जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५
विषय : नणंदबाई येती घरा
शीर्षक : कानउघाडणी भाग २
विषय : नणंदबाई येती घरा
शीर्षक : कानउघाडणी भाग २
“रिटायर्ड झाल्यामुळे जरा निवांतपणा लाभला आहे त्यामुळे शोभावहिनींच फिरणं, नातेवाईकांना भेटणं चालू आले. नोकरीमुळे मनात त्यांना असूनही कुठे जाता आलं नाही. नव्याची नवलाई नऊ दिवस. काही दिवसांनी त्या स्वतःच कंटाळतील, देव देव करत घरात बसतील. तू कशाला बोलून, रागावून माहेरी येऊन कशाला वाईटपणा घेतेस.” मुलगी माहेरपणाला आलेली कोणाला आवडणार नाही? मुलीने माहेरी यावं, चांगलं निवांत रहावं, भरुपूर आराम करत माहेरपण उपभोगावं आईला नेहमीच वाटत असतं पण शैलाताईंना मुग्धाचे असं रुसून, सासूवर रागावून, ज्या कारणाने माहेरी येत आहे ते खटकत होतं त्यामुळे त्या तिला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या.
शैलाताई मुग्धाच्या सासूबाईंना तिच्या लग्नाच्या आधीपासून ओळखत होत्या. मैत्री, घरोबा असं काही नसलं तरी आपल्या घराजवळ, विभागात रहात असणाऱ्यांची माहिती असते ना! तशीच जुजबी ओळख होती दोघींची. अवघ्या पस्तीशीत वैधव्य आले होते शोभावहिनींना. विसुभाऊंना आलेला पहिलाच अटॅक इतका जबरदस्त होता की धावपळ करत हॉस्पिटल गाठेपर्यंत सगळा खेळ संपला होता. निषाद अवघा दहा अकरा वर्षाचा होता. पुढे काय? शोभावहिनींना सगळा भविष्यकाळ अंधारात दिसत होता. आईवडील नव्हते, भावाची परिस्थिती अगदीच यथातथा त्यामुळे त्याच्यावर भार होऊन माहेरी रहाणे त्यांना पटत नव्हते. बहिणीने दुसऱ्या लग्नाचा पर्याय सुचवला तर नणंद तिच्या घरी चला म्हंटली, वहिनींनी दोघींनाही नकार दिला.
“निषाद आधीच बिथरला आहे, नवीन ठिकाणी, शाळेत सेट होईल की नाही शंका आहे. परत ॲडमिशनचा प्रश्न, खर्च, कसं जमवायच सगळं?” निषादचे कारण पुढे करत, रहातं घर स्वतःच हक्काच असल्याने शोभा वहिनींनी इथेच रहाणं पसंत केलं.
“नवऱ्याच्या जागी नोकरी लागते का बघा” कोणीतरी सुचवलं मग कंपनीत खेटे मारणं सुरू झालं.
विसूभाऊ पर्चेस डिपार्टमेंटला होते, शिक्षण कमी, अनुभव नाही, कम्प्युटरचे ज्ञान नाही त्यामुळे त्यांच्या जागी नोकरी मिळणे तसे कठीणच होते. मालकांनी पॅकिंग विभागात नोकरी देऊ केली. शोभावहिनींनी कमी पगारात हलके काम करावे विसूभाऊंच्या सहकारी मित्रांना पटत नव्हते, साहेबांची चिड येत होती. वाद घालण्यात काही अर्थ नाही आपल्या कुवती प्रमाणे नोकरी देऊ करण्यात आली आहे ही सत्य परिस्थिती स्वीकारत वहिनी कामावर रुजू झाल्या.
शोभावहिनींच्या नोकरीची पार्श्वभूमी, एकटीने मुलाला वाढवताना केलेला संघर्ष शैलाताईंना माहीत होता त्यामुळे वहिनींबद्दल त्यांना नितांत आदर होता. त्यामुळेच तर निषादच स्थळ मुग्धासाठी सांगून आलं तेव्हा शैलाताईंनी अगदी डोळे मिटून होकार दिला होता. त्या घरी आपली लेक सुखाने राहील याची त्यांना खात्री होती पण मुग्धाचे काहीतरी भलतंच चालू होतं.
शोभावाहिनी कधीच कुणाच्या आध्यात मध्यात नसायच्या, एकटीने संसार करताना कायम अंतर ठेऊन असायच्या, आपण बरं आपल काम बरं हीच त्यांची भूमिका असायची. निषाद स्वतःच्या पायावर उभा राहिल्यावर, त्याच लग्न झाल्यावर त्या जरा रिलॅक्स झाल्या होत्या. शेजारीपाजारी मिसळायला लागल्या होत्या. शोभावहिनींच पूर्व आयुष्य जसच्या तसं शैलाताईंच्या डोळ्यासमोर येत होतं, त्यांना अस्वस्थ करत होतं.
“तुझी इच्छा नसेल तर येत नाही. भाऊबीजेला ओवाळणी पुरती येईन आणि लागलीच परत जाईन. इथे नाही आले तर बंगलोरला जाईन; माझी मैत्रीण नमिता कधीची बोलावते आहे त्यानिमित्ताने बंगलोर, म्हैसूर फिरून होईल. तिकडेही नाही जमलं तर सोलो ट्रिप करेन, लेडीज स्पेशल टूरला जाईन, बरेच ऑप्शन आहेत.” आईच्या बोलण्याचा रोख कळल्यामुळे मुग्धा चिडली होती. काहीच बोलत नसलेल्या आईकडे बघून तावातावाने बोलत होती.
“अगं तसं म्हणायचं नव्हतं मला. तू उगीच चिडचिड करू नकोस.” शैलाताईंनी सारवासारव केली. ही इकडे नाही आली तर दुसरीकडे कुठेतरी जाईल, घरातल्या गोष्टी बाहेर जायला नकोत म्हणून त्यांनी मुग्धाला माहेरी यायची परवानगी दिली.
‘महिनाभर मी नसले म्हणजे सासूबाई घरात अडकणार, मी घरी जाईपर्यंत मॉर्निंग वॉक, सोशल वर्क असली खुळं त्यांच्या डोक्यातून जाणार, सगळं परत पूर्ववत होणार’ या आनंदात मुग्धा घरी परतली.
क्रमशः
©®मृणाल महेश शिंपी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा