कस्तुरी भाग २६

कामिनीला आपल्या घरामध्ये पाहून रुपा आश्चर्य चकित होऊन तिला बघू लागली


कस्तुरी
भाग २६

" कामिनी....!"

कामिनीला आपल्या घरामध्ये अशी अचानक पाहून रुपा अगदीच आश्चर्य चकित होऊन उभी राहिली. अशीच कामिनी देखील

" रुपा....!" असे म्हणून आपले डोळे विस्फारून विस्मयचकित होऊन रुपाला बघताच म्हणाली.

दोघीही काही क्षणाकरता मुर्त्या बनून उभारल्या.

" डॅड...! " कामिनीच्या भावाने आपल्या वडिलांना उद्देशून म्हटले.

" हो सतेज. काही बोललास का तू ?" कामिनी चे वडिल म्हणाले.

" डॅड मी तयार आहे इथे यायला. का कुणास ठाऊक इथे आल्यानंतर मला एकप्रकारची मनःशांती मिळाली. " सतेज म्हणाला.

" पण मी इथे येणार नाही म्हणजे नाही...! आधीच दिवसभर शाळेत हिचे तोंड बघायचे हे काय कमी होते तोच पुन्हा संध्याकाळी पण हिचेच तोंड बघायचे. म्हणजे स्वप्नात पण हिच येऊ दे माझ्या. श्शी...! नकोच मला हि शिकवणी. मी नाही येणार म्हणजे नाही...!" असे ठसक्यात कामिनी म्हणाली.

" कामिनी....! खूप शहाणपण दाखवू नकोस सांगून ठेवतो तुला. अजून पर्यंत तुझे ऐकून तू सांगशील तेच केले तुझे चोचले पुरवले. पण यापुढे हे जमणार नाही. एकतर तू इथे यायचं नाही तर उद्या पासून तुझी शाळा बंद. गावी फोन करून तुझ्या मामाला बोलावून घेतो . तुझी पाठवणी करतो गावी आजोळी. मग एखाद्या मुलगा बघून तुझे लग्न लावून देतो. नकोच रोजची कटकट मला. तुझे लक्ष शिक्षणावर अजिबात नाही. तू पुढे शिकशील याची काय शाश्वती." जरा आवाज वाढवूनच कामिनी चे वडिल तिला रागाने म्हणाले.

हे ऐकून कामिनीच्या डोळ्यात पाणी आले. ती स्वतःचा हा अपमान ते ही रुपा समोर झाला आपला या कल्पनेने अधिकच चिडली. पण आज तिचे तिच्या वडिलांसमोर काही चालले नाही.

" लहान आहे पोर. असु द्या सर. असतो जरा पोरकटपणा मुलांमध्ये. येईल ही रोज इथे. आणि बघा एकदा का अभ्यासाची गोडी लागली तर मग पुस्तकातून डोके वर काढायची नाही मुलगी तुमची. " आजीने कामिनीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले.

आजीचा आपल्या डोक्यावर फिरत असलेला हात कामिनी ने झटक्यात दूर झटकून दिला. इतका जोराचा हिसडा दिल्यामुळे आजीचा जवळजवळ तोलच जात होता तेवढ्यात सतेजने तिला आधार दिला.

" ये मुर्खा...! तुला काही अक्कल आहे का नाही. आजी पडल्या असत्या न." सतेजने रागाने म्हटले.

" असुदे बाळ असुदे सोड..!" आजीने आपल्याला सावरत सावरत म्हटले.

" झाला तमाशा आजपुरता बास आता. यापुढे तुझी एकही तक्रार येता कामा नये. समजलं...!"

कामिनी चुपचाप खाली मान घालून उभी राहिली.

" बरं मी निघतो. किती वाजता गाडी पाठवावी यांना आणायला. आणि हो फी बदल काहीच बोलला नाही तुम्ही. किती द्यायची ते सांगा म्हणजे ती देऊनच जातो मी. " असे म्हणत त्यांनी आपल्या पैशाचे पाकीट काढले.

" बरोबर दोन तासांनी येऊन घेऊन जा . फी चे नंतर सांगेन मी." दादाने अगदीच सहजपणे सांगितले.

दादाच्या बोलण्यावर कामिनी चे वडिल खूप खुश झाले. त्यांनी त्याची पाठ थोपटून

" किती छान संस्कार दिले आहेत तुम्हाला तुमच्या आईबाबांनी. खरंच कौतुक करावे तितके थोडेच हो. " म्हणाले.

दादाने कामिनी,सतेजची गणिताची उजळणी घेतली.

सतेज अगदीच आनंदाने प्रत्येक प्रश्नाला प्रामाणिकपणे प्रतिसाद देत होता. पण कामिनी मात्र अजूनही रागात फणफणत होती. अगदी मोजकेच शब्द बोलुन शांत बसत होती. तिला कधी इथून आपल्या घरी जाऊ असेच वाटत होते.

बरोबर दोन तासांनी ड्रायव्हर येऊन या दोघांना घेऊन गेला.

" अरे दादा ही रोजच अशी शाळेत उर्मटपणे वागत असते. बघं न तिचे वडील किती चांगले विचारांचे आहेत आणि ही बघ. मला नेहाला नेहमी पाण्यात बघते ही. पण जाऊ दे. आता तरी जरा अभ्यासात लक्ष जाऊ दे हिचे. पास होऊ दे. तिच्या वडिलांच्या किती अपेक्षा आहेत ." रुपा म्हणाली.

" हो ग. त्यांच्या कडे बघून मला हिला जरा जास्त मेहनत घेऊन शिकवावे लागणार आहे. सतेज चांगला प्रतिसाद देतोय. पण ही बापरे....!" दादा म्हणाला.

दुसऱ्या दिवशी शाळेत नेहाला रुपाने सगळे सांगितले. हे ऐकून नेहाला राग आणि हासू दोन्ही एकदम आले.

" बघं शेवटी तुझ्या घरापर्यंत आली ही...! हाकलून द्यायची नाही का हिला. कशाला घेतले आत घरात..!" नेहा रागारागाने म्हणाली.

" अगं जाऊ दे सोड. तिचे वडील खरंच खुप चांगले आहेत. त्यांच्या कडे बघून खरं सांगू का मला माझे बाबा आठवले गं...!" रुपाच्या डोळ्यात बोलता बोलता टचकन पाणी आले.

बघता बघता दोन महिने झाले. कामिनी आता जरा जरा अभ्यासात लक्ष देऊ लागली होती. तिच्या वागण्यात काहीसा बदल जाणवू लागला होता. चेहऱ्यावर कधी कधी नकळत हास्य उमटू लागले होते. पण रुपा बरोबर अजूनही तिचा अबोलाच होता. गणितात थोडीशी प्रगती झाली होती. आता सहामाही परीक्षा आली. रुपा नेहा नेहमीप्रमाणे रात्रभर जागून अभ्यास करत होत्या. कामिनी यायची तेव्हा या दोघी आत आपल्या खोलीत जायच्या जेणेकरून कामिनी फक्त आणि फक्त अभ्यासातच लक्ष केंद्रित करू शकेल.

" मुलांनो आता सहामाही परीक्षेचा निकाल जाहीर करणार आह. यावेळी तुम्ही सर्वांनी खूपच चांगली प्रगती केली आहे. तुमचा निकाल बघून मला खूप आनंद झाला. एकेक विद्यार्थ्यांनी अगदीच शिखर गाठले आहे. काहींनी प्रयत्न केला आहे चांगलाच . पण...!
पण काहींनी मात्र माझा अपेक्षाभंग केला आहे. मला वाटलेच नव्हते की असे मार्क येतील. पण...! " असे वर्गशिक्षकांनी सकाळी वर्गात आल्या आल्या सांगितले.

कामिनी चे हृदयाचे ठोके जलद गतीने सुरू झाले. ती आतून खूप घाबरली पण वरवर तसे न दाखवता उसने हास्य चेहऱ्यावर आणून बसली.

" सर्व प्रथम मी पास झालेल्या विद्यार्थ्यांची नावे सांगतो." असे म्हणत एकेक विद्यार्थ्यांची नावे सांगितली. आपापली नावे ऐकून आनंदाने टाळ्या वाजवत सर्वांनी आनंद व्यक्त केला.

" हि झाली पास झालेल्या विद्यार्थ्यांची नावे. आता ज्यांनी ज्यांनी नंबर पटकावला आहे त्यांची नावे...! " असे म्हणत नंबर मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे सांगितली.

नेहमीप्रमाणे रुपा,नेहा पहिल्या दुसऱ्या नंबरावर होत्या. तिसऱ्या चौथ्या नंबरने पास झालेल्या दोघी पण खूप आनंदल्या.

