Login

कानउघाडणी .. भाग १

चुकीचं वागल्यामुळे आईने लेकीला घडवलेली अद्दल.
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५
विषय : नणंदबाई येती घरा
शीर्षक : कानउघाडणी भाग १

“सासूबाई रिटायर्ड झाल्यापासून वैताग आलाय नुसता. कंटाळले आहे मी. दिवाळी झाली की मी चांगली आठ, दहा दिवस रहायला, आराम करायला येणार आहे.” मुग्धा आईला सांगत होती.

“काय ग बाई, काय केलं त्यांनी एवढं?” सासर माहेर एकाच शहरात अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर असल्याने बऱ्याचदा एक दोन दिवसाआड, कधी कधी रोजच मुग्धाची माहेरी चक्कर असायची. ऑफिसमधून येताना तासभर बसून आईशी पोटभर गप्पा मारून ती आपल्या घरी परतायची. तिचं रहायला येणं म्हणजे सकाळी येऊन संध्याकाळी घरी परत. रहायला ये म्हटलं की, रोजच तर भेटतेस आईला, अजून वेगळं कशाला रहायला जायला हवं, निषाद पाठवत नाही. सासरमाहेर एकाच गावात असल्याचे दुष्परिणाम म्हणत हसतहसत नकार दर्शवायची. आपली लेक स्वतःहून माहेरी राहायला येते म्हंटल्यावर शैलाताईंच्या स्वरातून आनंद, काळजी त्याहीपेक्षा एवढं काय झालं सासरी? याची उत्सुकता डोकावत होती.

“सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जातात, त्यानंतर पेपर वाचन, मोबाईल वर टाईमपास, नंतर स्वतःच आवरणं, देवपूजा, दुपारी झोपणे, संध्याकाळी परत पाय मोकळे करायच्या नावाने दोन तास भटकणे, मंडळात जाणे, भजनाचा क्लास, घरी आल्यावर टीव्ही बघणे हेच चालू आहे. सगळं ताळतंत्र बिघडलं आहे. सासूबाई जरा म्हणून मला मदत करत नाहीत, कुठल्याही कामाला हात लावत नाहीत. पंधरा दिवस बहिणीकडे अलिबागला जाऊन आल्या. त्याआधी शेगाव ट्रिप झाली, सारखं काही ना काही चालू आहे” मुग्धा तक्रारीच्या सुरात बोलत होती.

मुग्धाच्या सासूबाई शोभाताई एमआयडीसी मधील एका खाजगी कंपनीत कामाला होत्या. सकाळी साडेआठची ड्यूटी असल्याकारणाने साडेसात पावणेआठपर्यंत त्यांना घर सोडावे लागायचे. सकाळी साडेपाचच्या आत उठून केरवारे, देवपूजा, चहा, डबा, पाणी भरणे, कपडे मशीनला लावणे सकाळची सगळी कामे शोभाताई करून जायच्या. संध्याकाळी देखील कामावरून घरी आल्या की त्या लगेचच कामाला लागायच्या, मुग्धा ऑफिसमधून घरी येईपर्यंत त्यांचा जवळजवळ सगळा स्वयंपाक तयार असायचा. बऱ्याच वर्षापासूनची सवय अंगवळणी पडली असल्याने सवयीप्रमाणे त्या हातासरशी कामे उरकून टाकायच्या त्यामुळे मुग्धाला फारसे काही करावे लागायचे नाही. थोडंफार वरकाम केलं तर केलं नाही तर नाही तिचा सगळा मनमानी कारभार चालायचा पण चार महिन्यांपूर्वी शोभाताई रिटायर्ड झाल्या आणि सगळं चित्रच पालटलं. नोकरीतून निवृत्त झाल्यावर घरून कामावर आणि कामावरून घरी सरळ रेषेत सुरू असणारं त्याचं जीवनचक्र बदललं. सकाळी योगाक्लास, संध्याकाळी घराजवळील विठ्ठल मंदिरात भजन, पारायण, प्रवचन यात नित्यनेमाने त्या सहभागी होऊ लागल्या. कधी शेजारणी, मंडळातील मैत्रिणींबरोबर सहलीला, नाटकाला जाऊ लागल्या. शोभाताईंनी प्रपंचातूनही अंग काढून घेतल्यामुळे मुग्धाच्या कामाचा बोजा वाढला. तिची चिडचिड होऊ लागली. सासूबाईंच्या सोशली अँक्टिव्हिटींना तिची ना नव्हती, तिला वाटायचं पूर्वीसारखं घरातलं सगळं करून फावल्या वेळात जिथे जायचं तिथे जावं. एक दोनदा तिने शोभाताईंना तसं सुचवलं देखील पण त्यांनी तिचं म्हणणं मनावर घेतलं नाही.

“मॉर्निंग वॉक हा सकाळीच करायला हवा, उन्हं डोक्यावर आल्यावर जाऊन काय फायदा? जाणारे जातात हो! मला काही ते पटत नाही. सकाळी सहा साडेसहाच्या सुखद गारव्यात एक चक्कर मारली की प्रसन्न वाटतं. सगळा दिवस छान जातो. योगाक्लास असो की भजन ते त्यांच्या वेळेप्रमाणे घेणार माझ्या एकटीसाठी थोडीच वेळ पुढे मागे होईल. नसेल जमत तर येऊ नका म्हणतील” मुग्धाने किरकिर केल्यावर शोभाताईंनी स्पष्ट बोलत तिला गप्प केलं.

“बरोबर बोलते आई, इतकी वर्ष नोकरीमुळे तिला कुठे जाता आलं नाही आता तरी मनासारखं जगू दे, वागू दे.” निषादने आईची बाजू घेतली.

आई, मुलगा एक झाल्यावर मुग्धाचे काही चालेना यावर काय बोलावे तिला कळेना. नाईलाजाने गप्प बसत ती मनातल्या मनात धुमसत राहिली. भाऊबीजेच्या निमित्ताने चांगलं पंधरा वीस दिवस माहेरी जायचं, या दोघांना अद्दल घडवायची तिने मनोमन ठरवलं.

क्रमशः

©® मृणाल महेश शिंपी.

मुग्धाचा हेतू साध्य होईल का? …. पाहूया पुढील भागात.


0

🎭 Series Post

View all