Login

काटेरी वाटेवरून चालताना... भाग 15

Saglya prashnani nisha hatbal zali

काटेरी वाटेवरून चालताना... भाग 15


आधीच्या भागात आपण पाहिले की,


नितिन कॉलेजमध्ये रागिणीला भेटले, तिला सांगितलं की त्यांना बोलायचं आहे. रागिणीने नकार दिला तरी नितिन तिला कॅन्टीनमध्ये घेऊन गेले. रागिणीला समजावलं. नृत्य ही कला आहे, तिची जोपासना कर. तिची साधना कर. तू नृत्य करत रहा.


नितिनने समजावलं आणि रागिणी नृत्याला तयार झाली.
सायली आणि प्रथमेशचा नाटकेचा सराव छान चालला होता.


निशाला जाणवलं की ती आता पुरती फसली आहे. तिची यातून सुटका नाही. तिने मेघाला कॉल केला पण तितक्यात कुसुम आली आणि निशा तिथून निघून गेली.


निशाच्या आईला दोन्ही मुलं जवळ नाहीत म्हणून त्रास होत होता.


आता पुढे,


रात्री कुसुम झोपलेली असताना निशा हळूच उठली. कुसुमकडे एक नजर टाकली ती गाढ झोपलेली बघून ती हळूच खोलीतून बाहेर आली.


हॉलमध्ये अंधार असल्यामुळे निशा थोडी चाचपडली, धक्क्याने टेबलवरचा फ्लॉवरपॉट खाली पडला. तसाच आवाज झाला आणि कुसुमला जाग आली.
ती उठून
“कोण आहे तिकडे? कोण आहे?” म्हणत म्हणत बाहेर आली. हॉलचा लाईट सुरू केला.


समोर निशाला उभं असलेलं बघून
“काय ग, इथे काय करतेस?” 


“मावशी मला पाणी हवं होत म्हणून मी किचनमध्ये जात होती.” निशा
“अग मला उठवायचं ना, तू जा खोलीत मी पाणी घेऊन येते.” कुसुमने तिला खोलीत पाठवलं.


निशा काहीही न बोलता चुपचाप खोलीत गेली, बेडवर बसली.
“आज मावशी उठली नसती तर मला इथून निघता आलं असतं. मला कसही काहीही करून इथून निघायला हवं. माझं काही बरं वाईट होण्याआधी स्वतःची सुटका करावी लागेल.” निशा मनोमन बोलू लागली.


निशा तिच्या विचारात असताना कुसुम आली.


“निशा पाणी घे.” कुसुमचा आवाज ऐकून निशा दचकली.
निशाने पाण्याचा ग्लास घेतला, पाणी प्यायली आणि झोपली. फक्त डोळे बंद होते कुसुमला दाखवण्यापुरते, मनातून ती जागीच होती. मनोमन विचार सुरू होते.


दुसऱ्या दिवशी सकाळी निशा किचनमध्ये गेली.
“अग उठलीस, बस मी चहा देते.” कुसुम
निशा हॉलमध्ये जाऊन बसली.


कुसुम ट्रे घेऊन आली.
निशाला चहाचा कप दिला, स्वतःनेही घेतला आणि दोघी निवांत बसल्या.


“मावशी मला मेघाशी बोलायचं होतं, मी फोन करू का तिला?”  निशा
“हो हो कर ना, त्यात विचारायचंय काय ग? तुला सांगितलं ना,हेही तुझंच घर आहे.” कुसुम हसून बोलली.


कुसुमने चहा घेतला आणि ती किचनमध्ये गेली.
निशाने चहा घेतला आणि  मेघाच्या घरी फोन केला.
फोन मेघाच्या आईने उचलला.


“हॅलो काकू मी निशा बोलत आहे, मेघा आहे का?”
“नाही ग ती तर कॉलेजला गेली आहे. तू गेली नाहीस कॉलेजला?” सुशीला


“काकू मी कुसुम मावशीकडे आहे?” निशाने उत्साहाने सांगितलं, निशाला वाटलं आता सुशीलाकाकू कुसुम मावशीबद्दल काहीतरी सांगतील.


“कोण कुसुम मावशी? तुझ्या मावशीचं नाव तर रंजना आहे ना?” सुशीला
“काकू अहो तुमची बहीण कुसुम? मेघाची कुसुम मावशी.” निशा आता घाबरली.


“निशा मला कोणतीही कुसुम नावाची बहीण नाही आहे.” सुशीला.
निशा हे सगळं ऐकून हादरली तिच्या हातून रिसिव्हर खाली पडला आणि ती सोफ्यावर कोसळली.


सुशीला हॅलो हॅलो च करत राहिली.
कुसुम हॉलमध्ये आली,निशाला असं बघितलं आणि ती धावली.
“निशा काय होतंय तुला?”


“मावशी मला थोडं चक्कर आल्यासारखं वाटलं.” निशा
“बरं बरं तू चल आत , मी तुझ्यासाठी हळद दूध घेऊन येते.” कुसुम तिला आत खोलीत घेऊन गेली. तिला लेटवल आणि पुन्हा किचनमध्ये गेली आणि निशासाठी दूध घेऊन आली. तिला दूध दिल आणि झोपवलं. 


................................

दुपारी मेघा कॉलेजमधून घरी आली. सुशीला सोफ्यावर बसून तिची वाट बघत होती.


