Login

कानउघाडणी .. भाग ३

चुकीचं वागल्याबद्दल आईने लेकीला घडवलेली अद्दल.
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५
विषय : नणंदबाई येती घरा
शीर्षक : कानउघाडणी भाग ३

भाऊबीजेनिम्मित पंधरा वीस दिवस माहेरी जाणार असल्याचे मुग्धाने घरी आल्या आल्या जाहीर करून टाकले.

“इतके दिवस कशाला?” निषादने नेहमी प्रमाणे कुरकुर केली.

“सण आहे. तिच्या आईचा फोन आला होता. जाऊ देत.” शोभावहिनींनी परवानगी दिल्यावर त्याचा नाईलाज झाला.

ठरल्याप्रमाणे भाऊबीजेच्या दिवशी मुग्धा आणि निषाद दोघे तिच्या माहेरी पोहोचले. शैलाताईंनी सगळ्यांनाच बोलवले होते पण भाऊ यायच्या असल्याने शोभावाहिनी घरीच राहिल्या होत्या. मामा यायचे असल्याने मुग्धा आणि निषादला यायला देखील उशीर झाला होता. जेवायच्या वेळेपर्यंत ती दोघं घरी पोहोचली. रागिणी वहिनीचे दोघे भाऊ, मुग्धाची चुलत भावंड, काका काकू सगळी मंडळी सकाळीच आली होती. मुग्धा घरी गेल्यावर ओवाळणी झाली, भाऊबीज छान पार पडली. अंगतपंगत बसली, मानपान, भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली, गप्पाटप्पा रंगल्या. दुपारी साडेतीन चारच्या सुमारास निषाद सकट सगळी मंडळी आपल्याला घरी परतली. मुग्धाची वाहिनी रागिणी तिच्या खोलीत आराम करायला गेली. मुग्धाही आईच्या खोलीत आडवी झाली. गोडधोडाचे जेवण अंगावर आले असल्याने मस्तपैकी ताणून द्यायचा तिचा विचार होता. जरा डोळा लागत नाही तोच तिला किचन मधून खुडबुड ऐकू आली.

‘सगळे झोपले आहेत भांड्यांची आदळआपट करू नका’ शरू मावशींना सांगायला उठलेली मुग्धा स्वयंपाकघराच्या दारातच थबकली. शरू मावशी नाही तर शैलाताईंची आवराआवर चालू होती. उललेलं अन्न काढून फ्रीजमध्ये ठेऊन झाकपाक करून झाली होती. त्या भांडी घासत होत्या.

“अगं तू का करतेस? शरू मावशी कुठे आहेत? त्या करतील की.”

“त्या सुट्टीवर आहेत दोन दिवस. प्रत्येकाला सणवार आहेतच की! मीच म्हटलं येऊ नका.”

“मग वहिनी करेल. तू जरा आराम कर.” आपल्या भावजयीला झोपलेलं आणि आईला काम करताना बघून वैतागलेली मुग्धा म्हणाली.

“तिला झोपू दे. सकाळी लवकर उठली आहे. सगळं तिनेच केलंय.” शैलाताईंनी सुनेची बाजू घेतली.

“कशाने दमली एवढी. अर्ध अधिक तर बाहेरून मागवलं होतं.” मुग्धाने चिडून तोंड वाकडं केलं.

“मी आवरते, तू सुद्धा जाऊन आराम कर.” सणाच्या दिवशी वाद नको असल्याने शैलाताई निर्वाणीच बोलल्या.

आई काम करते आणि आपण झोपायचे मुग्धाच्या मनाला पटेना, मनातल्या मनात वाहिनीवर चरफडत मुग्धाने शैलाताईंना मदत केली. तासाभराने सगळं आवरून दोघी जरा निवांतपणे बसल्या तोच रागिणीची बाहेर जायची तयारी करू लागली. अवघ्या दहा पंधरा मिनिटात तुषार आणि रागिणी आवरून बाहेर पडले.

“अशी काय ही? दुपारी झोपा काढल्या. संध्याकाळी फिरायला गेली. पणत्या तरी लावून जायचं. घरच्या सुनेला शोभतं का हे?” रागिणीची पाठ वळताच मुग्धाची बडबड सुरू झाली.

“खरेदीला गेले आहेत ते. तिच्या मामेबहिणीच पुढच्या महिन्यात लग्न आहे त्याचीच तयारी चालू आहे. उद्यापासून ऑफिस सुरू होईल मग वेळ मिळणार नाही.” लेकीच्या हातात चहाचा कप ठेवत शैलाताईंनी आपल्या सुनेची बाजू घेतली.

“बरं रात्रीच्या जेवणाच काय? काय करूया.” जरा वेळाने शैलाताईंनी मुग्धाला विचारले.

“ते पण तूच करणार का?”

“त्यांना उशीर होणार आहे, ती दोघं बाहेरून खाऊन येतील. रागिणीचा फोन आला होता.”

“आपल्याला पार्सल आणायला सांगायच की. नेहमी असंच करतात का?”

“नाही ग. मला विचारतात तुला काही आणू का? कधीतरी आणतात पण बऱ्याचदा मीच नाही म्हणते, बाहेरचं हल्ली तिखटजाळ नको वाटतं.”

‘काय चाललंय काय हे रागिणी वाहिनीच. आल्यापासून बघते तिचं घरात लक्षच नाही. ती फक्त स्वतःपुरतच बघते. ऑफिसला जाते आणि येते, बास. बाकी काहीच करत नाही.कुठल्याच कामाला हात लावत नाही. आई तिला काहीच बोलत नाही, उलट सांभाळून घेते. ती आईच्या चांगुलपणाचा पुरेपूर फायदा घेते. पहिले तर ती अशी वागत नव्हती. घरात सगळं करत होती. आईची काळजी घेत होती. जेवणाआधीची गोळी घेतलीत का? आईला आठवण करून देत होती. आता मात्र ती सतत तिच्या खोलीत असते. मोजकच बोलते. मी इथे आलेले तिला आवडले नाही का? इकडे येऊन चूक तर केली नाही ना?’ मुग्धा विचारांच्या गर्तेत हरवली.