Login

कारण आम्ही एकमेकांची मन जपतो

एका घरात चार पिढ्या गुण्यागोविंदाने राहणाऱ्या एका कुटुंबाची प्रेरणादायी गोष्ट
"अरे वाह!! किती छान... आज आपल्या क्लासमध्ये सगळ्यात छोटा मेंबर तीन वर्षाचा तर सर्वात मोठा सदस्य वय वर्ष पंचाहत्तर.
"मागे टेबल खुर्चीवर बसलेल्या आजींकडे भार्गवीने कौतुकाने बघितलं, वर्गातल्या सर्वांच्या नजरा आजीकडे वळल्या. 


"तुम्हाला आजी म्हणलं तर चालेल!" भार्गवीने विचारलं.


"अगं नातवंडं पतवंड आहेत मला. लहान वाटत असेल मी तर, सुगंधा म्हंटल तरी चालेल. माझी नातसून तर बाई मला स्विटी म्हणते!" दात नसलेल्या ओठांआडून आजी गोड हसल्या. 


"नाव सुंदर आहे हं आजी तुमचं." भार्गवीने म्हटलं तसं.. "सुंगंधा की स्विटी." आजी पटकन बोलल्या. वयोगटाची विभिन्नता क्षणात गळून पडली कारण आजीच्या बोलण्यावर सगळेच खळखळून हसत होते. संकोच उरलाचं नव्हता.

"चला तर, आज आपण शिकणार आहोत.. वारली चित्रकला"

"वारली चित्रकला. ही महाराष्ट्र राज्यात कोकण भागात आदिवासी जमातीतील वैशिष्टपूर्ण अशी चित्रशैली. समृद्ध जीवनशैली म्हणूया खरं तर. रोजच्या जीवनात करू ती सगळी कामं चित्रांच्या माध्यमातून, घरांच्या भिंतीवर चितारता आणि आज नव्या रुपात साकारली जाते. वारली चित्रकला साकारलेल्या कापडी पिशव्या, कुंड्या, शोपीस, फ्रेम्स एव्हढच काय, एक सुंदर साडी सुद्धा भार्गवीने सर्वांना दाखवली... 


पेन्सिलच कुठलं ही रफ काम न करता पांढऱ्या, काळ्या किंवा गेरू रंगाच्या पेपर किंवा कापडावर काळ्या, पांढऱ्या रंगात ही चित्रकला काढली जाते. चला तर करुया का सुरुवात. ज्यांना वॉटर कलर वापरून स्ट्रोक काढता येतील त्यांनी तसे काढायला हरकत नाही आणि आमची बच्चा कंपनी सुरवातीला पेन्सिल नंतर स्केच पेनचा वापर करणार. भागवीने सांगितलं तशा सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या.

थोडी चित्रकलेबद्दल ओळख, थोडा स्ट्रोकचा सराव करून. क्लासची सांगता झाली होती. 

क्लास संपला, आजीचा पणतू अभ्युदय त्याच सगळं सामान आवरून, आजीच्या टेबलजवळ येऊन आजीला मदत करायला लागला.

"चल आजी," अभ्युदयने, आजीचा हात पकडला. आजी हळूच उठल्या. 

"कसा वाटला आजी क्लास?" भार्गवीने आजींना विचारलं. 


"छान...!" आजीने, हसत हसत तीन बोटांचा मोर नाचवला. सुंदर जग आहे ग हे." खूप काही मिळाल्याची श्रीमंत आणि समृद्ध फिलिंग भार्गवीला आल्याच तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. 

बाहेर, आपल्या मुला, नातवंडांना घरी न्यायला आलेल्यांची बाहेर गर्दी झाली होती. आजी बाहेर उभ्या होत्या. सुगंधाआजी बद्दल कौतुकाने सांगायला भार्गवी विसरली नव्हती.

वयाच्या पंचाहत्तरीत, आजींचा दांडगा उत्साह बघून बरेचजन अचंबित झाले होते. आजी ही सर्वांना हसून प्रतिसाद देत होत्या.

एक भलीमोठी महागडी कार क्लास बाहेर येऊन थांबली. एक उच्चशिक्षित जोडपं कारमधून खाली उतरलं,आणि पुढे आला.


अभ्युदयचं लक्ष आईकडे गेलं तसा, "मम्मा..मम्मा!" म्हणत, अभ्युदय आजीचा हात ओढायला लागला. 


"अरे अरे, थांब! आजीला ओढू नको, पडतील आजी." आल्या लगेच मृण्मयीने आजीच्या हातातून हॅन्डबॅग स्वतःच्या हाती घेतली. 

"ही माझी नातसून हा नातू. माझा मुलगा आणि सून दोघे ही साठीपार आणि हा माझा पणतू अभ्युदय." आजीने कौतुकाने ओळख करून दिली. 

"हॅलो हाय.. तुला त्रास तर नाही ना दिला, तुझ्या या दोन विद्यार्थ्यांनी." मृण्मयीने हसतच भार्गवीला विचारलं.


"नाही हो मॅडम, उलट मला आज मस्त काहीशी ग्रेट फिलिंग येतेय. आजींची ऍडमिशन म्हणजे, माझ्या क्लासच्या शिरपेचात, मानाच्या तुरा असल्यासारखंच." भार्गवी बोलताना हळवी झाली होती.


"मॅम,आजींना क्लासला पाठवावं.. तुम्हाला का वाटलं?" भार्गवीने मृण्मयीला विचारलं. 


"आमच्या आजी खेळकर आहेत मस्त. थोड्या स्वभावाने कडक आहेत. दारात रांगोळी, सणासुदीला दाराला तोरण हवंच, वगैरे वगैरे."


पुर्वी आजी, अंगणात खूप मोठमोठ्या रांगोळ्या काढत. मोठमोठ्या रांगोळ्यांच्या वह्या आहेत अजूनही. देवपूजेच्या वेळी छोटीशी का होईना, सुंदर सुबक रांगोळी देवासमोर काढतातच त्या."


"आम्ही डॉक्टर लोकं, प्रीस्क्रीप्शनवरची अक्षर माहितीच असतील तुला. आजींची वळणदार अक्षर बघितली की, आमच्या कीचड मीचड अक्षरांची लाजच वाटते."


"दोन तिरक्या रेषा आणि मध्ये एक छोटीशी आडवी रेष आणि झाला ऍपल चा ए..." अभ्युदयला आजीने अगदी सहज ए काढायला शिकवला त्या दिवशी आमची अर्धी चिंता मिटली होती."

"आमच्या अभ्युदयची, सर्वात मोठी आणि पहिली मैत्रिण. श्लोक, दररोजची गोष्ट, कविता पठण. अभ्युदयच्या पहिल्या गुरू ही त्याच."


"आजीला सतत नवीन काहीतरी शिकायला आवडतं. डब्ब्यातल्या पिठापासून अभ्युदयसाठी त्याच्या आवडीचे नुडल्स आणि पास्ता आजी आवडीने बनवून देतात. आणि भाकरीचा पिझ्झा पण...!" अभ्युदय मध्येच पुटपुटला


"कुंपणाला वाढलेल्या मेहेंदीची पान वाटून रंगवलेले मेहेंदीचे हात तिथपासून तर आजसारखे प्लास्टिकचे कोण बनवून, सुंदर बारीक नक्षी हातावर काढण्यापर्यंतचा... आजीचा प्रवास उल्लेखनीय वाटतो मला."


"आजी खूप सुंदर गजरे, हार बनवतात. भरतकाम, विणकाम. अभ्युदय चित्र काढतो, त्याच्यासोबत तासनतास रमतात."

"म्हटलं, आता आजीला, काहीतरी नवीन शिकवावं. वारली, मधुबनी असं काहीतरी. ह्या चित्र संपत्तीमध्ये असलेला पारंपरिकतेचा ठेवा आजीला नक्कीच आपलासा वाटणार खात्री वाटली मला. म्हणून केली ऍडमिशन." बाकी काही नाही." आजीच्या कलेच्या संपन्न कौतुक सोहळ्यात मृण्मयी हरवून गेली होती.


"अगं पुरे पुरे.... केवढ ते माझं कौतुक. ही माझी नातसून ही काही कमी गुणाची नाही बरं का!" 


"स्वतः दोघे ही डॉक्टर आहेत नवरा बायको. आयुष्यभर घरचं गृहिणी पद स्वीकारलेल्या, माझ्या सुनेला वयाच्या साठीत.. आता या वयात हिने ड्रेस डिझाईनिंगच्या कोर्सला टाकलयं. काय तर तिला शिवणकामाची आवड होती म्हणून."


"आमच्या सुनबाई सुद्धा, यशस्वी उद्याजिका बनण्याच्या वाटेवर... गोधडी आर्ट.. आमच्या सूनबाईच."


"गोधडी आर्ट...!"

गोधडी आर्टच, हातकाम असलेल्या, हैंड पर्सकडे बोट दाखवत, आजी बोलल्या. 


"गोधडी आर्ट..!" नाव ऐकताच सर्वांचे डोळे विस्फारले. 


"हो... ते माझ्या सूनबाई आणि नातसुनेचं...!" 


"गोधडी आर्ट... ही प्रेरणा पण मला आमच्या आई आणि आजीकडूनच मिळालीय बर का?" 


अभ्युदयच्या जन्माच्या वेळी, आजी आणि आईने मिळून सुंदर दुपटी, तालग्या, गोधड्या शिवल्या होत्या. स्वेटर टोपरे.. Hand-made सगळं. तिथून जन्माला आलं... गोधडी आर्ट.."


"मी दिशा दिली फक्त.. बाकी कला तर ह्यांच्या नसानसात भिनलेली आहे." मृण्मयी शांतपणे बोलत होती. उपस्थित सर्वांनाच खूप कौतुक वाटत होतं. 

"आजी कसा वाटला class. आवडला!" मृण्मयीने विचारलं.

"हो गं कित्येक वर्षानंतर शाळेत गेल्याची फिलिंग आली. या सरत्या वयाला वयाला मागे टाकून, लहान झाल्यासारखं वाटलं." आजी बोलताना सुखवल्या होत्या.

" प्रेरणादायी आहे तुमचं घर.. नाहीतर आज चार पिढ्या एका घरात.. केवळ अशक्य!" कुणीतरी मधूनच पुटपुटलं.

"खरयं... घर म्हटलं तर भांड्याला भांड लागणारच आणि ते वाजणारच. आज सासू सुनांच्या नात्यामध्ये दिसतात ती भांडणं, कुटघोड्या, हेवेदावे आणि मनमिटाव फक्त. मात्र आमचं घर ह्याला अपवाद आहे... आमच्या घरी आम्ही, चार पिढ्या एकत्र गुण्यागोविंदाने राहतो कारण आम्ही एकमेकांची मन जपतो..!" बोलताना आजीचा चेहरा समाधानाने उजळून निघाला होता.
धन्यवाद
-©®शुभांगी मस्के...