मेघा खोलीत जाऊन फ्रेश झाली. थोडया वेळाने खोलीच्या बाहेर आली.
“मेघा तुझी मैत्रीण निशा बरेच दिवस झाले आपल्याकडे आली नाही.” सुशीला

“आई मागे तिला बरं नव्हतं ना म्हणून आणलं होतं आता ती बरी आहे.” मेघा
“हो का, अग जरा फोन लावतेस का जरा मला बोलायचं आहे.” सुशीला


“आई तिच्याकडे मोबाईल नसतो.” मेघा
“अग मग लँडलाईन वर कर ना.”सुशीला


“आई पण ती घरी नसेल आता, कॉलेजमध्ये होती ना घरी पोहोचायची असेल.” मेघा
“असू दे मी उद्या तिच्या घरीच जाते. म्हणजे सगळ्यांचीच भेट होईल.” सुशीला


“आई तू काय मागे लागलीस ग? काय काम आहे तुझं?” मेघा

सुशीला सोफ्यावरून उठली आणि मेघा जवळ जाऊन तिने तिच्या कानशिलात मारली.


“आई..” मेघा किंचाळली
“खोटं वर खोटं बोलतेस, लाज वाटतं नाही तुला? काय केलंस तू निशा सोबत? कुठे आहे ती? कशी आहे? अग कुणाकडे नेऊन ठेवलस तिला?” सुशीला खूप चिडली. मेघाला हलवू हलवू विचारू लागली.


आता मात्र मेघा रडायला लागली.
“अग रडतेस काय? सांग आधी, कुठे आहे ती?” 
मेघा रडतच सोफ्यावर बसली.


“आई मी तिला पंचवीस हजार..”मेघा बोलता बोलता थांबली आणि रडायला लागली.


सुशीला आता चवताळली, तिने मेघाला सोफ्यावरून खाली पाडलं आणि तिच्या पाठीवर हात आपटत,
“सांग का केलसं असं? का केलं तू असं? मैत्रीण आहे ना तुझी? अग तुम्ही जिवाभावाच्या मैत्रिणी ना, मग अस काय झालं की तू तुझ्या मैत्रिणीला असं फसवलसं? बोल मेघा बोल, अस गप्प बसून मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही आहेत.” 


“आई मला माफ कर, मला माफ कर ग आई. माझा  नाईलाज होता.” मेघा
“नाईलाज... अग कार्टे  काय बोलतेस? कसला नाईलाज?” सुशीला


“आई निशाच रोहित नावाच्या मुलावर प्रेम होत. दोघांमध्ये जवळीकता वाढली होती. दोघे पळून गेले, एकत्र राहू लागले. आणि दोघांमध्ये संबंध प्रस्थपित झाले. त्यातून निशाला दिवस गेले. आणि रोहितने निशाला लग्न करण्यास नकार दिला.

निशा एकदम एकटी पडली. तिने मला कॉल केला आणि मी तिला आपल्याकडे घेऊन आले होते. त्यानंतर तिच्या आईला बर नव्हतं म्हणून ती हॉस्पिटलमध्ये भेटायला गेली. डिस्चार्ज मिळाल्यानंतर  निशा घरी गेली आणि तिच्या बाबांनी तिला घराबाहेर काढलं..  याच दरम्यान मला रोहित भेटला त्याने मला निशाबद्दल विचारलं,  मला माहित असूनही मी त्याला सांगितलं नाही याचा त्याला भयंकर त्रास झाला.


त्याने मला धमकी दिली की जर मी त्याच काही ऐकलं नाही तर तो मला जिवाने मारून टाकेल आणि  नंतर त्याने मला जसं जसं सांगितलं मी ते केलं. त्याने मला त्याचे पैसे पण दिले. निशा आता त्या कुसुमच्या तावडीत आहे.” मेघा रडायला लागली.


“अग मूर्ख मुली, कुणालातरी सांगायचं ना. असं कसं तू सगळं केलंस, अग मला तरी एकदा सांगायचं होतंस ग.”
सुशीला निपचित सोफ्यावर बसली.


“हे देवा, ही पोरगी फसली. आता काय करायचं? तिच्या घरच्यांना सांगायचं का? की आधी पोलिसांना सांगायचं? माझं तर डोकचं काम करत नाही आहे. तिच्या जीवाला धोका आहे. काय करू?” सुशीला मनातल्या मनात विचार करू लागली.

निशाने दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुमच बोलणं ऐकलं.
“मदन्या सगळी तयारी करून ठेव, माझं इकडे सेट झालं की मी तुला फोन करते. आणि हे बघ इकडच्या कानाची गोष्ट तिकडच्या कानापर्यंत जायला नको काळजी घे.”


निशाला कल्पना आली काहीतरी वाईट घडणार आहे. पण तिला शांत राहून काहीतरी मार्ग काढायचा होता. पण काय सुचत नव्हतं. तिला मेघाला हे सगळं सांगायचं होत, हे मेघामुळेच होतंय याची पुसटशी कल्पनाही नव्हती तिला. पण कुसुम तिची खूप काळजी घ्यायची. माझ्यासोबत जर काही वाईट कारायचंच आहे तर मग कुसुम मावशी माझी इतकी काळजी का घेते? का माझ्यासाठी दिवसभर काही काही करत असते. निशा सगळ्या प्रश्नांनी हतबल झाली.


क्रमशः


काय घडेल निशाच्या आयुष्यात? निशा स्वतःची सुटका करू शकेल का?  पुढचा भाग नक्की वाचा.