कर्मफळ भाग १
@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगावकर
" लवकर आटोपा, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. एक काम धड जमत नाही या बाईला. " श्वेता तणतणत आपल्या सासूबाईंना म्हणजेच रखमाबाईंना म्हणाली.
दरवाज्यातून आत येणाऱ्या सोनालीच्या कानावर आपल्या वहिनीचा आवाज पडला आणि तिला आपल्या आईला होत असलेला त्रास आणि अपमान यांचा खूप राग आला. ती आत आली आणि रागाने श्वेताशी भांडू लागली.
" माझ्या आईशी अश्या भाषेत बोलताना लाज नाही वाटत ? सासू आहे तुझी, याचा विसर पडला की काय तुला ? " सोनाली रागाने म्हणाली.
" एवढा पुळका आहे का आपल्या आईचा ? मग घेऊन जा आपल्या घरी. इथे राहायचं तर काम कराव लागेल. नाहीतर खायला देणार नाही. आणि अजून एक, माझ्या घरात येऊन मला अक्कल शिकवायची नाही. जा आपल्या माउलीला घेऊन लगेच. मला उशीर होतोय. डब्बा तयार आहे की नाही ? " श्वेताने सासूला रागाने विचारलं. त्यांनी मानेने होकार दिला. तिने डब्बा उचलला आणि गेली सुद्धा. आशिष तिचा नवरा आधीच गेला होता.
सोनाली खूप चिडली होती. तिने आईला बसवलं आणि पाणी दिलं.
" आई, ही श्वेता अशी का वागतेय तुझ्यासोबत ? आणि तू तरी का ऐकून घेतेस ? सरळ घराबाहेर काढायचस ना दोघांना. " सोनाली अजूनही रागात होती आणि आईला प्रश्न विचारत होती.
" नाही काढू शकत त्यांना मी घराबाहेर. या दोघांनी मला फसवून प्रॉपर्टीच्या पेपर्सवर माझ्या सह्या घेतल्या. आता मला सर्व घरकाम करायला लावतात. गुडघे दुखतात, वाताचा त्रास होतो. तरी सर्व कराव लागत. नाहीतर जेवण नाही देत गं ते. घराबाहेर कोणाशी बोलताना दिसले तर त्यांच्याकडेच रहा म्हणतात. त्यामुळे ते सुद्धा करू शकत नाही " असं म्हणत त्या रडू लागल्या.
आपल्या आईला असं रडताना पाहून सोनालीला रडू येत होत आणि रागही. तिने आशिष आल्यावर यावर बोलायचं ठरवलं.
संध्याकाळी आशिष आणि श्वेता एकत्र घरी आले.
संध्याकाळी आशिष आणि श्वेता एकत्र घरी आले.
रखमाबाई त्यांच्यासाठी चहा बनवायला उठत होत्या. पण सोनालीने त्यांना थांबवलं आणि आशिषला म्हणाली, " आशिष समोर बस. मला तुझ्याशी बोलायचं आहे. "
आशिष सोबत श्वेतासुद्धा समोर बसते.
" आशिष, ही बाहेरची आहे. पण तू तर रक्ताचा मुलगा आहेस ना ? स्वतःच्या आईसोबत असं वागताना काहीच वाटलं नाही का तुम्हांला ? " सोनाली चिडून म्हणाली.
" हे बघ ताई, तुला जर आईविषयी एवढी कणव आहे तर तिला तुझ्यासोबत घेऊन जा. रोज रोज मला घरात तमाशे नकोत. " आशिष गुर्मीत म्हणाला.
" असं कसं घेऊन जा ? हे घर आईच आहे. तुम्ही जा ना. ती का जाईल ? " सोनाली.
" हे घर आता आमच्या नावावर आहे. त्यामुळे जर त्यांना राहायचं असेल तर......, नको आता अजिबात नकोत सासूबाई या घरात. घेऊन जा त्यांना तुम्ही तुमच्याकडे. " श्वेता रागाने म्हणाली.
" एक विसरू नकोस घर तुम्ही तुमच्या नावे करून घेतलं असलं तरी, तुमच्यावर केस करून हे घर फसवणूक करून घेतलं आहे हे कोर्टात सांगितलं तर आईला परत मिळेलच. तुम्हाला सुद्धा शिक्षा होईल. " सोनाली आता कायद्याची भाषा करत होती. तिला वाटलं हे ऐकून ते घाबरतील आणि माफी मागतील. पण......
क्रमश :
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा