Login

कानउघाडणी .. भाग ५ अंतिम भाग

चुकीचं वागल्याबद्दल आईने लेकीला घडवलेली अद्दल.
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५
विषय : नणंदबाई येती घरा
शीर्षक : कानउघाडणी भाग ५

रागिणीने रोखठोक बोलत मुग्धाची बाजी तिच्यावरच पलटवली होती. तिच्या बोलण्याने मुग्धा एकदम गांगरून गेली. वर्मी घाव बसल्यासारखी तिची अवस्था झाली. चेहरा पांढराफटक पडला. काय बोलावे काही सुचेना. आईच्या जागी सासूबाई आणि रागिणीच्या जागी स्वतःची छबी दिसू लागली. आपली वागणूक डोळ्यासमोर येऊ लागली. डोळ्यात असावं तराळली.

बऱ्याचदा कोणी सांगून, ऐकून, वाचून काही गोष्टी लक्षात येत नाहीत त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जाते पण तेच जेव्हा स्वतःच्या वाट्याला येतं किंवा आपल्या समोर प्रत्यक्षरीत्या घडतं तेव्हा त्याच महत्व पटतं हेच मुग्धाच्या बाबतीत झालं होतं. शैलाताईंनी अनेकदा तिला तिच्या वागणुकीबद्दल समजवलं होतं पण तिने त्याकडे लक्ष दिलं नव्हतं पण रागिणीने तिच्यासारखं वागून तिला खडे बोल सुनावले तेव्हा मुग्धाला आपल्या चूकीची जाणीव झाली.

“खरंच चुकलंच माझं. मी अगदी वेड्यासारखी वागत होते. वहिनीलासुद्धा लवकरच तिची चूक कळू दे, तिचं वागणंही बदलू दे.” मुग्धा पापण्या टिपत शैलाताईंकडे बघत म्हणाली.

“ती चुकतच नव्हती, ती फक्त माझ्या सांगण्यानुसार वागत होती.”

“म्हणजे?” शैलाताईंच्या बोलण्याचा रोख न कळल्याने, इतकं सगळ होऊनही आई अजूनही रागिणीची बाजू घेत आहे बघून मुग्धा चक्रावली होती.

“शोभावहिनींचा आर्थिक, मानसिक स्तरावरचा, जगण्यासाठीचा संघर्ष जवळून पाहिला असल्याने त्यांच्याबद्दल नेहमीच आत्मीयता वाटते. तुला अनेकदा समजावून सांगितलं तरी तिच्या डोक्यात प्रकाश पडत नव्हता. तू सुधारायचं नाव घेत नव्हतीस. अखेर डोक्यावरून पाणी जायला लागल्यामुळे रागिणीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नाटक करावं लागलं.”

“नाटक….?” मुग्धा जोरात किंचाळली.

“हो नाटकच. रागिणीच ना बोलणं बदललंय ना वागणं. ती पाहिल्यासारखंच सगळं उत्तमरीत्या हाताळत आहे. काही वेळा सरळ वाटेने जाऊन गोष्टी सध्या होत नाहीत म्हणून वाट वाकडी करावी लागते, आम्ही पण तेच केलं. मला माहित होतं, मला त्रास झालेला तुला सहन होणार नाही, तू बिथरशील. यात रागिणीची काहीच चूक नाही, तुला वठणीवर आणण्यासाठी, कानउघाडणी करण्यासाठी मी पाढवल्याप्रमाणे ती वागत होती. मला मदतच करत होती. तिने आपली भूमिका उत्तमरीत्या वठवली.” शैलाताईंनी सगळी पार्श्वभूमी समजावून सांगीतली.

“मला कल्पना तरी द्यायची होती या सगळ्याची. ह्या दोघी एकमेकींवर बरसल्यावर शॉकच झालो. नक्की काय चालू आहे कळेना. आई गप रहा खुणावत असल्याने काही बोलताही येईना. तुमच्या नाटकात एखादा रोल गेलाबाजार एखादा डायलॉग तरी द्यायचा मला, म्हणजे माझी पंचाईत झाली नसती. अभिनय कौशल्य दाखवण्याची संधी हुकली.” तुषार हळहळला. त्याच्या बोलण्याने सगळा ताण क्षणात नाहीसा झाला.

“परत अशी वागलीस, रागावून माहेरी निघून आलीस तर गाठ माझ्याशी आहे.” शैलाताईंनी मुग्धाचा कान पिरगळला. “नाही वागणार” म्हणत ती त्यांच्या कुशीत शिरली.

समज गैरसमज दूर झाल्याने जेवणं हसतखेळत पार पडली. समाधानाने सगळी मंडळी निद्रेच्या आधीन झाली. मुग्धाला मात्र झोपच येईना. राहून राहून स्वतःचा मूर्खपणा डोळ्यासमोर येत असल्याने तिच्या डोळ्याला डोळा लागेना. ती पश्चातापच्या आगीत होरपळत होती.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मुग्धा आपलं आवरून, बॅगा घेऊन बाहेर आली.

“अगं तू तर महिनाभर रहाणार होतीस ना?” रागिणीने मुद्दामून विचारले.

“आधीच उशीर झालायं, अजून होण्याआधी घरी जाते, चूक सुधारते. मुग्धा रागिणीचे आभार मानत म्हणाली.

“आभार कसले मानतेस, वेडाबाई” रागिणीने तिला जवळ घेतले.

वाट चुकलेलं वेड कोकरू आपल्या घरी परततंय म्हंटल्यावर भरभरून आशीर्वाद देत सगळ्यांनी आनंदाने मुग्धाची पाठवणी केली.

“नणंदबाई येता घरा” हा नाट्यप्रयोग यशस्वी झाल्याच्या खुशीत शैलाताई आणि रागिणीने एकमेकींना घट्ट मिठी मारली. ह्यापुढे असल्या प्रकारचे नाट्यप्रयोग करण्याची वेळ माझ्यावर नको येऊ दे म्हणत हात जोडत शैलाताईंनी खडीसाखरेची वाटी देवासमोर ठेवली.