कर्तव्य. भाग 2

About Duty

पण अर्चनाच्या डोक्यात सीमाचे म्हणणे जात नव्हते किंवा तिच्या डोक्यात एकच गोष्ट पक्की बसली होती की, अगोदरपासून ती त्या जागेवर गाडी लावते त्यामुळे फक्त तिनेच तिथे गाडी लावावी. इतर कोणीही तिथे गाडी लावू नये.या सर्व गोष्टी मुळे ती सीमाचे म्हणणे ऐकून घेत नव्हती आणि उलट सीमालाच म्हणाली
"मी तिथे गाडी लावते.हे माहित असून सुद्धा तुमचे मिस्टर मुद्दामहून तिथे गाडी लावतात."

हेचं ती सीमाला पुन्हा पुन्हा सांगत होती.

आपले म्हणणे अर्चनाला समजत नाही किंवा तिला समजून घ्यायचे नाही. त्यामुळे सीमाने तिच्याशी जास्त वाद केला नाही.

अर्चनाचा नवरा दुसऱ्या गावी नोकरीला होता.ती मुलांच्या शिक्षणासाठी इथे राहत होती.बिल्डींगमध्ये तिचे कोणाशी जास्त पटत नव्हते. कोणत्या ना कोणत्या कारणाने कोणाशी तरी वाद सुरू असायचा.एक दोन वेळेस तर तिने पोलिसात तक्रारही केली होती.तिच्या अशा वागण्यामुळे तिच्या वाटेला कोणी जात नव्हते.


सीमाला व तिच्या मिस्टरांना आपले म्हणणे जरी योग्य वाटत होते;पण अर्चनाची वागणूक पाहून त्यांनीही तिच्याशी जास्त वाद न घालता गाडीचा विषय तिथेच संपवला.
अर्चना जिथे गाडी लावत होती,ती जागा तिची वैयक्तिक जागा किंवा तिची पार्किंगही नव्हती.ती सोसायटीची अतिरिक्त जागा होती. तिथे सोसायटीतील कोणीही गाडी लावू शकत होते.प्रत्येकाला फोर व्हीलर साठी पार्किंग दिलेली होती.टू व्हिलर साठीही ही वेगळी जागा होती.सोसायटीतील कोणीही गाडीच्या जागेवरून वाद करत नव्हते. फक्त अर्चनाच अशी होती की,जी त्या जागेवर तिचा हक्क दाखवित होती.अनेकांनी तिला समजावून सांगितले.सोसायटीतील कमिटी मेंबर्सने ही तिला सांगितले.पण तिच्यात काहीही फरक पडत नव्हता. शहाण्यांनी मूर्खांच्या नादी लागू नये. असेच सर्वांना वाटू लागले होते. त्यामुळे सोसायटीत जास्त वाद वाढू नये. शांतता रहावी.यासाठी याविषयावर कोणी बोलत नव्हते. तेवढी जागा सोडून दुसरीकडे आपल्या गाड्या लावत होते.पण अर्चनाला कधीही आपल्या वागण्याबद्दल वाईट वाटत नव्हते. आपलेच बरोबर आहे. असे तिला वाटत होते.

सीमाचा नवराही त्या जागेवर आपली गाडी न लावता दुसरीकडे लावू लागला.या अगोदरही तो त्या जागेवर कधी गाडी लावत नव्हता; पण त्या दिवशी तो घाईत होता आणि जागाही रिकामी दिसली म्हणून त्याने तिथे गाडी लावली होती. अर्चनाने तेवढेही समजून घेतले नाही.

अर्चनाचा स्वभाव,वागणे पाहून सर्वजण तिच्याशी सांभाळून वागत होते.


असेच सर्व शांततेत सुरू होते.

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all