कर्तव्य तिचे -भाग 2 अंतिम

गोष्ट वहिनी आणि नणंदेची
"तू इथे यायला आमची काहीच हरकत नाही. मात्र तुझी सगळी जबाबदारी वहिनीने घेतलेली नाही. हेही लक्षात ठेव आणि अमर दौऱ्यावर असला तरीही तू तुझ्या सासरे राहायला जाऊ शकतेस. सारखं माहेरी येणं बरं दिसत नाही." बाबा पहिल्यांदाच लेकीला बोलले.

"माझं येणं तुम्हाला खटकत असेल तर उद्यापासून मी अजिबात इथं येणार नाही." बाबा आपल्याला बोलले म्हणून दिव्या रागारागाने जेवण संपवून उठली. "आज माझी आई असती तर असं बोलली नसती.

"तुझी आई लेकीच्या प्रेमापोटी बोलली नसती हे खरं. मात्र आपल्या मुलीला कर्तव्याची जाणीव करून देणं हे एका बापाचं कर्तव्य नाही का? इतकी वर्ष मी काहीच बोललो नाही. पण सतत इथे येऊन राहण्यापेक्षा तू तुझ्या सासरची जबाबदारी घे. तुझ्या सासुबाईंशी पटवून घेण्याचा प्रयत्न कर."

इतकं बोलून बाबांनी केदारकडे पाहिलं. जणू त्यांची नजर सांगत होती की हे सर्व काही तू बोलायला हवं होतंस. त्यांच्या नजरेतला मतितार्थ समजून केदारने मान खाली घातली.
"घरात कोणतीही चुकीची गोष्ट घडत असेल तर घरातल्या जबाबदार व्यक्तीचे कर्तव्य हेच असते की त्याने ती गोष्ट दोन्ही बाजू समजून तयार झालेला गुंता सोडवावा. यासाठी घरचा मुख्य माणूस खमका हवा आणि रश्मी तुझं म्हणणं जरी बरोबर असलं तरी ते मांडण्याची पद्धत आणि वेळ वेगळी असायला हवी होती."

"माझं चुकलं बाबा. माझा ताईंवर राग नाही. हे ही त्यांचंच घर आहे. मात्र मी आईकडून काय शिकायला हवं होतं, हे घर कसं चालवावं, कोणते निर्णय कधी घ्यावेत? हे त्यांनी मला चांगल्या शब्दात सांगितलं असतं तर फार बरं झालं असतं." बोलताना रश्मीच्या डोळ्यांत पाणी आलं.
"ताई माझ्याशी असंच फटकून वागणार असतील तर माझ्या मनात त्यांच्याविषयी माया कशी राहील? सासू गेल्यानंतर वहिनीचा, सासरचा आधार नणंद असते. आपल्या सासूची सावली म्हणून ती आपल्या नणंदेकडे पाहते."

"दिव्या, आपण आपल्या आईचा कोणता गुण घेतलाय याचा विचार खरंतर तू करायला हवास. आम्ही तुझ्यावर असे वेडेवाकडे संस्कार कधी केल्याचं मला तरी आठवत नाहीय. वयाने लहान असली तरी वहिनी म्हणून रश्मीचा मान नक्कीच मोठा आहे. तिला पुन्हा असं बोललेलं मला खपणार नाही. आधी वहिनीची माफी माग." बाबा.

केदारने प्रेमाने दिव्याच्या खांद्यावर हात ठेवला. "तू तुझ्या माहेरी कधीही येऊ शकतेस. मात्र आधी तुझ्या हक्काच्या घरातल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. आम्ही सगळेच तुझ्या पाठीशी कायम उभे आहोत."

"केदार, जेवणं आटोपली आहेत. दिव्याला तिच्या सासरी सोडून ये." बाबा 'सासरी ' या शब्दावर जोर देत म्हणाले. हे ऐकून दिव्याने आत जाऊन आपली बॅग भरली. वहिनीची माफी मागण्याइतकं तिचं मन मोठं नक्कीच नव्हतं. ती तशीच जाऊन गाडीत बसली.

इकडे रश्मीने मात्र मनोमन ठरवलं. समोरच्याच्या मनात आपल्याविषयी माया नसेल, किंवा त्याला आपल्या मनातले प्रेम समजत नसेल तर आपल्या हातात उरतं ते केवळ कर्तव्य. मग इतर गोष्टी मनाला लावून न घेता आपण फक्त आपलं कर्तव्य पूर्ण करत राहायचं. याचे परिभाषा वेगळीच असते. कोरडा म्हणाला केवळ करायचं म्हणून केलेलं कर्तव्य आणि जबाबदारी खांद्यावर घेऊन केलेले कर्तव्य हे निराळंच असतं. नाही का?

समाप्त.
सायली धनंजय जोशी.

🎭 Series Post

View all