कर्तव्य. अंतिम भाग

About Duty

एके दिवशी सीमाचे मिस्टर आपल्या कामासाठी बाहेर जात होते.आपली गाडी काढतच होते;तेवढ्यात अर्चनाचा मुलगाही बाहेर जाण्यासाठी त्याची गाडी काढत होता.अर्चनाच्या स्वभावासारखाच तिच्या मुलाचा व मुलीचा स्वभाव होता.आईचे वागणे पाहून तेही तसेच सर्वांशी वागत होते.गाडी काढता काढता सीमाच्या मिस्टरांची आणि अर्चनाच्या मुलाची अचानक नजरानजर झाली. सीमाच्या मिस्टरांना त्या मुलाच्या डोळ्यात, वागण्यात अहंमपणा,गर्विष्ठपणा जाणवला.आमचे कोणीच काही करू शकत नाही. असा अटिट्यूड त्याच्यात दिसत होता आणि त्याच अटिट्यूड मध्ये तो गाडी घेऊन बाहेर गेला.सीमाच्या मिस्टरांना एक फोन आला म्हणून ते फोनवर बोलू लागले.फोनवरचे बोलणे झाले आणि मग तेही आपली गाडी घेऊन बाहेर निघाले. सोसायटीच्या बाहेर गेल्यावर,थोडे अंतर गेल्यानंतर रस्त्यावर त्यांना लोक जमा झालेले दिसले. नक्कीच काही तरी झालेले आहे. या मानवी विचाराने आणि माणुसकीच्या नात्याने त्यांनी तेथे जवळ जाऊन पाहिले..तर.त्यांना तिथे अर्चनाच्या मुलाचा अपघात झालेला दिसला.वेगाने गाडी चालवण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याचा अपघात झालेला होता.त्याच्या हातापायाला लागलेले होते.तो बोलण्याच्या स्थितीत नव्हता. जमलेले लोक त्याला मदत करत होते.त्याची स्थिती पाहून सीमाच्या मिस्टरांनी त्याला पटकन जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्याच्या आईला फोन करून सांगितले. त्याची आई घरी नव्हती. कामासाठी बाहेर गेलेली होती. ती हॉस्पिटलमध्ये आली तोपर्यंत तिच्या मुलावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते.

"घाबरू नका, तुमचा मुलगा व्यवस्थित आहे. जास्त काही लागलेले नाही. काळजी नका करू."

सीमाचे मिस्टर अर्चनाला म्हणाले.

मुलाच्या अपघाताचे ऐकून अर्चना अगोदरच खूप घाबरलेली होती आणि हॉस्पिटलमध्ये सीमाच्या मिस्टरांना पाहून तिला ओशाळल्यासारखे झाले. 'आपण यांच्याशी इतके वाईट वागलो आणि तरीही यांनी आपल्या मुलासाठी हे सर्व केले.' असा विचार तिच्या मनात आला आणि तिने सीमाच्या मिस्टरांना 'थँक्यू' असे म्हणून धन्यवाद दिले.
असे म्हणत असताना तिच्या डोळ्यात पाणी होते. हे अश्रू म्हणजे मुलाच्या काळजीचे की वाईट वागणुकीचा पश्चाताप? असा विचार सीमाच्या मिस्टरांच्या मनात आला.

अर्चनाची व तिच्या मुलांची सोसायटीतील वागणूक पाहून,सीमाच्या मिस्टरांना त्यांचा राग येत होता आणि त्यामुळे ते त्यांच्याशी बोलतही नव्हते.

जेव्हा त्यांनी अर्चनाच्या मुलाचा अपघात झालेला पाहिला तेव्हा 'आपण का याची मदत करावी?' असा विचार त्यांच्या मनातही आला नाही. त्याला मदतीची गरज आहे आणि माणुसकीच्या नात्याने त्याला मदत करणे. हे आपले कर्तव्यच आहे. असे सीमाच्या मिस्टरांना वाटले आणि म्हणून त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले.
आपल्या या मदतीमुळे अर्चनावर,तिच्या मुलांवर काही चांगला परिणाम होईल, आपण मदत करून त्यांच्या वर उपकार वगैरे करत आहोत. असा विचारही सीमाच्या मिस्टरांच्या मनात आला नाही.

जीवनात आपण कळत नकळतपणे अनेक कर्तव्य पार पाडत असतो.नात्यात,मैत्रीत,
समाजात अनेक भूमिका सांभाळायच्या असतात. तेव्हा काही कर्तव्य आपण स्वतः हून निवडलेली असतात तर काही आपल्याला समाजाने, कायद्याने,संविधानाने दिलेली असतात. ती कर्तव्ये प्रत्येकाला पार पाडावी लागतात.
सीमाच्या मिस्टरांनी अर्चनाच्या मुलाला मदत करून एक चांगला व्यक्ती म्हणून, माणुसकी म्हणून आपले कर्तव्य पार पाडले होते.त्यांनी अर्चनाच्या,तिच्या मुलांच्या वाईट वागणुकीबद्दल मनात कटुता ठेवून त्याला मदत केली नसती तर त्यांच्या मनाला वाईट वाटले असते आणि आपल्यातील माणुसकी हरवल्याची खंत आयुष्यभर वाटत राहिली असती.
पण त्यांनी तसे न करता आपले कर्तव्य पार पाडले होते.


या प्रसंगानंतर जेव्हाही अर्चना व तिचे मुले कधी सीमाच्या मिस्टरांच्या समोर येत होते,तेव्हा अगोदरसारखा उर्मटपणा वगैरे कधी त्यांच्यात दिसला नाही.


समाप्त
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all