कर्तव्य. भाग 1

About Duty

"अगं सीमा,तुझे मिस्टर घरी आहेत का?"

मनिषाने सीमाला फोन करून विचारले.

"नाही गं, ते गावी गेले आहेत.काही काम होते का?" सीमा म्हणाली.

"काही काम नव्हते गं.अगं आपल्या बिल्डींगमधील अर्चना आहे ना..ती तुझ्या मिस्टरांविषयी माझ्याजवळ बोलत होती." मनिषा म्हणाली.

"कशाबद्दल? काय झाले?" सीमाने साशंकतेने मनिषाला विचारले.

"अगं मी आता बाहेरून आली,तेव्हा ती अर्चना वॉचमनला सांगत होती की, ती जिथे तिची टू व्हिलर लावते तिथेच तुझ्या मिस्टरांनी त्यांची टू व्हिलर लावली.आणि एवढेच नाही तर तिने वॉचमनकडून तुमची गाडी काढून दुसरीकडे लावली.मी दिसल्यावर ती मलाही सांगत होती की, तुझे मिस्टर मुद्दामहून असे करतात."

मनिषाने सीमाला सर्व सांगितले.

"अगं पण ती जिथे तिची टू व्हिलर लावते ती तिची पार्किंग नाही आहे.तिथे कोणीही गाडी लावू शकतात ना? "

सीमा म्हणाली.

"तुझे म्हणणे बरोबर आहे.पण ती त्या जागेवर कोणालाच गाडी लावू देत नाही. अगोदरपासून ती तिथे गाडी लावते आहे. जाऊ दे तू नको टेंशन घेऊ. तुझे मिस्टर गावाहून आले की मग बघू." मनिषा म्हणाली.

मिस्टर गावाहून येतील.. मग बोलू तोपर्यंत सीमाला राहवले नाही. तिने लगेच तिच्या मिस्टरांना फोन करून विचारले की, 'तुम्ही गाडी दुसरीकडे न लावता तिथे का लावली?ती अर्चना तुमच्या नावाने ओरडते आहे आणि वॉचमन ला सांगून तिने आपली गाडी दुसरीकडे लावली.'

सीमाच्या मिस्टरांनी तिला सांगितले की, 'तिथे जागा रिकामी होती आणि ती कोणाची पार्किंग नाही,सोसायटीची जागा आहे. कोणीही तिथे गाडी लावू शकतो म्हणून मी तिथे गाडी लावली.'

मिस्टरांशी बोलणे झाल्यावर सीमाने अर्चनाला फोन करून सांगितले की,
'तुम्हांला काय प्रॉब्लेम होता तो मला प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करून सांगितला असता. आपण तो सोडवला असता. माझ्या मिस्टरांविषयी इतरांजवळ बोलायची काय गरज होती ? ती जागा तुमची स्वतः ची नाही. ती सोसायटीची जागा आहे.तुम्ही अगोदरपासून तिथे गाडी लावतात म्हणून ती जागा तुमची होते का? तुमची गाडी तिथे नव्हती.ती जागा रिकामी होती म्हणूनच माझ्या मिस्टरांनी तिथे गाडी लावली.आमची गाडी तिथे लावलेली असताना, तुम्ही वॉचमनकडून ती गाडी दुसरीकडे लावली आणि तुमची गाडी तिथे लावली.त्यापेक्षा तुम्हीच तुमची गाडी दुसरीकडे लावली असती तर काय फरक पडला असता?'
सीमा अर्चनाला म्हणाली.

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all