"किती त्रास होतोय तुझ्या सासूबाईंना..जरा लक्ष दे की"
बहिणीच्या या बोलण्याकडे किर्तीने साफ दुर्लक्ष केलं. तिच्या बहिणीला खरं तर तिचा रागच आला पण नवलही वाटलं, सर्वांबद्दल प्रेम, काळजी असणाऱ्या आपल्या बहिणीने सासूबाईंच्या बाबतीत मात्र निष्काळजीपणा केला होता हे स्पष्ट दिसत होतं.
कीर्तीचा स्वभाव तिच्या बहिणीला चांगलाच माहीत होता. कुणाशी कितीही वैर असलं तरी ती वाईटपणा कधीच घेत नसे, वेळ आल्यावर शत्रूच्याही पाठीवरून हात फिरवेल अशी ती होती.
मोठी बहीण या नात्याने सुधाचं आपल्या धाकल्या कीर्तिकडे लक्ष असायचं. तिला राग यायला नको म्हणून सुधा अडून अडून सासूबाईंबद्दल विचारायची, पण सासूबाईंबद्दल बोलताना कीर्तीची टोन लगेच बदलायची. तिरस्काराने ती बोलायची.
एक दोन वेळा बहिणीला सांगूनही तिने दुर्लक्ष केल्यावर बहिणीने तिला कडक शब्दात सांगायचं ठरवलं.
"कीर्ती, मोठी बहीण म्हणून तुला हक्काने रागावतेय, तुझ्या सासूबाईंबाबत तुझा निष्काळजीपणा फारच वाढलाय.. अगं इतर मुलींकडे बघ, त्यांच्या सासवा त्यांना इतका त्रास देतात तरीही त्यांच्या सुना मनापासून काळजी घेतात, इथे तुला तर काहीच त्रास नाही सासूबाईंचा..हे बघ, आपले माहेरचे संस्कार आपण विसरू नयेत, आपल्या आईने आजीची किती सेवा केलेली बघितलं होतं ना तू??
"ताई..मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते.. पण मी जे सांगेन ते ऐकून तुला कधीच पटणार नाही"
"काही विचित्र कारण आहे का?"
"विचित्रच म्हण..किंवा काहीही म्हण"
"मग सांग ना मला"
"ते असं सांगून कळणार नाही ताई, तू एक काम कर, सतीश असंही आठ दिवस बाहेरगावी गेलेत, घरी मी आणि सासूबाई आहेत फक्त..तर तू राहायला ये आमच्याकडे आठ दिवस आणि सासूबाईंची काळजी घेऊन दाखव.."
"एवढंच ना, मी बॅग घेऊन येते उद्या.."
बहीण गेली, इकडे किर्तीला हसू आलं,
"आता ताईलाही कळूदेत, मी सासूबाईंच्या काळजीत का कमी पडते ते. दुरून बघणं वेगळं आणि प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं..ताईला जर सांगितलं तर तिला समजणार नाही, तिलाच अनुभव घेऊदेत"
(आठ दिवसांनी)
"कीर्ती येते गं मी.."
"सासूबाईंना भेटून तरी जा.."
"अजिबात नको..."
असं म्हणत ताईला रागारागाने निघून जाताना किर्तीने पाहिलं आणि तिला तिचं हसू आवरता आलं नाही, असं काय झालेलं या आठ दिवसात??
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा