कर्तव्य मतदानाचे (भाग१)

कथा मालिका
कर्तव्य १

मतदार राजा जागा हो
लोकशाहीचा धागा हो...

अशा घोषणा देत एका शाळेचे काही विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांसोबत पथनाट्य सादर करत असतात.

गावातील चौकात, गावातील प्रसिद्ध मंदिर अशा ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण चालू होते. पथनाट्य बघण्यासाठी बरीच गर्दी झाली होती. पथनाट्यातून मतदान करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करून कर्तव्याची जाणीव करून देत होते.

"ए ऐक जरा मतदारा, तुला लोकशाहीची आण...
कर खुशाल निर्भयतेने , तुझ्या हक्काचं मतदान...."

एका शिक्षकाचे छान सादरीकरण चालू होते. पण ते बघण्यासाठी जमलेल्या या गर्दीमुळे समोर जाताच येत नव्हते. राजेश सारखे अनेक लोक या गर्दीला वैतागून शिव्या घालत होते. तर काही लोक मुलांना आणि शिक्षकांना टाळ्या वाजवून दाद देत होते. कौतुक करत होते. हाॅर्न वाजवून राजेश कंटाळला होता. कधी एकदाच घरी जातो आणि कधी बातमी देतो असे त्याला होऊन गेले.

'काय वैताग आलाय यार ! ' राजेश स्वतः शीच बोलत होता.

निवडणूकचे वारे वाहू लागले होते. त्यामुळे प्रचार सुरू झाला होता. गल्लोगल्ली फिरत स्वतः च्या पक्षाच्या नेत्यांचा कार्यकर्ते प्रचार करत होते. जागोजागी जाहिराती लावत फिरत होते.

हळुहळु गर्दी ओसरायला लागली. तसा राजेशही निघाला. राजेश खूप आनंदात घरी पोहोचला. त्याचा आनंदी चेहरा पाहून...

"राजेश काय झाल आहे ? एवढा कसला आनंद झाला?"

"बाबा, बाबा आमच्या कंपनीने सोमवारची सुट्टी दिली आहे. त्यामुळे मी शुक्रवारची सुट्टी टाकून दिली. लागोपाठ चार दिवसांच्या सुट्ट्या मिळत आहे. त्यामुळे बाहेर फिरायचा मी प्लॅन केला आहे. आई बाबा तुम्ही तयारी करा."

"अरे वा ! मस्त." प्रतापराव

"पण रागिणीला सुट्टी मिळाली का?"

"हो बाबा. मिळाली आहे.

"बाबा, बाबा आपण फिरायला कुठे जाणार?" छोटा राघव धावतच राकेशजवळ आला.

"बाबा, आपण समुद्रावर फिरायला जाऊ या ना." राघव

जेवणाच्या वेळी प्रताप रावांनी विषय काढला.

"राजेश , रागिणी सोमवारी तुम्हाला नेमकी कशाची सुट्टी भेटली आहे? "

"अहो, आजोबा ते मतदान आहे ना. बोटावर शाई लावतात आणि सगळेजण फोटो काढतात." राघव बोलला.

"अरे वा ! हुशार आहे राघव तू." प्रतापराव बोलले.

तेवढ्यात रागिणी बोलली. "चला तीन दिवस निवांत."

"मी पण येणार आहे मतदानाला तुमच्या सोबत."

"अरे , आम्हीच नाही जाणार आणि तुझ काय काम तिथे?"

"ए, राजेश आपण नाही जाणार म्हणजे!" मृणाल ताई बोलल्या.

"अग आई , आपण चार दिवस फिरायला चाललो आहोत ना ! मग मतदानाच्या दिवशी रात्रीच येऊ आपण."

"हे कोणी ठरवल आणि का ? कशासाठी?"

"आई, मी बाबांशी बोललो या विषयावर ? ते सुद्धा हो म्हटले."

"राजेश मी कधी हो म्हटल? एक महत्वाचं मी आणि तुझी आई कुठेही येणार नाही ?"

"हो, आम्ही मतदान सोडून कुठेही जाणार नाही?" मृणालताईनी सुध्दा बाबांच्या हो ला हो म्हटले.

"पण आई , बाबा मला लागोपाठ कशीबशी सुट्टी मिळाली आहे. तुम्ही आता नको म्हणता. एरवी बाहेर चलण्यासाठी मागे लागतात."

"अरे, पण का नको म्हणतो ते तर ऐक."
राजेश नाईलाजाने ऐकायला तयार झाला.

©® अश्विनी मिश्रीकोटकर