कर्तृत्व भाग १
@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगावकर
" हिची काय ओळख करून द्यायची ? ओळख करून देण्या एवढं काहीही कर्तृत्व नाहीये हीच. मी तरी हिला एक मोलकरीण पेक्षा जास्त काही समजत नाही. " सीमा आपल्या मैत्रिणींना बोलली आणि चहा- नाष्टा घेऊन आलेल्या मीराकडे तुसाडेपणाने कटाक्ष टाकला. हे ऐकून मीराच्या डोळ्यात पाणी उभं राहील.
" वहिनी ss, ती माझी बायको आहे हे विसरलात वाटत ? " श्रेयस घरात येत म्हणाला.
खरंतर त्याला अवेळी आलेलं पाहून सीमा गोंधळाली, पण तिच्यातला कटवटपणा तिला शांत बसू देत नव्हता.
" याचंच तर दुःख आहे मला, की ती तुमची बायको आहे भाऊजी. तुम्ही एवढे मल्टीनॅशनल मध्ये जॉब करणारे. तुम्हांला साजेश्या मुली लगेच मिळाल्या असत्या. लांब कशाला माझ्या छोट्या बहिणीसाठी तुमचा विचार सुरू होता घरी. तीस हजार पगार घेते ती. दिसायला सुद्धा सुंदर आहे पण तुम्हाला ही १२ पास गावछाप आवडली. स्वतःच्या, या घराच्या स्टेटसचा तरी विचार करायचा. " सीमा एवढे दिवस साचलेली गरळ ओकत होती.
" वहिनी पहिली गोष्ट, काहीही झालं तरी माझ्या बायकोचा अपमान करण्याचा हक्क कोणालाच नाहीये. दुसरी गोष्ट, ज्या छोट्या बहिणीच्या नावाने स्तुतीसुमने उधळत आहात ना, ती दर सहा महिन्यांनी बॉयफ्रेंड बदलते. ही गोष्ट आपल्या सर्व समाजात माहित आहे म्हणून तिचं लग्न जमत नाहीये. आणि ज्या तीस हजार पगारच्या गोष्टी करताय तो तिला स्वतःच्या दिसण्यावर उधळायला सुद्धा पुरतं नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात काय करायचं ते तुम्ही ठरवू नका. त्यापेक्षा स्वतःच्या बहिणीला सुधारा, ते जास्त उपयोगी पडेल. आणि हो या पुढे माझ्या बायकोला बोललेलं मी खपवून घेणार नाही. " श्रेयस आज आपल्या बायकोचा सर्वांसमोर होणारा अपमान बघून चिडला होता.
तेवढ्यात सीमाला दारात तिचा नवरा पराग उभा दिसला. त्याला पाहून तीने सुरुवात केली.
" पाहिलात का ? ही आल्यापासून भाऊजी सुद्धा किती बदललेत ते ? आता ते मला ऐकवत आहेत. माझ्या एवढ्या मैत्रिणींसमोर माझा अपमान केला. " सीमा चिडून म्हणाली.
" हे बघ सीमा, मी आणि श्रेयस सोबतच आलो आहोत. फक्त मी त्याच्या मागे होतो. तुझा आवाज ऐकून मी मागेच थांबलो. पण तू जे काही बोललीस ते सर्व मी ऐकलं आहे. त्यामुळे काय ते तू तरी मला सांगू नकोस. " पराग चांगलंच रागात होता.
भांडण वाढताना पाहून मीरा मध्ये पडत म्हणाली, " अहो राहू दया ना. दादा तुम्ही पण शांत व्हा. शब्दाने शब्द वाढत जातो. चला आत मी चहा आणते. "
" वाह... तू आल्यापासून या घरात भांडण सुरू झालं. तुझ्यामुळे माझ्या मैत्रिणींसमोर माझ्या नवऱ्याने आणि माझ्या दिराने माझा अपमान केला आणि आता तू थांबवून तू महान आहेस, हे दाखवतेस ? " सीमा पुन्हा रागाने म्हणाली. भांडण वाढताना पाहून सीमाच्या मैत्रिणी निघून गेल्या वाद मात्र प्रचंड पेटला.
पराग - श्रेयस चांगले कमावते होते. शिवाय वडील चांगली संपत्ती सोडून गेले होते. चार मजली इमारत होती. सीमा शिकलेली होती पण जॉब करण तिला जमत नव्हतं. घरी सुद्धा बऱ्याच कामांना बाई होती. आधी काही वेळी स्वयंपाक सासूबाई करायच्या तर कधी बाई. मीरा घरात आपल्यापासून सर्व मीरानेच सांभाळलं होत. सीमाने फक्त लग्नाआधी बापाचा आणि लग्नानंतर नवऱ्याचा पैसा उधळला होता. तिच्या डोक्यात स्वतःच्या छोट्या बहिणीला जाऊ म्हणून श्रेयससाठी बोलायचं होत, पण मित्राच्या लग्नात गेलेला श्रेयस मीराला पाहून स्वतःला हरवून बसला. सर्वांच्या परवानगीने त्याने मीरासोबत लग्न गाठ बांधली होती.
सीमाला मात्र मीरा डोळ्यासमोर सुद्धा नको होती. दुसऱ्या दिवशी भावाकडून परत आल्यावर सुमनताईंच्या कानावर सर्व प्रकार आला आणि हे परत होऊ नये म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला.
क्रमश :
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा