जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५
विषय : नणंदबाई येती घरा
शीर्षक : कानउघाडणी भाग ४
विषय : नणंदबाई येती घरा
शीर्षक : कानउघाडणी भाग ४
तुषार आणि रागिणीचे लव मॅरेज होते. दोघेही एकाच कॉलेजला होते. रागिणीचे लग्नाच्या आधीपासूनच घरी येणेजाणे होते. मुग्धाची आणि तिची पहिल्याच भेटीत गट्टी जमली होती. मुग्धाला आपली भावी वाहिनी बघताक्षणीच आवडली होती. रागिणीसुद्धा नारकरांच्या घरात पटकन सामावून गेली होती. सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनली होती.
‘बाबांच्या आजारपणात किती काळजी घेतली होती तिने त्यांची. मग आत्ताच अचानक असं काय झालं? तिचं वागणं बोलणं का बदललं? की आधीपासूनच तिचं दुपटी वागणं होतं. खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असं, आमच्याच लक्षात आलं नाही.’ मुग्धाच्या विचारांची घोडदौड ऑफिसमधून निघाल्यावर तिने पकडलेल्या ट्रेन पेक्षाही सुपरफास्ट चालली होती.
“आई आज तू घरी कशी? मंडळात नाही गेलीस?” शेजारून चावी घ्यावी लागेल या विचारात घरी आलेल्या मुग्धाने शैलाताईंना दारात पाऊल टाकताच विचारले.
मंगळवार आणि शुक्रवार शैलाताईं सखी महिला मंडळात जायच्या. माझ्या हक्काचे, विरंगुळ्याचे दोन अडीच तास म्हणत या दिवसांची त्या नेहमी वाट बघायच्या. सखी मंडळात कोजागिरी, भोंडला, एकमेकींचे वाढदिवस साजरे करणे, स्नेहभोजन असे बरेच कार्यक्रम केले जायचे. वर्षातून दोन तीनदा सहल जायची. भिशी चालायची. मुग्धाच्या सासूबाई निवृत्त झाल्यावर शैलाताईंनी त्यांना सुद्धा आपल्या मंडळात सामील करून घेतलं होतं. शैलाताई मंडळात जायला नेहमीच उत्सुक असायच्या आज त्या गेल्या नसल्याने मुग्धाला आश्चर्य वाटत होतं.
“मंडळात गेले की उशीर होते, नेहमीच काही न काही कार्यक्रम असतात, बायका बोलत बसतात. निघे निघे पर्यंत साडेसात आठ होतात घरी यायला साडेआठ वाजून जातात. आल्यावर स्वयंपाक करायचा, खूप घाई होते. पूर्वी सारखी काम पटापट होत नाहीत आता.”
“रागिणीला करायला काय होतं, दोन दिवस सुद्धा ती मॅनेज करू शकत नाही. तू तिला काहीच बोलत नाहीस.” शैलाताईंनी दिलेल्या कारणाने मुग्धा अवाक झाली होती.
“वाहिनी तुला जरा सुद्धा घरात लक्ष घालता येत नाही का? सगळं आईनेच करायचं. तू कुठल्याच कामाला हात लावत नाहीस. तुला काहीच कसं वाटत नाही? आयतं ताटावर येऊन बसायला. तुझ्यामुळे आईला मंडळात पण जाता येत नाही. ती बोलत नाही याचा तू गैरफायदा घेतेस. नोकरी करतेस म्हणजे उपकार करत नाहीस. तू तुझ्या साठी नोकरी करतेस, तुझ्या पगारावर हे घर अवलंबून नाही. सगळ्याचं नोकरी करून घरचं देखील बघतात. तुला जमत नसेल तर बाई लाव. आईनेच सगळं करावं हा अट्टाहास कशाला? इतके वर्ष तिचं करत आली. आता तरी तिच्या जीवाला आराम नको का?” रागिणी ऑफिसमधून आल्यावर मुग्धाने तिच्यावर तोफ डागली.
तुषारला घरात घडणाऱ्या गोष्टींची सुतराम कल्पना नसल्याने तो पुरता गोंधळून गेला होता. हे सगळं काय चाललंय, काहीच कळत नसल्याने आई, बहीण आणि बायको तिघींकडे आलटून पालटून बघत होता.
“मला जाब विचारण्याआधी जरा स्वतः कशी वागतेस याचा विचार कर. मी तुझे अनुसरण करत आहे. तुझ्या पावलावर पाऊल ठेऊन चालत आहे. तू ज्या अपेक्षा तुझ्या सासूबाईंकडून करत आहेस त्याच मी माझ्या सासूकडून करत आहे. तू तुझ्या घरी किती कामं करतेस? आणि मला तोंड वर करून विचारतेस? स्वयंपाकाला बाई लावायच्या गोष्टी करतेस तू तरी लावलीस का?” रागिणीने रोखठोक बोलत मुग्धाची बाजी तिच्यावरच पलटवली.
रागिणीच्या बोलण्याने मुग्धा एकदम गांगरून गेली. वर्मी घाव बसल्यासारखी तिची अवस्था झाली. चेहरा पांढराफटक पडला. काय बोलावे काही सुचेना. आईच्या जागी सासूबाई आणि रागिणीच्या जागी स्वतःची छबी दिसू लागली.
क्रमशः
©®मृणाल महेश शिंपी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा