Login

कातरवेळ..

That magical moment between day and night,when the sun slowly sinks and the stars hesitate to shine. It’s neither light nor darkness a soft golden silence where time seems to pause.The heart feels heavy yet calm, touched by memories, love, and longing.In this twilight, the soul often remembers someone it can never forget
कातरवेळ…
दिवस संपतोय, पण रात्र अजून जागी झालेली नाही.
आकाश फिकट जांभळं झालंय, सूर्यकिरणांची सोनेरी रेघ हळूहळू मागे सरकतेय.
वारा मंदावतो, झाडांच्या पानांवर दवबिंदू थांबून राहतात,
जणू सृष्टीच श्वास रोखून बसली आहे.

हीच ती वेळ ज्या वेळी तू यायचीस…
हातात बांगड्यांचा मंद आवाज, ओठांवर हलकं हसू आणि डोळ्यांत ती जादू मानला वेधून घेणारी..
त्या क्षणी वाटायचं वेळ थांबली आहे,
जग थांबलं आहे आणि फक्त आपण दोघंच आहोत..
त्या संध्याकाळीच्या प्रकाशात एकरूप झालेले.

आजही तीच वेळ येते,
संध्याकाळचं तेच आकाश, तोच वारा
पण तू नाहीस
फक्त तुझी आठवण आली की संध्याकाळ हलकीशी ओलसर होते. हवा गार होते आणि मनाच्या आत काहीतरी न सांगितलेलं दाटून येतं.

कधी खिडकीत उभं राहून मी आकाशाकडे पाहतो,
त्या जांभळ्या रंगात तुझ्या साडीचा रंग दिसतो,
त्या मावळत्या सूर्यकिरणात तुझ्या हसण्याचा झगमगाट.
आणि मग मनात हळूच एक हुरहूर उठते,
जणू तू अजून इथेच कुठंतरी आहेस…
त्या वाऱ्याच्या झुळुकीत, त्या मंद प्रकाशात,
माझ्याच भोवती फिरते आहेस
फक्त न दिसता.

कातरवेळ म्हणजे ती वेळ जिथं दिवस आणि रात्र एकमेकांना स्पर्श करतात,
आणि त्या स्पर्शात तू आणि मी हरवून जातो.
कधी तुझ्या आवाजाची सावली मनात दाटून येते.
तोच हलका स्वर, तीच लय.
“आठवणी विसरता येतात का?” तू विचारायचीस
आणि मी फक्त हसायचो…
कारण विसरणं शक्यच नव्हतं. आता ही नाही..
तू स्वतः माझ्या प्रत्येक श्वासात मिसळलेली होतीस.

संध्याकाळ उतरते…
आकाशात एकामागून एक तारे उगवतात.
मी त्यांच्याकडे पाहत बसतो
कोणता तारा तुझ्यासारखा चमकतोय, हे शोधत.
वारा थोडा थंड होतो,
हृदय मात्र उबदार होतं.
त्या आठवणींच्या ऊबेने.

कधी वाटतं, तू आत्ता आलीस…
माझ्या खांद्यावर हात ठेवशील, आणि म्हणशील,

“बघ ना, पुन्हा तीच कातरवेळ आली…”

पण वाऱ्यात फक्त तुझा सुगंध येतो,
आवाज मात्र कुठेच ऐकू येत नाही.
आणि तेवढ्यात, एक गार झुळूक गालावर फिरते,
जणू तुझ्या हातांचा स्पर्शच.


त्या स्पर्शाने डोळ्यांतून नकळत पाणी येतं,
हास्य आणि अश्रू दोघं एकत्र भेटतात
जसं प्रेम आणि विरह.
कतारवेळ निघून जाते,
आकाश काळं होतं,
पण माझ्या मनात मात्र तू अजूनही उजळलेली असतेस,
त्या अर्धप्रकाशात, त्या अर्धवट क्षणात,
जिथं वेळ थांबते आणि आठवणी पुन्हा जिवंत होतात.

प्रेम संपत नाही…
ते फक्त कातरवेळेत लपून राहतं,
जिथं दिवस संपतो आणि तुझं नाव पुन्हा मनात उगवतं.
आशा एका कातरवेळी तू खरंच प्रत्येक्षात यावी ही आशा मनात ठेवत जगत आहे.

.. ✍️ जगदीश लक्ष्मण वानखडे..
©® All Rights Reserved.
0