आता मात्र कामिनी रडकुंडीला आली. तिचे नाव पास झालेल्या विद्यार्थ्यांत नव्हताच. नंबर येणार अशी इतकी हुशार पण नव्हती. \"बहुतेक मी पुन्हा ना...पा..स...! झाले वाटते \" असे मनात म्हणत तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

" अरे शांत शांत बसा मुलांनो. अजून काही नावे आहेत जी आता मी घेणार आहे. यामध्ये मी फक्त एकच नाव ते पण एका अशा विद्यार्थ्यीनीचे जिने आतापर्यंत इतके असे मार्क कधीच घेतले नव्हते. हिच्या अशा मार्काने मी थोडा आश्चर्य चकित झालो. मला विश्वास बसेना ही अशी असे मार्क कसे ? "

" पक्का मी नापास झाले ग. आता मला डॅडी गावी पाठवणार. आईऽऽऽऽ " कामिनी रडत रडतच आपल्या मैत्रिणीला म्हणाली.

" छ्छे ग..! अजून किती तरी मुलींची नावे आहेत. बघुया थांब कोण नापास झाले ते." तिची मैत्रीण तिला उसने अवसान आणून देत म्हणाली.

विद्यार्थ्यांची चुळबुळ बघून सरांनी हातातील डस्टरने टेबलावर ठकठक असे आवाज करत शांत बसा असे सांगितले.

\" तर...! ते नाव आहे. त्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. अरे हो नावाआधी मार्क सांगतो मग तुम्हीच ओळखणार कोण आहे ते नाही का.

मराठी::१००/ ८२
हिंदी ::१००/७८
इंग्रजी:;१००/६९
सायन्स:;१००/८५
इतिहास भूगोल:;१००/७७
आणि
गणित:;१००/९०
असे मार्क घेणारी कोण असेल हे सांगा बघू.

सगळेजण एकमेकांना बघू लागले. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.

रुपा नेहा दोघी तर पहीला दुसरा नंबर दुसऱ्या दोघी तिसरा चौथा नंबर. आता यांची बरोबरी करणारी कोण असेल बरं???

" नाही ओळखले न. मी पण असाच गोंधळलो गेलो. पण पुन्हा एकदा सगळे पेपर्स तपासले तेव्हा मला विश्वास बसला. हे मार्क आहेत ...!

कामिनी चे....!

कामिनी अभिनंदन तुझे. असाच अभ्यास कर . तुझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण कर."

" अरे कामिनी....! अगं एकलीस का ? तू..! तुला बघ किती मार्क पडले आहेत. अगं मला तर विश्वास बसेना की तू इतके मार्क घेतले." तिच्या मैत्रिणीने अक्षरशः तिला मिठीच मारली.

कामिनीला आपल्या कानावर विश्वास बसेना. ती आपण काय ऐकतोय असे झाले. तिला काहीच सुचत नव्हते.

एकदम ती आपल्या बेंचवरून उठली आणि पळतच रुपा जवळ गेली. तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिला एक जोरात गच्च मिठी मारली ," रुपा आय एम सॉरी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी." असे म्हणत डोळ्यांतील अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

वर्गात कोणालाही काहीच कळले नाही. ही रुपाला रोजच पाण्यात बघणारी आज तिलाच मिठी मारत रडत आहे.

संध्याकाळी कामिनी चे वडिल मोठे मिठाईचे डबे घेऊन रुपाच्या घरी आले.

" मी खरोखर आपला आभारी आहे. आज माझी मुलगी इतके चांगले गुण घेऊन पास झाली यावर माझा विश्वास बसत नाही. पण हे शक्य झाले तुमच्या मुळे. माझ्या मित्राने जे काही सांगितले ते खरेच निघाले. आता मी बिंधास्त झालो. मला आता काळजी करण्याचे कारण नाही. माझी दोन्ही मुलांची प्रगती पाहूनच मला खूप आनंद झाला आहे." अगदी खुशीत येऊन त्यांनी दादाला गळाभेट दिली.

रुपा पण आज खूप आनंदात होती. ती पटकन जाऊन आजीच्या पाया पडली. सतेजने मिठाई काढून आजीच्या हातावर ठेवली.

" अरे थांब बाळा आधी देवासमोर ठेवूया मग आपण खाऊ." असे म्हणत आजीने देवासमोर दिवा लावून मिठाई ठेवली.

आई ,मुले , कामिनी सतेज त्यांचे डॅडी सगळेजण आनंदाने मिठाई खाल्ली. नेहा पण यांच्या आनंदात सहभागी झाली होती.

कामिनी नेहा रुपा या दोघींच्या मध्ये बसून गप्पा मारत होती. तिला आज आकाश ठेंगणे झाले होते. या तिघी आज पुन्हा एकदा नव्याने मैत्रीचा आस्वाद घेत होत्या.

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all