग सगळी खरेदी झाली की जेवण करू. बोल काय खायचे?"
"माझे काय गं. तू माहेरी आली आहेस. तुला काय खावेसे वाटते सांग.
तुला ढोकळा आणि प्रदीपचा समोसा आवडतो ना? आपण तोच खाऊया."
तुला ढोकळा आणि प्रदीपचा समोसा आवडतो ना? आपण तोच खाऊया."
"आई, मी तुला विचारतेय तर तू माझ्या आवडीनिवडी काय सांगतेस? मला माहीत आहे, तुला मिसळ आवडते. आपण मिसळच खाऊया."
" नको नको मिसळ. मिसळ खाल्ली की आताशा पोट बिघडते. त्याऐवजी पुरी भाजी किंवा उपमा खाऊया."
"बाहेर येऊन उपमा खायचा? हाऊ बोअरिंग! चल मुकाट्याने भैरवनाथची झणझणीत मिसळ खायला." आईचा काही तरूणोपाय चालला नाही. स्नेहाने मिसळ मागवली. आई घाबरत घाबरत मिसळ खातेय हे स्नेहाच्या लक्षात आले.
तिने आईला विचारले,
"तू कसल्या टेन्शनमध्ये आहेस का? अशी चाखत-माखत का मिसळ खातेस?"
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
यावर आईने काय उत्तर दिले? आईला कसले टेन्शन होते? ते पुढच्या भागात पाहू या.