Login

कर्म बंधन

गोष्ट तिच्या मृत्यू नंतरची
आज तिला खूप हलकं वाटत होतं. इतक्या वर्षांचे सोसलेले भोगलेले कष्ट, अवहेलना, अपमान, दुःख -सुख हवेत विरून गेल्यासारखे भासत होते. आजूबाजूला एक विचित्र पण शांत, निवांत पोकळी भरून राहिली होती.
डोळ्यांसमोर अंधुकसा उजेड दिसत असला तरी गूढ अंधार तिला खुणावत होता. नवीन जगात प्रवेश करताच तिला खूप काही गमावल्यासारखं वाटलं. मनावरचं ओझं प्रचंड हलकं झालं होतं. राग -लोभ, मत्सर, द्वेष,माया, प्रेम, तिरस्कार अशा अनुभवलेल्या भावना तिला अपरिचित वाटायला लागल्या.

'इतकी वर्ष आपण या भावना कवटाळून बसलो होतो. त्याचा आपल्याला खूप त्रास झाला. त्यापायी अनेक नाती जशी जोडली गेली तशी तोडलीही गेली. मनात साचून राहिलेल्या भावनांना वाट न मिळाल्याने त्याचा हळूहळू शरीरावर परिणाम दिसायला लागला. शरीर थकत गेलं, तसं मनही थकत गेलं.'

हळूहळू तिने पोकळीत प्रवेश केला. ही भावना मात्र समाधानाच्या पलीकडची होती.
'आपण माणूस म्हणून का जन्म घेतला असेल? केवळ सुख-दुःख भोगायचं, मागल्या जन्मात केलेल्या कर्मांची फळं भोगायची, यासाठी? इतरांकडून मिळालेला त्रास, मनस्ताप त्या कर्माच्या नावाखाली का भोगत राहायचा? चुकीचं वागायचं नाही, बोलायचं नाही. इतरांना फसवून आनंद का मिळवायचा नाही? तिला खूप सारे प्रश्न पडले.
'माणूस म्हणून जन्म घेण्याचं कारणच काय? कुठेतरी जन्म घेऊन कुटुंब म्हणून एकत्र यायचं. पुन्हा एकेकाची ताटातूट व्हायची. जुनी नाती हळूहळू विलग होताना नवी नाती जोडायची. जुन्या नात्यांना निरोप देताना डोळ्यांतून अश्रू काढायचे नाहीत. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. का??'

अचानक कुणीतरी तिचा हात धरला. तो स्पर्श, आवाज ओळखीचा वाटत होता. पण डोळ्यांसमोर काहीही दिसत नव्हतं. होती ती केवळ जाणीव.

'कोण?' तिने शब्द उच्चारले. कदाचित ते समोरच्याला ऐकू गेले नसावेत. त्या हाताची पकड जशी घट्ट झाली. तशी तिची चुळबूळ वाढली.

'सोडा.' तिचे हे शब्द कोणीही ऐकले नाहीत.
आता मात्र हाताची पकड तिला नकोशी वाटली. कोणीतरी तिला आत ओढून नेत होतं.
'मला कुठेही जायचं नाही.' पुन्हा एकदा तिने उच्चारलेले शब्द कोणीही ऐकले नाहीत.

बरंच अंतर पार केल्यानंतर ती मिळणारी शांतता तिला असह्य वाटायला लागली. 'आपलं आधीच जीवन छान होतं म्हणायचं. इथं काहीच दिसत नाहीये. ना कोणी माणूस, ना एखादा जीव. ना झाड, रस्ता, नाही एखादी वस्तू! दिवस नाहीत की रात्र नाही. डोळ्यांना दिसतंय म्हणायचं? तरीही काहीच दिसत नाहीये.' तिने हाताची पकड सोडवण्याचा प्रयत्न केला. पण ती सुटलीच नाही.

अचानक तिला काहीतरी आठवलं.
'कर्म..' कर्म कधीच पाठ सोडत नाही म्हणतात.' या विचारासरशी तिला भीती वाटायला लागली. 'म्हणजे ही भावना शिल्लक आहे तर. भीती! नको..मला पुन्हा जन्म नकोय.' तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले.
'आजवर मी कोणाचा सूड घ्यायचा विचार काय.. पण साधं प्रत्युत्तर सुद्धा दिलं नाहीय कोणाला. आपल्याच लोकांनी केलेले अपमान सहन करत राहिले. मनातल्या मनात रडत, कुढत राहिले. माझं सगळं चांगलंच होईल या आशेवर वाईट चिंतणाऱ्या लोकांशी सुद्धा नीट वागत राहिले. पण त्याचं फळ काय मिळालं? हा असा अकाली मृत्यू!'

आता कुठे आपलं अस्तित्व संपलं आहे याची तिला जाणीव झाली. 'मग आपण आहोत तरी कोण? एक अचेतन देह? मन? की आत्मा!' तिने इकडे -तिकडे चाचपडून पाहिलं. एक विचित्र, अनाकलनीय अवस्था तिच्या अवती -भोवती नाचत होती.

तिच्या हातावरची पकड क्षणाक्षणाला जास्तच घट्ट होत चालली होती. त्यामुळे अस्वस्थ झालेली ती त्यातून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. आपण किती दिवस, महिने, किती वर्ष इथे आहोत हेही तिला आठवत नव्हतं.


अचानक तिच्या डोळ्यांसमोर नवा प्रकाश दिसायला लागला. एक वेगळीच जाणीव व्हायला लागली. 'पुन्हा जन्म? नको.. पुन्हा बंधन, आसक्ती, स्नेह, माया, मोह, ताटातूट या फेऱ्यांतून प्रवास नको. मनुष्य जन्म नकोच.' मनातल्या मनात ती जोरात ओरडली. काहीशा भयानक, उद्विग्न अवस्थेत तिच्या जाणिवा काही काळ तशाच भटकत राहिल्या.

मागल्या जन्मी कोणत्या इच्छा मागे राहिल्या असतील? हे तिला आठवणार नव्हतंच. आता समोरचा उजेड स्वच्छ आणि स्पष्ट दिसत होता. इच्छा असूनही कर्माच्या फेऱ्यातून तिची सुटका होणार नव्हती. या जन्मीचं या जन्मातच भोगावं लागत असलं तरी असे किती जन्म घ्यावे लागतील याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं आणि कधी असणारही नव्हतं.
मुक्ती मिळणार नसेल तर हा प्रवास असाच अखंड सुरू राहणार होता, जगाच्या अंतापर्यंत.