Login

कर्तव्य ( भाग ३ अंतिम )

एका कर्तव्यनिष्ठ स्त्रीची कथा
विषय - थोरलेपण

कथेचे नाव - कर्तव्य ( भाग ३ )

ऑफिसच्या कामामध्ये संध्या अत्यंत चोख असल्याने तिचे वरिष्ठ जगदाळे सरांची तिच्या कामावर मर्जी बसली होती. ऑफिसच्या महत्त्वाच्या कामाकरता लोणावळ्याला जाण्यासाठी सरांनी संध्याची निवड केली होती. एका दिवसात कामे आटपून संध्या रात्री घरी येणार होती. लोणावळ्यामधील कामे आटपून ते दोघे पुन्हा मुंबईमध्ये येण्यास निघाले असता अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. जगदाळे सरांच्या ड्रायव्हरला रस्त्यावरील समोरचे काहीच दिसत नसल्याने जगदाळे सरांनी शेवटी एका जवळच्या हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःसाठी आणि संध्यासाठी अशा दोन रूम बुक केल्या. ड्रायव्हरची सोय हॉटेलमधील स्टाफ रूममध्ये केली.

रूममध्ये गेल्यावर संध्या शॉवर घेऊन फ्रेश झाली. जगदाळे सरांनी तिच्यासाठी रूममध्ये सँडविच मागवले होते आणि ते स्वतः त्यांच्या रूममध्ये ड्रिंक घेत बसले होते. बाहेर तुफान पाऊस पडत होता. विजांचे तांडव आणि ढगांच्या गडगडाटाने संध्या खूप घाबरली होती. सरांच्या रूममध्ये जावे की न जावे हा विचार करत तिने तिचे सँडविच संपवले होते. इतक्यात अक्राळविक्राळ वीज चमकली आणि त्यापाठोपाठ प्रचंड आवाजात गडगडाट झाल्यावर मात्र संध्याने धावतच सरांच्या रूमची बेल वाजवली. सरांनी दार उघडल्यावर ती घाबरून सरांच्या कुशीत शिरली. जगदाळे सरांना जवळपास पाच वर्षांनी एका स्त्रीचा स्पर्श लाभला होता. जगदाळे सरांची बायको कजाग, शंकेखोर असल्याने तिच्याबरोबर तब्बल दहा वर्षे संसार केल्यावर सरतेशेवटी जगदाळे सर पाच वर्षांपूर्वी तिच्यापासून विभक्त झाले होते. मुलबाळ नसल्याने एकटे जीवन ते आनंदाने जगत होते.

संध्या सरांच्या कुशीत शिरल्यावर त्यांनी तिला मिठीत घेतले. संध्याला देखील दोन वर्षांनी एका पुरुषाचा स्पर्श लाभला होता. जगदाळे सरांनी संध्याला उचलले आणि बेडवर झोपवले. तिचे प्रदीर्घ चुंबन घेऊन त्यांनी तिच्या सर्वांगावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. एक एक करून सर तिचे कपडे काढू लागले होते. तिचे शरीर कुरवाळत होते. संध्या तिच्या शरीराची भूक थोपवू शकत नव्हती. सरांच्या कृतीने तिची कामेच्छा जागृत झाली होती. ती देखील तितक्याच उत्कटतेने सरांना प्रतिसाद देत होती. तिने तिचे सर्वस्व जगदाळे सरांना बहाल केले. रात्रभर ते दोघे प्रणयरसात न्हाऊन निघाले होते. प्रणयाने तृप्त होऊन जवळपास पहाटे त्या दोघांना झोप लागली.

सकाळी जाग आल्यावर संध्याला जाणीव झाली की ती विवस्त्र असून सरांच्या बाहुपाशात आहे. अपराधीपणाची भावना तिच्या मनात दाटून आली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने भराभर अंगावर कपडे चढवले. तेवढ्यात सरांना जाग आली. संध्याला समोर रडताना पाहिल्यावर त्यांना देखील कसेनुसे झाले होते. त्यांनी संध्याला जवळ घेतले.

"संध्या, काल रात्री जे आपल्यामध्ये घडलं त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो." जगदाळे सर म्हणाले.

"सर! तुम्ही क्षमा नका मागू. जे काही झालं त्यामध्ये तुमच्या एकट्याची चूक नव्हती. मी सुद्धा वाहवत गेले होते. आता त्या गोष्टीबद्दल खूपच अपराधीपणा वाटतो आहे. मी माझ्या घरच्यांना कसं तोंड दाखवू? त्यांचा विश्वास मी गमावून बसले आहे. माझं पाऊल कसं घसरलं तेच मला समजलं नाही. मी खूप मोठं पाप केलं आहे. देवसुद्धा मला क्षमा करणार नाही." संध्या म्हणाली.

"हे बघ संध्या, काल जे घडलं त्यासाठी तू स्वतःला अपराधी समजू नकोस. तुला वैधव्य आलं म्हणून तुला तुझ्या इच्छा नाहीत का? निसर्गानेच ही कामभावना सर्व सजीवांना दिली आहे. त्यात तू तरुण आहेस तर साहजिकच तुला वाटत असेलच की कोणीतरी आपल्याला समजून घेणारे, आपल्याला सुख देणारे आयुष्यात हवे. तू एकटी आयुष्यभर कशी राहू शकशील? तुलाही कोणाचेतरी प्रेम हवेसे वाटणारच ना?
संध्या, माझ्याशी लग्न करशील? मी देखील माझ्या आयुष्यात एकटा पडलो आहे. मलाही कोणाचीतरी गरज आहे. नुसतीच शारीरिक गरज नाही तर मानसिक गरज सुद्धा आहे. माझ्या मनातलं बोलायला एक हक्काचं माणूस मला हवं आहे." जगदाळे सर म्हणाले.

"सर! मी आनंदाने तुमच्याशी लग्न केले असते पण मी माझ्या सासूबाईंना वचन दिले आहे की, त्यांच्या मुलाच्या पश्चात मी त्यांच्यासाठी मुलासारखी कर्तव्ये करेन. माझे सासरे गेले कित्येक वर्षे पॅरेलीसीसमुळे अंथरुणात आहेत. नणंद आणि दिर शिक्षण घेत आहेत. सासूबाईंनी अजूनपर्यंत चार घरी जेवणाची कामे करून संसार चालवला. आता कुठे त्यांना सुखाचे क्षण मिळणार होते तर दैवाने त्यांच्या मोठ्या मुलाला त्यांच्यापासून हिरावले. मी माझा स्वार्थ कसा पाहू? माझ्या घरात मला खूप प्रेम मिळाले आहे जे मला आजवर मिळाले नव्हते. माझ्या घरच्यांना मी कसे वाऱ्यावर सोडून देऊ?" संध्या म्हणाली.

"ठीक आहे संध्या. तुला कधीही, कुठलीही गरज लागली आर्थिक, मानसिक, शारीरिक तर मी तुझ्यापाठी कायम खंबीरपणे उभा असेन. ह्यापुढे आपण एकमेकांशी प्रामाणिक राहून आपले नाते सांभाळू. मला माहिती आहे की, तुझ्या आणि माझ्या नात्यावरून समाजात भरपूर नावे ठेवली जातील पण तू कोणालाही घाबरायचे नाही. वेळप्रसंगी आपल्यासाठी कोणीही उभे राहत नाहीत परंतु दोष द्यायला सगळे उभे राहतात. ह्या जगात कोणीही कोणाचे नसते. इतकं लक्षात ठेव कर्तव्ये करताना स्वतःसाठी जगायचे सोडू नकोस. इतकं मोठं आयुष्य तुझ्यासमोर पडले आहे तू तुझ्या मनासारखं जग. केवळ दुसऱ्यांचा विचार करून स्वतःचे आयुष्य उध्वस्त करू नकोस." जगदाळे सर म्हणाले.

संध्याने सरांच्या बोलण्यावर मुक्याने मान डोलावली. सरांचा प्रत्येक शब्द तिला पटला होता. तिच्या रुक्ष झालेल्या जीवनात सरांमुळे तिची जगण्याची उमेद वाढली होती. सरांनी जे सुख तिला दिले होते त्यामुळे ती तृप्त झाली होती. थोडया वेळाने ते दोघे मुंबईला जाण्यास निघाले.

घरी आल्यावर संध्या सासूबाईंच्या नजरेला नजर देत नव्हती. संध्याच्या सासूबाईंनी ओळखले होते की, संध्याच्या बाबतीत काहीतरी वेगळे घडले आहे पण त्यांनी संध्याला त्याबाबत काही विचारले नाही कारण त्यांनाही केदारच्या जन्मानंतर नवऱ्याच्या आजारपणामुळे वैराग्यासारखे जीवन जगावे लागले होते. त्यांनी देखील त्यांच्या इच्छा, आकांक्षा यांचा बळी दिला होता. त्यामुळे संध्याची काळजी त्यांना सतत असायची. संध्याच्या दुःखाची जाणीव त्यांना होती. संध्याच्या सासूबाईंनी तिला दुसरे लग्न कर म्हणून देखील सल्ला दिला होता; पण संध्याने तिच्या कर्तव्यांसाठी दुसरे लग्न करण्यास नकार दिला.

जगदाळे सर त्यांच्या शब्दाला जागले होते. केदारच्या शिक्षणासाठी, कीर्तीच्या लग्नासाठी त्यांनी संध्याला स्वतःहून आर्थिक मदत केली होती. संध्याने तिचे घर आणि जगदाळे सरांना संयमाने हाताळले होते. तिने जगदाळे सरांच्या श्रीमंतीचा कधीही फायदा घेतला नव्हता का तिने आपल्या कर्तव्यांत कधी चुका केल्या होत्या. आपल्या घराची इज्जत जाईल अशी वागणूक तिने कधीही ठेवली नव्हती. लोकं तिच्यापाठी जगदाळे सर आणि तिच्यामधील नात्याविषयी बोलत असत पण ती लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे कारण जगदाळे सरांचा प्रेमाचा भक्कम आधार तिला मिळाला होता.

तीन वर्षांपूर्वी जगदाळे सरांचे हार्ट अटॅकने निधन झाल्यावर संध्या पुरती कोलमडून गेली होती. जगदाळे संध्याच्या नावावर प्रॉपर्टीमधील काही रक्कम ठेवली होती आणि प्रॉपर्टीमधील काही रक्कम सामाजिक कार्यासाठी दान केली होती. स्वतःचे राहते घर देखील संध्याच्या नावावर केले होते. जगदाळे सरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वकिलामार्फत संध्याला ह्या गोष्टी समजल्या होत्या.

केदारचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला भरघोस पगाराची नोकरी मिळाली होती. त्याच्याच ऑफिसमधील विनीसोबत तो लग्न करणार होता. विनीचे वडील आणि जगदाळे सर ह्यांची लहानपणापासूनची मैत्री होती त्यामुळे होणाऱ्या सासऱ्यांकडून संध्याचा भूतकाळ केदारला समजला होता आणि म्हणून त्याला संध्याची घृणा वाटत होती.

"संध्या ए संध्या, अग दार उघड विनी आली आहे." संध्याच्या सासूबाई तिला हाक मारत होत्या. सासूबाईंच्या हाकेने संध्या भूतकाळातून बाहेर आली.
संध्या बेडरुममधून बाहेर आल्यावर विनीने संध्याला मिठी मारली.

"वहिनी! मी केदारला समजून सांगितले आहे. तुमची बाजू मी त्याला समजावून दिली त्यामुळे त्याला सगळे काही पटले आहे. त्याला झालेल्या प्रकाराबद्दल पश्चाताप झाला आहे. वहिनी प्लिज त्याला माफ कराल ना?" विनी म्हणाली.

"विनी, तुझी मी खूप आभारी आहे. तुझ्यासारखीच केदारला समजून घेणारी मुलगी आम्हाला हवी होती. मी केदारविषयी कुठलाही किंतु मनात धरला नाही. मी त्याला कधीच माफ केले आहे; पण झालेल्या गोष्टींमुळे जी नात्यामध्ये भेग पडली आहे ना पुढे जाऊन त्या गोष्टींमुळे कुठल्याही प्रकारचा वाईटपणा येऊ शकतो. आता मी माझ्या मनातले तुमच्याकडे व्यक्त करते आहे ते म्हणजे मी हे घर सोडून जाते आहे. आता मी देखील खूप थकले आहे. केदारने आता घराची संपूर्ण जबाबदारी घ्यावी असे मला वाटते. मी कोणावरही रागावून जात नाही किंवा कोणालाही दोष देत नाही." संध्या म्हणाली.

"वहिनी! तू घर सोडून जाऊ नकोस. हे घर तुझ्यामुळे उभं राहिलं आहे. मी तुला वाईटसाईट बोललो असेन तर मला माफ कर वहिनी, मला माफ कर पण तू इथून जाऊ नकोस." केदार म्हणाला.

"केदार! संध्याला जाऊदे. ती म्हणते ते बरोबरच आहे. कर्तव्ये करून ती थकून गेली आहे. सगळ्यांसाठी ती झिजली आणि तिच्या बाजूने कोणीही कधीही विचार केला नाही. एकत्र राहून नात्यांत दुरावा येण्यापेक्षा तिला तिचे उर्वरित आयुष्य तिच्या मनासारखे जगुदे." संध्याच्या सासूबाई म्हणाल्या.

संध्या सासूबाईंना मिठी मारून खूप रडली. मन हलके झाल्यावर तिने आपले सामान गोळा केले. घरातल्यांचा निरोप घेतला आणि स्वतःसाठी जगायला तिने आपल्या घराचा उंबरठा ओलांडला.