चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदलेखन कथा
जलदलेखन कथा
कानपिचक्या
भाग ४
भाग ४
©® सौ.हेमा पाटील.
संध्याकाळी सुजीत कामावरून आल्यावर सगळे निशाच्या माहेरी निघाले. छोटू तर मामाकडे जायचे म्हणून खुश झाला होता. तिथे गेल्यावर सर्वांनी औपचारिक विचारपूस केली. निशाच्या नव्या वहिनीची ओळख करून देण्यात आली. गप्पा मारण्यात एक तास निघून गेला.
जेवायला ताटे करण्यात आली. सर्वांनाच एकदम जेवायला वाढून घेतले होते. पुरणपोळीचा बेत होता. ताटे होतील तशी सगळ्यांच्या पुढ्यात ठेवली जात होती. सगळ्यांची ताटे पोहोच झाली. आता जेवायला सुरुवात करणार तोच निशाला सासुबाईंच्या पुढ्यात दोन पोळ्या दिसल्या. तिने लगबगीने उठून त्यांच्या ताटातील दिड पोळी काढून घेतली व ताटाला फक्त अर्धी पुरणपोळी ठेवली. आईचा चेहरा झर्रकन उतरला हे स्नेहाच्या लक्षात आले. पण, पाहुण्यांच्या घरी, तेही निशाच्या माहेरी काय बोलणार? म्हणून ती गप्प बसली. तिने आपल्या पुढ्यातील एक पुरणपोळी काढून ठेवली.
निशाचा पराक्रम तिच्या आईने पाहिला होता. त्यांनी स्वतः पुढे जाऊन अजून एक पोळी त्यांना वाढली.
"पोटभर जेवा हो विहिणबाई." असे त्या म्हणाल्या.
"अगं आई, पुन्हा कशाला पोळी वाढलीस त्यांना? या वयात कमीच खावे."
"कमी? पोटाला भूक असेल तेवढे तरी खाल्लेच पाहिजे ना. त्यांना कळत नाही का, आपण किती खाल्ले पाहिजे ते. पोटाला तडस लागेपर्यंत तर नक्कीच खाणार नाही कुणी. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहानच आहेत त्या. मी स्वतः अजून दोन पुरणपोळ्या खाते."
मग मात्र स्नेहाने मध्ये तोंड घातले. ती म्हणाली,
"अहो, काल तर वहिनीने आईला चक्क कोळंबी वाढलीच नाही. मी तिला आवडते म्हणून आवर्जून आणली होती."
" निशा, काय ऐकतेय मी हे? पाठीवर मारावे पण पोटावर कधीच मारू नये." निशाची आई म्हणाली.
" अगं, त्यांना पचत नाही, त्रास होतो म्हणून मी टाळते." निशा म्हणाली.
"त्यांना त्रास होतो हे तू कसे ठरवलेस? काही सर्व्हे केला आहेस का?" निशाच्या आई म्हणाल्या.
"अगं, वय झाले की चमचमीत पदार्थ टाळावेत." निशा अजूनही आपल्या मतावर ठाम होती.
" चमचमीत? पुरणपोळी, मासे चमचमीत आहेत?" निशाच्या आईने आश्चर्याने विचारले.
"अगं, त्या नुसतं बसून असतात. मग खाल्लेले पचायचे कसे?" निशा मान्य करायला तयार नव्हती.
"आई रोज चार-पाच किलोमीटर चालायला जाते. तिची रूम तीच आवरते. फक्त बेडशीट बदलायला तिला जमत नाही." स्नेहा म्हणाली.
"किचनमध्ये मदतीला जायचीही माझी इच्छा असते, पण मला निशा येऊ देत नाही. मग काय करायचे? आता तुम्ही सुनबाईंना मदत करतच होता ना? आपण इतकी वर्षे स्वयंपाक करत होतो. वय झाले म्हणून सवयी विसरतात का?" आता मात्र सासुबाईंनी आपले तोंड उघडले.
"निशा, माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू असे वागशील असे वाटले नव्हते. एक तर दोन वर्षांपूर्वी तुझे सासरे देवाघरी गेले. तेव्हापासून त्यांना एकटेपणा भंडावून सोडत असेल. आम्हां बायकांना स्वयंपाक करणे हा विरंगुळा वाटतो. स्वयंपाक हे तुमच्यासारखे काम वाटत नाही. चांगले चुंगले पदार्थ बनवून सगळ्यांना खाऊ घालण्यात आम्हाला समाधान लाभते. तू त्यांचा विरंगुळाच काढून घेतलास." निशाच्या आई म्हणाल्या.
