चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदलेखन कथा
कानपिचक्या
भाग ३
©® सौ.हेमा पाटील.
भाग ३
©® सौ.हेमा पाटील.
स्नेहा स्वयंपाकघरात शिरलेली पाहून निशाने आपल्या तोंडाला कुलूप घातले. समोर आई अपराधी चेहऱ्याने उभी होती.
"काय झाले वहिनी? का मोठमोठ्याने बोलत होतीस? मासे आणलेले आवडले नाही का तुला? मासे मी आणलेत. तू आईला का बोलतेस?"
"मी पनीर आणले होते. संध्याकाळी पनीर मसाला बनवायचा बेत होता." निशा म्हणाली.
"पनीर रहाते फ्रिजमध्ये. मासे आज बनवू."
"किती वेळ जातो मासे बनवण्यात. मला जरा बाहेर जायचेय."
"तू जा बिनधास्त. मी बनवेन मासे." स्नेहा म्हणाली.
पडत्या फळाची आज्ञा घेऊन निशा चहा बनवून तिथून बाहेर पडली. स्नेहाने मासे बनवले. आईला वाईट वाटत होते, मुलगी चार दिवस माहेरी आली तरी तिलाच बनवावे लागले. स्नेहा मात्र असा विचार करत नव्हती. खरं तर आईसाठी तिने मासे आणले होते.
रात्री जेवायला बसताना मात्र ताटे करायला निशा पुढे झाली. सर्वांची ताटे करून तिने सर्वांसमोर ठेवली. आईच्या ताटात तिने एक बारकासा सुरमईचा तुकडा दिला होता व कालवण. कोळंबी तर वाढलीच नव्हती.
हे पाहून स्नेहाला राग आला. ती म्हणाली,
हे पाहून स्नेहाला राग आला. ती म्हणाली,
"हे काय गं! आईला तर कोळंबी वाढायलाच विसरलीस."
"विसरले नाही. मुद्दामच दिली नाही. अलीकडे त्यांना त्रास होतो."
आईने चेहरा पाडला होता. ते पाहून स्नेहाला गलबलून आले. ताटावर बसलेला सुजीत आपल्या बायकोला काहीच बोलत नाही हे पाहून स्नेहाने ताटावरून उठून स्वतः तिला कोळंबी वाढली. ते पाहून निशाला राग आला. ती म्हणाली,
" अहो नका वाढू त्यांना. मी काय सांगतेय, त्यांना त्रास होतो."
" मी चार-आठ दिवस आहे इथे. तिला काही त्रास झाला तर बघते मी. तिला खूप आवडते कोळंबी. खरं तर तिच्यासाठीच आणलीय मी कोळंबी, अन् तिनेच खायची नाही?"
यावर निशा म्हणाली,
"तुम्ही चार दिवस येणार, खाऊ घालणार आणि निघून जाणार. नंतर आम्हालाच सगळे निस्तरायला लागते." निशा म्हणाली.
"आईची तब्येत तर ठणठणीत आहे. ना तिला बीपी, ना डायबिटीस. तरीही वय झाले म्हणून कंट्रोल ठेवावे, पण इतके? मासे आरोग्यासाठी हितकर असतात. हं, तळलेले पदार्थ, चिप्स, बेकरी प्राॅडक्ट नको खायला, पण आहार चौरस हवा. उलट या वयात त्याची अधिक गरज आहे." स्नेहा म्हणाली.
"कोळंबी पचायला जड असते." निशा काही आपला हेका सोडायला तयार नव्हती. आई खाली मान घालून पुढ्यात आलेले पदार्थ खात होती. तिला वाईट वाटेल म्हणून स्नेहा गप्प बसली.
स्नेहा वर्षातून दोनदा माहेरी येत असे. निशाच्या भावाचे मध्यंतरी लग्न झाले होते. इतक्या लांबून येणे स्नेहाला शक्य झाले नव्हते. त्यांच्यासाठी तिने आत्ता येताना आठवणीने आहेर आणला होता. "त्यांना भेटायला कधी जाऊया?" असे तिने निशाला विचारले.
माहेरी जायचे आहे म्हटले की तिची कळी खुलली. तिने लगेच आईला फोन करून विचारले.
"उद्या रात्री सगळेजण जेवायलाच या." असे निशाच्या आईने सांगितले.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
सगळे जातात का तिकडे जेवायला? तिथे कशी वागणूक मिळते स्नेहाला? हे जाणून घेण्यासाठी पुढील भागाकडे वळूया.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा