विषय - थोरलेपण
कथेचे नाव - कर्तव्य ( भाग १ )
"वहिनी! तुला वहिनी बोलायला देखील लाज वाटते आहे. तुला मी आईसमान समजत होतो; पण तू आई ह्या शब्दाच्या योग्यतेची नाहीस." केदार आपल्या संध्यावहिनीवर तोंडसुख घेत होता.
"खबरदार! जर तू संध्याला अजून काही बोललास तर." केदारची आई म्हणजेच सुलोचनाबाई म्हणाल्या.
"आई! वहिनीबद्दल तुला काही माहीत नाही म्हणून तू तिच्या बाजूने बोलते आहेस. जर तुला तिचं खरं रूप समजलं तर तू तिला घरातून बाहेर काढशील." केदार म्हणाला.
"मला सारं काही माहीत आहे केदार. तुझ्याकडून वेगळं ऐकायची मला गरज नाही." सुलोचनाबाई म्हणाल्या.
"म्हणजे? आई तुला सारं काही माहीत आहे? तरीही तू वहिनीची बाजू मांडते आहेस? इतक्या वर्षांत तू इतकी कशी तटस्थ राहिलीस? तुला वहिनीची तिडीक कशी नाही आली? तू तिला प्रोत्साहन तरी कसे दिलेस? तुझ्या जागी दुसरे कोणी असते तर वहिनीला हाताला धरून बाहेर काढले असते." केदार तावातावाने बोलत होता.
"केदार! तोंड सांभाळून बोल. तुझ्या वहिनीने जे काही केलं आहे ते आपल्या घरासाठी केले आहे. जेव्हा कार्तिक आपल्याला सोडून निघून गेला तेव्हा तू बारावीला होतास आणि कीर्ती पंधरावीला होती. ह्यांचे आजारपण, तुमच्या दोघांचे शिक्षण, तुमची लग्नकार्य सारं काही संध्याच्या डोळ्यांसमोर दिसत होते. तिने स्वतःचा स्वार्थ न साधता आपल्या घराला एखाद्या पुरुषासारखा आधार दिला. तिने स्वतःचा कधीच विचार केला नाही. तिचा नवरा ऐन तारुण्यात गेला. एखादी म्हणाली असती की, माझा नवरा तर राहिला नाही तर मी कशाला ह्या घराचा विचार करू? तिने आपल्या सर्वांचा विचार केला." सुलोचनाबाई म्हणाल्या.
"आई! वहिनी कुठल्या मार्गाने आपल्या अडीअडचणीला पैसे आणायची हे तुला माहीत असून देखील तू तिची बाजू मांडते आहेस याचेच मला राहून राहून नवल वाटते आहे." केदार म्हणाला.
"केदार, तुला समजणार नाही. एक तरुण विधवा मुलगी जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा अनेकांच्या घाणेरड्या नजरा तिच्याभोवती फिरत असतात. कार्तिक गेल्यावर संध्याला देखील तिचे मन होतेच ना? केवळ संध्या आपले घर चालवते आहे, पैसा पुरवते आहे म्हणून मी सगळं सहन केले असे नाही. मी संध्याच्या बाजूने विचार केला. संध्या विधवा झाली असली तरी देखील तिला जगण्याचा हक्क होताच ना? आणि तिने तिची मर्यादा कधीही ओलांडली नाही. तिच्यावर पूर्ण घर उभे असूनदेखील तिने कधीही त्याची वाच्यता केली नाही. तिने मनात आणले असते तर ती दुसरे लग्न करून मोकळी झाली असती. खरं बघायला गेलं तर तिच्यासाठी आपण तिच्या नवऱ्याच्या मागे मानलं तर देव नाहीतर दगड होतो; पण तिने स्वतःचा स्वार्थ साधला नाही. केदार, तू संध्याच्या बाजूने विचार करून पाहिलेस तर तुला तुझी वहिनी चुकीची वाटणार नाही." सुलोचनाबाई म्हणाल्या.
"आई! केदारला नका बोलू. त्याला नाही समजणार. तुम्ही मला इतके वर्ष समजून घेतलेत त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. केदारला मी घरात नको असेन तर मी हे घर सोडून जाण्यास तयार आहे. केदार आता स्वतःच्या पायावर उभा आहे तर तो हे घर उत्तमरीत्या सांभाळू शकतो. आता त्याची बायको देखील येणार आहे त्यामुळे मी ह्या घरातून निघून जाणे हेच योग्य ठरेल. माझी काळजी करू नका." संध्या म्हणाली.
"संध्या, तू घरातून बाहेर पडणार नाहीस. ह्या घरातून कोण बाहेर पडणार असेल तर केदारला घराबाहेर जावे लागेल. हे घर ह्यांचं आहे त्यामुळे घरात कोण राहील, कोण राहणार नाही हे ठरवण्याचा निर्णय आमच्या दोघांचा आहे आणि तू ह्या घरासाठी जे काही केले आहेस ते एखादा सख्खा मुलगा देखील करू शकणार नाही." सुलोचनाबाई म्हणाल्या.
"आई!" असे म्हणून संध्याने सुलोचनाबाईंना मिठी मारली. संध्याच्या डोळ्यांतून जणू अश्रूंचा पूर आला होता.
केदार दोन क्षणही घरात न थांबता बाहेर निघून गेला. संध्याने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु केदारने तिचे ऐकले नाही. संध्याच्या मनाला खूप त्रास झाला होता. बेडरूममध्ये जाऊन तिने बेडवर तिचे अंग झोकून दिले. संध्याचा उर भरून आला होता. नकळतपणे तिचे मन भूतकाळात शिरले.
(क्रमशः)
सौ. नेहा उजाळे
ठाणे
ठाणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा