चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
जलदलेखन कथा
जलदलेखन कथा
कानपिचक्या
भाग २
भाग २
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, स्नेहा बेंगळुरूरहून माहेरी आली आहे. आईला घेऊन ती खरेदीसाठी बाहेर पडली आहे. आईला चाखत-माखत मिसळ खाताना पाहून स्नेहाला प्रश्न पडला आहे. आता पुढे.
"कसल्या टेन्शनमध्ये आहेस गं?" स्नेहाने विचारले.
"अगं, आता पूर्वीसारखे पचत नाही. कधी कधी पोट बिघडते. म्हणून मी खात नाही फारसे. आता बाहेर पण येत नाही मी. तू कधी आलीस तरच."
"मिसळ किती आवडते तुला, मला माहीत आहे. कधीतरी खाल्ली तर काही बिघडत नाही." तिने एवढे सांगितले तरीही आईच्या खाण्यात फरक पडला नाही हे स्नेहाच्या लक्षात आले.
आईला काय हवे आहे, काय गरजेचे आहे त्या सगळ्या सामानाची तिने खरेदी केली. "च्यवनप्राश घरात आहे का?" यावर आई नाही म्हणाली.
तिने एक किलोचा च्यवनप्राशचा डबा घेतला. यासोबतच काजू, बदाम, अक्रोड ,काळे मनुके, खारीक पावडर घेतली. राजगिऱ्याची चिक्की घेतली. आईला आवडतात म्हणून मोतीचुराचे लाडू घेतले.
तिने एक किलोचा च्यवनप्राशचा डबा घेतला. यासोबतच काजू, बदाम, अक्रोड ,काळे मनुके, खारीक पावडर घेतली. राजगिऱ्याची चिक्की घेतली. आईला आवडतात म्हणून मोतीचुराचे लाडू घेतले.
दोघी जेवायला 'सुकृत' मध्ये आल्या. आईला आवडते म्हणून तिने कोळंबी स्पेशल, भरला पापलेट आणि तिसऱ्याचे कालवण व जोडीला तांदळाची भाकरी अशी ऑर्डर दिली. जेवताना आई अधाशासारखी मासे खातेय हे तिच्या लक्षात आले म्हणून तिने स्वतःला अगदी नावाला थोडेसे घेतले होते. आईला मनसोक्तपणे जेवताना पाहून तिचे पोट भरले होते.
घरी जाताना ती आईला मच्छी मार्केटमध्ये घेऊन आली. तिथे तिने ओले बोंबील, कोळंबी, आणि सुरमई घेतली. आई नको नको म्हणत होती, पण तिने आईचे ऐकले नाही.
"निशा मासे बनवायचे म्हटले की वैतागते गं. नको घेऊस." आई म्हणाली.
"तिने नाही बनवले तर मी बनवेन. तू कशाला काळजी करतेस? मलाही बनवायला येतात मासे. विसरलीस का तू?" यावर आई काहीच बोलली नाही.
दोघी घरी आल्या तेव्हा निशा तिच्या रूममध्ये होती. ती झोपली असेल म्हणून स्नेहाने तिला आवाज दिला नाही. स्वयंपाकघरात जाऊन तिने स्वतः मासे स्वच्छ करून त्यांना हळद, मीठ, चिंचेचा कोळ लावून ठेवले व मग ती बाहेर आली.
आणलेले सामान तिने आईच्या रूममध्येच ठेवले. दोघीजणी थोडावेळ विश्रांती घेण्यासाठी आडव्या झाल्या. चार वाजता मोठमोठ्याने बोलण्याच्या आवाजाने स्नेहाला जाग आली. निशा तावातावाने काहीतरी बोलत होती हे तिला समजले. शेजारी आई नव्हती, याचा अर्थ ती आईला काहीतरी बोलत होती.
स्नेहा उठून स्वयंपाकघराकडे निघाली तेव्हा तिच्या कानावर शब्द पडले,
"एवढे वय झाले तरी चमचमीत खायची हौस काही जात नाही. या वयात तरी जीभेवर लगाम हवा. काम ना धाम, खायला कार आणि भुईला भार. सगळे निस्तरायला लागते आम्हांला."
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
निशाचे बरोबर आहे का? वय झाले की खाण्यापिण्याच्या सवयी बदलायला हव्यात. पण आवडणारी गोष्ट कटाक्षाने टाळलीच पाहिजे का? कधीतरी षटामासी आस्वाद घ्यायला काय हरकत आहे? डायबिटीस, ब्लडप्रेशर याचा विचार करून जेवणावर कंट्रोल ठेवले पाहिजे. पण मनाचे काय? मनाची निवृत्ती झाली नसेल तर मात्र आतल्या आत कुचंबणा होते. पाहूया पुढील भागात काय होते ते...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा