विषय - थोरलेपण
कथेचे नाव - कर्तव्य ( भाग २ )
संध्याचे आईवडील एका अपघातात गेले त्यावेळी संध्या अवघ्या दोन वर्षांची होती. संध्याच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त तिला कपडे आणण्यासाठी तिचे आईवडील मार्केटमध्ये जात असताना त्यांच्या स्कूटरला भरधाव ट्रकने उडवले. ते दोघे जागच्या जागीच गतप्राण झाले. लहान संध्याची जबाबदारी तिच्या काका-काकूंनी घेतली. काकाचा खूप जीव होता संध्यावर; पण काकू संध्याचा तिरस्कार करत असे. तिच्या मते संध्याचा पायगुण वाईट आहे आणि तिने तिच्या आईवडिलांना खाल्ले अशी तिने धारणा करून घेतली होती.
संध्याला तिची काकू घरकामात खूप राबवून घेत असे आणि स्वतःच्या मुलीला इकडची काडी तिकडे करून देत नसे. वास्तविक काकाला बायकोच्या ह्या गोष्टी मनापासून आवडत नसल्या तरीही बायकोच्या समोर त्याची बोलायची टाप नव्हती.
संध्याला शिक्षणाची खूप आवड होती. संध्याला माहीत होते की काकू आपल्याला शिक्षण घेऊन देणार नाही त्यासाठी दहावी झाल्यावर तिने लहान मुलांच्या ट्युशन घ्यायला सुरुवात केली त्यातून जे पैसे मिळत असत ते ती काकुला द्यायची. संध्याने बी.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले आणि एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला लागली. त्याच कंपनीमध्ये तिची ओळख कार्तिकशी झाली. कार्तिक खूप महत्त्वाकांक्षी, परोपकारी, प्रेमळ मुलगा होता. संध्या आणि कार्तिकचा स्वभाव मिळताजुळता असल्याने साहजिकच दोघांमध्ये प्रेम फुलू लागले होते. कार्तिकला वास्तविक लग्न लवकर करायचे नव्हते कारण त्याच्यावर पॅरेलीसीस झाल्यामुळे अंथरुणाला खिळलेले वडील, आई, कॉलेजमध्ये जाणारी एक बहीण आणि दहावीत असलेला एक भाऊ ह्यांची त्याच्या अंगावर जबाबदारी होती. कार्तिकच्या आईने चार घरचा स्वयंपाक, लोणची, पापड, मसाले, दिवाळीचे पदार्थ करून मुलांना वाढवले होते. आईच्या मेहनतीची कार्तिकला जाणीव होती त्यामुळे आईला आता कुठलेच कष्ट होऊ नये असे कार्तिकला वाटत असे.
संध्याच्या काकुला संध्याच्या लग्नाची घाई लागली होती. कधी एकदा संध्या आपल्या घरातून जाते असे तिला झाले होते. ती आता ओळखीतल्या लोकांना, नातेवाईकांना संध्यासाठी स्थळ सुचवा म्हणून सांगू लागली होती. संध्याच्या कानावर उडत उडत ही बातमी आली.
"काका-काकू, एक बोलायचे होते तुमच्याशी." संध्या म्हणाली.
"काय बोलायचं आहे?" काकूने संध्याला विचारले.
"माझ्या ऑफिसमध्ये एक कार्तिक नावाचा मुलगा आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचे आहे पण त्याच्यावर घरच्यांची जबाबदारी असल्याने त्याला इतक्यात लग्न करायचे नाही. मुलगा खूप चांगला आहे. तुम्ही दोघे त्याला बघून घ्या." संध्या थोडे चाचरतच म्हणाली.
संध्याकडून ही गोष्ट तिच्या काकुला समजल्यावर तिला मनोमन आनंद झाला कारण जर संध्या प्रेमविवाह करणार असेल तर तिच्या लग्नासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही त्यासाठी कार्तिकला लवकर लग्न करायला आपण भाग पाडले पाहिजे असा विचार तिच्या मनात आला त्यामुळे अगदी प्रेमळपणे तिने संध्याच्या खांद्यावर हात ठेऊन बोलू लागली.
"ठीक आहे संध्या. घे त्याला आपल्या घरी बोलावून. बोलतो आम्ही त्याच्याशी. त्याच्या घरच्यांशी देखील बोलून घेऊ. त्याचं घर पाहून घेऊ." संध्याची काकू म्हणाली.
संध्याने कार्तिकला घरी बोलावले असता काकूने त्याचे खूप छान स्वागत केले.
"कार्तिक! तुम्ही खरोखरच खूप छान आहात. संध्याने अगदी हिरा शोधून काढला आहे; पण कार्तिक तुम्ही म्हणत आहात की तुम्हाला इतक्यात लग्न करायचे नाही तर जरा आमच्या बाजूने विचार करा. संध्याचे लग्न करून देण्याची जबाबदारी पूर्णपणे आमची आहे. उद्या आम्हालाच सगळीकडून नावे ठेवली जातील की, काका-काकू स्वार्थाने संध्याचे लग्न करून देत नाहीत. बिन आईवडिलांची वाढलेली पोर आहे. लवकरात लवकर तिचं चांगलं व्हावं हीच इच्छा आहे आमची. त्यामुळे तुमच्या घरी आम्ही बोलणी करायला कधी येऊ ते सांगा." संध्याची काकू पदराला डोळे पुसण्याचा अभिनय करत म्हणाली.
"काकू, मी माझ्या आईवडिलांशी बोलून तुम्हाला कळवतो." कार्तिक म्हणाला.
कार्तिकने त्याच्या घरी संध्याबद्दल सांगितले असता त्याच्या घरच्यांनी संध्याला लवकर सून म्हणून घरी आण असा त्याच्या पाठी लकडा लावला होता. संध्याचे आणि कार्तिकचे लग्न होऊन संध्याने कार्तिकच्या घरी मोठी सून म्हणून प्रवेश केला.
संध्याने आपल्या प्रेमळ स्वभावाने तिच्या सासरच्या लोकांचे मन जिंकले होते. कार्तिक आणि संध्याने ठरवले की लग्न जरी लवकर झाले असले तरी मुलांचा विचार चार-पाच वर्षांनंतर करू. संध्या घर आणि ऑफिस आणि दोन्ही उत्तमरित्या सांभाळत होती. संध्याची सासू घरकामात तिला मदत करत असल्याने संध्याला सासूचा खूप मोठा आधार होता. संध्याच्या घरचे सर्वजण संध्यावर प्रेम करत असल्याने ती तिच्या संसारात साखरेप्रमाणे विरघळली होती.
हा हा म्हणता संध्याच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली होती. कार्तिकच्या प्रेमात संध्या सुखाने न्हाऊन गेली होती. संध्याचे सुख बहुतेक दैवाला पहावले नाही आणि तो अत्यंत वाईट दिवस उजाडला. संध्याला थोडे बरे वाटत नसल्याने कार्तिक एकटाच त्याच्या बाईकवरून ऑफिसला जाण्यास निघाला होता. एका वळणावर समोरून भरधाव वेगाने एक टेम्पो आला आणि कार्तिकच्या बाईकला त्याने उडवले असता कार्तिकचा जागीच मृत्यू झाला.
आईवडील आणि नवऱ्याचा मृत्यू एकाच पद्धतीने झाल्यामुळे संध्याच्या दुःखाला पारावार उरला नव्हता. दोन्ही क्षणी संध्याला मात्र जीवनदान मिळाले होते. कार्तिकच्या घरच्यांनी शोकाकुल अवस्थेत कार्तिकचे मरणोत्तर कार्य पार पाडले होते. संध्या तर एखाद्या निर्जीव पुतळ्याप्रमाणे झाली होती. आपल्या मुलाचे दुःख बाजूला सारून शेवटी संध्याच्या सासूबाईंनी मनाचा हिय्या करून संध्याशी बोलायचे ठरवले.
"संध्या! तुझ्यावर, आपल्या सर्वांवर खूपच कठीण प्रसंग आला आहे. जाणारा तर गेला पण म्हणून आपल्या सर्वांना जोवर जीव आहे तोवर जगावे तर लागणारच ना? कार्तिकला आवडलं असतं का तुला इतकं भकासलेलं पाहून? तुला तुझ्या भविष्याचा विचार करायला हवा ना?" संध्याच्या सासूबाई संध्याला जवळ घेऊन म्हणाल्या.
"आई! तुमचं मन किती मोठं आहे. लहानपणी माझे आईवडील अपघातात गेले तर मला अपशकुनी ठरवले गेले होते. आता माझा नवरा गेल्यावर मला पुन्हा अपशकुनी शिक्का मिळणार ना? आई, मी खरंच अपशकुनी आहे हो. माझ्यावर जी माणसे प्रेम करतात ते दुरावले जातात. आई! माझं नशीब असं का आहे? आई प्लिज मला तुमच्यापासून दुरावू नका. प्लिज मला इथेच राहू द्या. कार्तिक नसला तर काय झालं? मी तुम्हाला वचन देते की, कार्तिकची सगळी कर्तव्ये मी पार पाडेन पण आई मला घराबाहेर काढू नका. तुमचे माझ्यावर खूप उपकार होतील." संध्याच्या डोळ्यांतील पाणी ठरत नव्हते.
"नाही बेटा. तुला आम्ही घराबाहेर नाही काढणार. कार्तिक गेला ह्यात तुझी काय चूक होती? त्याच्या नशिबात तेवढंच आयुष्य असेल तेवढे जगून तो निघून गेला." सासूबाईंच्या प्रेमळ शब्दाने संध्याच्या मनाला उभारी आली होती.
कार्तिकच्या मृत्यूनंतर एक महिन्यांनी संध्या ऑफिसला जाऊ लागली कारण कीर्ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आणि केदार बारावीत शिकत असल्याने घरामध्ये कमवून आणणारे कोणीच नव्हते.
संध्याच्या ऑफिसमध्ये काही लोकांनी तिच्याविषयी हळहळ व्यक्त केली तर काही एकटी स्त्री म्हणून अंगचटीला येऊ लागले होते. संध्या हुषारीनेच सगळ्यांशी अंतर राखून वागत होती. तरीही त्या दिवशी एका मोहाच्या क्षणी ती स्वतःला सावरू शकली नव्हती.
(क्रमशः)
सौ. नेहा उजाळे
ठाणे
ठाणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा