Login

कार्यकर्ता.... भाग १

समाजासाठी कार्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका व्यक्तीची कथा
ही कथा आणि कथेतील पात्रे काल्पनिक आहेत.

महत्वाच्या कामांचे कागदपत्र घेऊन सुबोधने खासदार साहेबांच्या बंगल्यात प्रवेश केला. नुकतेच महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले होते त्यामुळे पक्षातल्या जाणकार लोकांच्या बैठकी सुरू झाल्या होत्या. अशातच खासदार साहेबांच्या बंगल्यात पक्षातले काही सभासद, मंत्री , सल्लागार आले होते. खासदार साहेबांच्या हाती कागदपत्रे सुपूर्द करताच रेवतीबाईंनी म्हणजेच त्यांच्या पत्नीने सुबोधला चहा फराळाचे पदार्थ आत नेऊन देण्यास सांगितले. पदार्थ वाढून देत असतानाच पक्ष निरीक्षक उमेश साहेबांची नजर सुबोध वर पडली. त्यांनी खासदारांना म्हणजेच साळवी साहेबांना सुबोधबद्दल सुचवले ..

साळवी साहेब ..मी काय म्हणतो सध्या राजकीय वर्तुळात बरीच खळबळ झाली आहे... त्यात विरोधकांचे आरोप , पक्षातील सोडून गेलेले पदाधिकारी यामुळे पक्षाचे नाव खराब होत आहे म्हणून आपण यंदाच्या निवडणुकीत या वॉर्ड क्रमांक २२ चे तिकीट सुबोधला दिले तर ?

साळवी साहेब ...अगदी माझ्या मनातले बोललात बघा तुम्ही. या वॉर्डात सुबोध सारखा लोकप्रिय माणूस शोधून सापडणार नाहीं. घरातल्या बारीक सारीक गोष्टींपासून ते पक्षाची वरवरची कामे , परिसरातील लोकांना सांभाळणे , त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन आणि मदत करणे, माझ्या गैरहजेरीत सुबोध हे सर्व अतिशय उत्तम सांभाळतो.
१० वर्षांचा होता तेव्हा एका बांधकाम साईट वर झालेल्या अपघातात याचे आई वडील गेले . अनाथ झालेला हा मुलगा परिसरातील लोकांनी माझ्याकडे आणून दिला ..मी आणि माझे कुटुंब त्यालाही तितकाच जीव लावतो.

साहेबांचे आपल्याबद्दल हे विचार ऐकून सुबोध सुखावला. खरंच आपणही जनसेवेत पुढाकार घेतला तर नक्कीच गोरगरिबांच्या मदतीला जाऊ शकतो. परिसरातील अडचणी दूर करू शकतो. गेल्या वेळी जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या होत्या तेव्हाच आपण उमेदवार होण्याची इच्छा साहेबांना सांगणार होतो पण त्याआधीच त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याने मागे लागून लागून स्वतःला उमेदवारी देण्यास सांगितले.

पण आता असं होणार नाही..मीच साहेबांच्या मर्जीतला विश्वासू कार्यकर्ता आणि लोकप्रिय असणारा उमेदवार आहे. निवडून आल्यानंतर माझे आयुष्य समाजोपयोगी कार्य करण्यासाठीच असेल पण निवडणूक लढवायची म्हणजे हाती पैसा लागेल. प्रचारासाठी , लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हाताशी काही पैसे हवेच ..सुबोधला तसा काही पगार नव्हताच पण कधी कोणी हातावर टेकवलेले पैसे त्याने जमा केले होते .
बघू साहेब पाठीशी आहेत म्हणजे टेन्शन नाही. लागेल तर पैसाही खर्च करतील एवढा विश्वास होता त्याला.

म्हणजेच सुबोधची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्वीपासूनच होती.

होईल का सुबोधच स्वप्न पूर्ण? पाहूया पुढच्या भागात.
0

🎭 Series Post

View all