Login

कांतारा २

कांतारा ३ चित्रपट समीक्षण
कांतारा - २

विकृती जेव्हा वाढते तेव्हा त्याला आळा घालण्यासाठी देव हा अवतरतोच. कोणत्या रुपात येणार? कधी येणार? कसा येणार? हे माहीत नसतं. नायकाची जेव्हा एन्ट्री झाली तेव्हा दर्शकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, तेव्हाच वाटलं सुरवात अशी आहे तर चित्रपट देखील जबरदस्त असणार, तसंच झालं. नायकाची भूमिका इतकी जबरदस्त आहे की, बस बघतच राहावी. कळकट मळकट कपडे, वाढलेले केस, पिवळे दात. कधी वाटलं देखील नव्हतं की हिरो असा असेल, पण ह्या चित्रपटात हेच तर खास आहे. वरवर दिसण्यावर काहीच नसतं, गुण महत्वाचे असतात. बरं ज्या पद्धतीने चित्रपट दाखवला आहे अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
काही दृश्य मन हेलावून टाकतात. चित्रपटाचे संगीत देखील अप्रतिम आहे. त्यामुळे चित्रपट पाहणारा मंत्रमुग्ध होतो. काय दाखवलं आहे चित्रपटात? देवावर श्रद्धा, सूडाची भावना, शोषण, ताकद, धैर्य असं बरंच काही सुंदर पद्धतीने गुंफलं आहे.
सुरवातच अशी आहे की, दर्शक स्तब्ध होतो. का स्तब्ध होतो? ते पाहिल्यावर कळेलच.
वो.... अशी जी किंकाळी अभिनेत्याच्या तोंडून ऐकायला येते तेव्हा मात्र अंगातून वीज चमकून जावी असंच होतं. आजवर पाहिलेल्या उत्तम चित्रपटापैकी असा हा चित्रपट आहे.
उत्तम अभिनय, डायरेक्शन सारं काही उत्तम आहे. फायटिंग असो वा विनोद मनाला भुरळ घालणारा असा चित्रपट आहे.
ज्या पद्धतीने चित्रपटाची कहाणी पुढे सरकते, तसतसे पुढे काय होणार ह्याची उत्सूकता लागून राहते. शेवट देखील इतका सुंदर आहे की बस पैसे वसूल झाल्याची भावना येते.

अन्यायाला वाचा फोडणारा, स्वतःच्या माणसांना जपणारा, वेळ पडली तर तितकाच आक्रमक होणारा असा नट आहे. मेहनती आहे. स्वतःच्या माणसांना घेऊन व्यवसायात पाय रोवण्याचा प्रयत्न करतो, त्याची जिद्द, ताकद अनुकरण करण्यासारखी आहे. कांतारा भाग १ देखील असाच होता. शेवटचे जे पंधरा मिनिटं होते ते पापणी खाली न पाडता बघितला होता. तेव्हा देखील त्याने त्याच्यावर जो अन्याय झाला होता, भावाला मारलं होतं त्याचा बदला घेतला होता. चित्रपटाचे वैशिष्ट्य हे की कसलेही अंगप्रदर्शन नाही, केवळ उत्तम अभिनय आणि कथेच्या जोरावर चित्रपटाला वेगळ्या उंचीवर ठेवला आहे.

काही चित्रपट असे असतात की, असं वाटतं आपणही कुठेतरी त्या चित्रपटात आहोत. कनेक्ट होतो. त्यांची सुख दुःख आपलीशी वाटतात, असंच जाणवलं हा चित्रपट पाहताना. हळवी व्यक्ती नक्की हा चित्रपट पाहताना रडणार. विविध कंगोरे असणारा असा हा चित्रपट आहे. एकदा तरी पहावा असाच उत्कृष्ट चित्रपट "कांतारा"
अश्विनी ओगले.