आपल्या बायकोला सगळेजण सुनावत आहेत हे ऐकून सुमीत मध्ये पडला. तो म्हणाला,
"आई, तुम्ही सांगताय तर उद्यापासून आई भाज्यांना फोडण्या देईल. पोळ्या, भाकऱ्या निशा बनवेल."
आता सासुबाईंनी आपला मोर्चा सुमीतकडे वळवला.
"सुमीतराव, तुमची तर आई आहे ना? तुमचे लक्ष नको? घरातले सगळे निर्णय बायकोने घ्यायचे अशी परवानगी तुम्ही दिली हे उत्तमच आहे; परंतु ही जबाबदारी ती व्यवस्थित पार पाडतेय की नाही याकडे लक्ष नको? की आपले जबाबदारी सोपवली आणि स्वतः मुक्त झालात."
"तुम्ही माझ्या मनातले बोललात काकू." स्नेहा म्हणाली.
"काल मी बाजारातून चार बेडशीट आणली. मी आले तर आईच्या बेडवर जीर्ण झालेले बेडशीट घातले होते. तेच काढून धुवून पुन्हा तेच घातले जाते. आईने आमच्या बाबतीत असे केले होते का कधी? हे सुजीत दादाच्या का लक्षात आले नाही कधी?
आईचे आता वय झाले आहे. सुका मेवा, दूध, दही असे तिच्या पोटात गेले पाहिजे, याकडे सुजीतदादाचे लक्ष नको? ती चार दिवस जास्त कशी जगेल यासाठी प्रयत्न करायला नको? तिची विचारपूस करायला नको? तो कामाला जातो, पण वहिनी तर घरातच असते. तरीही आईशी दिवसभरात जेवायला या, चहा घ्यायला या, याव्यतिरिक्त तिचे आईशी काहीही बोलणे होत नाही. एकाच घरात राहून आईला वाळीत टाकले आहे यांनी."
हे ऐकून निशा उसळली.
"ताई, मनाला येईल ते काहीही काय बोलताय?"
"मी मला जे जाणवले ते सांगितले. आईने या सगळ्याचा इतका धसका घेतला आहे की, मी तिला बाहेर घेऊन गेले होते तेव्हा मिसळ मागवली तर तिने घाबरत घाबरत दोन चमचे मिसळ खाल्ली फक्त. तिला प्रचंड आवडते मिसळ. घरात शिस्त हवी हे मलाही मान्य आहे पण अरेरावी नसावी. आईवर इतकी बंधने घालण्यापेक्षा तिचे तिला ठरवू देत ना. तिला स्वतःच्या आरोग्याची काळजी नाही का?" स्नेहा म्हणाली.
"ताई, आता तुम्ही अति करताय. तुमचे लग्न झाले आहे. आता जे काही निर्णय घ्यायचे ते तुम्ही तुमच्या घरी घ्यायचे. इथे येऊन ढवळाढवळ करायची नाही. आमचे आम्ही बघून घेऊ." निशा कडक आवाजात म्हणाली.
हे ऐकून स्नेहा काही म्हणायच्या आधीच निशाच्या आई म्हणाल्या,
"हे तुलाही लागू होतेय हे लक्षात ठेव."
"आई, मी कुठे यांच्यासारखी तडातडा बोलते?" निशा म्हणाली.
"तुझी मोठी वहिनी कुठे तुझ्यासारख्या चुका करते? नवी नवरी तर आत्ताच आलीय. माझ्यावर आजवर कुणीच कसली बंधने घातली नाहीत. बंधने नसतील, आपुलकी असेल तर माणूस अधिक जबाबदारीने वागतो."
हे ऐकून निशाला आपली चूक समजली. तिने सासुबाईंची व स्नेहाची माफी मागितली. सुजीतलाही आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. यावेळचा आपला दौरा यशस्वी झाला या समाधानात स्नेहाने अंमळ चार घास जादाच खाल्ले.
निशाच्या आईने आपल्या लेकीची बाजू न घेता तिला कानपिचक्या दिल्या होत्या त्यामुळे तिला आपली चूक समजली होती. मनभेद होता होता मनोमीलन झाले होते.
निशाच्या आईने आपल्या लेकीची बाजू न घेता तिला कानपिचक्या दिल्या होत्या त्यामुळे तिला आपली चूक समजली होती. मनभेद होता होता मनोमीलन झाले होते.
समाप्त.
©® सौ.हेमा पाटील.
कथा कशी वाटली ते अवश्य कळवा.