कर्तव्य मतदानाचे(भाग २अंतिम भाग)

कथा मालिका
कर्तव्य २

"राजेश अरे का नको म्हणतोय ते तरी ऐक."

"कारण? तुला जरी शनिवार आणि रविवार सुट्टी असली तरी सोमवारी मतदान आहे. तेव्हा आपण संध्याकाळी पोहचू. मग मतदान कसे करणार? मतदानाच्या दिवशी सगळेच बाहेर गेलो. तर आपल मत वाया जाणार."

"पण बाबा आपण कोणालाही मत दिले आणि नाही दिले तरी आपल्याला फरक पडतच नाही.‌ आपली परिस्थिती कुठे बदलणार. त्यांची कर्तव्ये ती कुठे पार पाडातात. गेली बारा वर्षे आपल्याला पाणी नाही. कोणी आलं का आजपर्यंत दारात. की तुम्हाला काही त्रास आहे का विचारायला. प्रचार करतात म्हणे? "

"अरे, तू बोलतोय ते चुकीचे नाही. पण परिस्थिती समजल्याशिवाय ती बदलणार कशी? त्यासाठीच तर हे नेते असतात. आपल्याला सुख सुविधा उपलब्ध करून देतात."

"बाबा, मी तुमच्या मतांच्या विरोधात आहे. माझी आणी राधिका ची नोकरी इथेच आहे म्हणून ठीक आहे. नाही तर आम्हाला तेवढ्या कारणासाठी यायला देखील पुरत नाही. मग तेव्हा काय करणार? अशी बरीचशी लोक आहेत. जे मतदान करायला येऊ शकत नाही."

"मग मी तेच तर सांगतोय. की मत वाया जातात. म्हणून आपणही तीच चूक करायची का? मतदानाचे कार्य पार पाडण्यासाठी अनेक लोक झटत असतात. अनेक शिक्षकांना प्रशिक्षण देतात. घरोघरी जाऊन यादी गोळा करतात. नवीन मतदाराची चीट पोहचवातात. मतदानाच्या आदल्याच दिवशी सर्व साहित्य घेऊन मतदान केंद्रावर जावे लागते. तेही आपल गाव सोडून बाहेरगावी जावे लागते. महिला शिक्षिका असो किंवा पुरुष त्यांना अनेक असुविधांचा सामना त्यांना करावा लागतो. पाणी , स्वच्छता , निवास व्यवस्था , जेवण अशा अनेक सुविधांचा केंदावर अभाव असतो. तरीही महाराष्ट्र शासनाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना या कामासाठी नेमल जाते. अरे रात्री घरी झोपायला उशीर होतो आणि सकाळी पाच पासून कामाला लागावे लागते. तसेच गावातील अनेक तरूण मंडळी त्यांना मदत करत असतात. अपंग, आंधळे, आजारी , म्हातारी माणसे सगळेच यात सहभागी होतात. निकाल काहीही लागो. पक्ष कोणताही असो. काम सगळेच करत असतात . आपण तर धडधाकट माणसे.. मग मतदान करणे हा आपला हक्क आहे आणि कर्तव्य सुध्दा. या कर्तव्यापासून आपली सुटका नाही. कर्तव्यदक्ष, सुशिक्षित आणि योग्य असा नेता निवडण्याची संधी आपल्याला मिळणार आहे आणि ती मला गमवायची नाही. तुम्हाला जायचे तर जा . मी आणि मृणाल येणार नाही म्हणजे नाही."

राजेशच्या आनंदावर विरजण पडल्यासारखे वाटत होते.

"अहो, बाबा बरोबर बोलत आहे. आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत. एवढी सुविधा आणि सुरक्षितता आपल्याला उपलब्ध असतांना मतदान न करणे म्हणजे पळवाट शोधल्या सारखीच आहे. मी सुध्दा मतदान करणारच." राधिका.

"अरे वा! राधिका. तुझा निर्णय पटला मला." मृणालताई.

"आजोबा मी केव्हा मतदान करू शकणार."

"तू अठरा वर्षांचा झाला की मगच."

राजेशचा मुड खराब झाला होता. पण तेवढ्यात राघव गाणे गायला लागला.

"मी कुठेही येणार नाही. तुम्ही तिघे जा मतदानाला. मी मस्त आराम करणार."

"बाबा, आज आपल्याही गल्लीत काही मुले गाणं म्हणत होती. मी म्हणून दाखवू का ? "

हो म्हणायच्या आधीच राघव सुरू झाला.

नको प्रलोभनो, नको कुणाचा दबाव
नको कशाचीही सक्ती, करू नको भावा-
नको घेऊ मताचे पैसे का उगाच मिंधेपण
कर खुशाल निर्भयतेनं, तुझ्या हक्काचं मतदान-२

"अरे तुला पाठ देखील झाल का? "

"मतदार राजा जागा हो..
लोकशाहीचा धागा हो ..."

"जयहिंद, जयमहाराष्ट्र."

"वा, वा ! इकडे ये बाळा." मृणालताईंनी राघवला जवळ घेतले आणि खूप लाड केले."

"राजेश मतदान करणे किंवा न करणे हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. पण तुझ एक मत आपल्या आवडत्या नेत्यांकडे गेलं तर नक्कीच ते वाया जाणार नाही."

"बाबा, ठीक आहे. तुम्ही सगळे एवढ जीव तोडून सांगत आहात . तर मी‌ पण नक्की मतदान करणार."

हे.... मज्जाच मज्जा.

मतदार राजा जागा तू..
शहाण्या सारखा वाग तू....

राघव परत गायला लागला.

©® अश्विनी मिश्रीकोटकर