काटेरी वाटेवरून चालताना भाग 63
आधीच्या भागात आपण पाहिले की,
निशाने मेघाला फोन केला. तिला सगळी परिस्थिती सांगितली.
मेघाने सांगितलं की निशा तू विक्रमच्या प्रेमात आहेस पण निशाला ते मान्य करायचं नव्हतं. निशाच्या ऑफिसमध्ये नवीन बॉस आला जो खूप कडक होता. निशाकडे अचानक एक व्यक्ती आला, भिकारी समजून निशाने त्याला धुडकावल. ती पलटली तर तिला निशा..असा आवाज आला.
आता पुढे,
निशा पलटली, थोड्या समोर गेली. तिने त्याचा चेहऱ्याकडे निरखून बघितलं आणि बघतच राहिली.
तिचे डोळे पाणावले, तिने डोळे मिटले तसे अश्रू ओघळले. त्याने त्याच्या हाताने तिचे अश्रू पुसले. त्याच्या स्पर्शाने ती मोहरली. तिने त्याचा हात पकडला आणि गालावरून फिरवू लागली, अजूनही डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो त्याच्या हळू आवाजात तिला बोलला.
“निशा रडू नकोस, मी आलोय.” विक्रमने तिच्या हाताचं चुंबन घेतलं.
त्याने अस म्हणताच निशा त्याच्या छातीला बिलगली.
“कुठे गेला होतास? मला काहीही न सांगता कुठे निघून गेला होतास? किती शोधलं मी तुला?” निशा रडायला लागली.
“मला माहीत होतं तू मला नक्की शोधणार म्हणून तर शक्य तितक्या लवकर पोहोचलो मी इथे.” विक्रमने पुन्हा तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले.
“कुठे होतास इतके दिवस? आणि ही काय अवस्था करून घेतली आहेस?” निशा
निर्मला कोण आलंय म्हणून बघायला बाहेर आली आणि बघितलं तर समोर हे दोघे एकमेकांच्या मिठीत होते.
तिला खूप सुखावल्यासारखं झालं. ती भावुक झाली.
“अग त्याला आत तर येऊ दे,बाहेरच सगळे प्रश्न विचारणार आहेस का?” निर्मलाचा आवाज ऐकताच दोघेही दूर झाले.
“आई बघितलंस कोण आलंय? विक्रम आलाय. ज्याची आपण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो तो आला आई.” निशाने अगदी आनंदित होऊन सांगितलं.
“अग त्याला दारात किती वेळ उभं ठेवणार आहेस?” निर्मला
निशाने त्याच्याकडे बघितलं,
इशाऱ्याने थांब जरा म्हणाली आणि आत गेली.
निशा आरतीचं ताट घेऊन आली, तिने विक्रमच औक्षण केलं. आणि त्याला आत घेतलं. निर्मला पटकन पाणी घेऊन आली. तो घटघट पाणी प्यायला.
“आई पटकन काहीतरी खायला घेऊन ये ना.” निशा निर्मलाकडे बघून बोलली.
निर्मला आत गेली, तिने लगेच पेच बनवली आणि घेऊन गेली.
निशाने त्याला भरवलं, आता तो भावुक झाला.
तिने इशाऱ्याने काय झालं विचारलं, त्यानेही इशाऱ्याने काही नाही असं सांगितलं.
विक्रम फ्रेश झाला, आज निशाने बऱ्याच वर्षांनंतर आलमारीतून रोहितचे कपडे काढले आणि विक्रमला वापरायला दिले. त्यांनतर रोहितने काय घडले ते सांगितले.
“मी ऑफिसमधून बाहेर पडलो आणि गाडीत जाऊन बसणार तोच बाजूनी येणाऱ्या गाडीने मला जोरदार धडक दिली. मी बेशुद्ध झालो त्यांनतर काय झालं मला माहीत नाही पण जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. तिथे मला जाणवलं मला तिथून निघता येणार नाही आहे, कुणीतरी काहीतरी षडयंत्र केलंय माझ्याविरोधात. संधी मिळताच मी तिथून पळ काढला आणि थेट तुझ्याकडे आलो.”
“पण विक्रम ऑफिसमध्ये कुणालाच अक्सिडेंट बद्दल माहीत कसं नाही.” निशा
“मला शंका आहे , अक्सिडेंट नंतर मला तिथून कुणीतरी लगेच घेऊन गेलं.” विक्रम
“पण ऑफिसमध्ये सगळे सांगत होते की आता कधीही परत येणार नाही आहेस, तुझ्या जागी तर नवीन बॉस देखील आला. खूप खडूस आहे.” निशा
“हा अपघात होता की घातपात? हे तर बघावंच लागेल.” विक्रम
“ते नंतर होईल, आता आत जाऊन आराम कर.”
विक्रम दोन दिवस निशाकडेच होता. निशाही ऑफिसला गेली नाही, विक्रमच्या जागी आलेला व्यक्ती फ्रॉड होता. विक्रमने त्याच्या बद्दल संपूर्ण माहिती काढली. या कंपनीचे सीक्रेट जाणून घेण्यासाठी दुसऱ्या कंपनीच्या एम्प्लॉईने हे सगळं षडयंत्र रचलं होतं.
निशा आणि विक्रम दोघेही ऑफिसला गेले. विक्रमला बघताच सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. सगळे विक्रम सर...विक्रम सर म्हणत त्याच्या भोवती जमले, विक्रमला बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यादिवशी समीर ऑफिसला आलाच नाही कदाचित त्याला सगळी परिस्थिती कळली असावी. विक्रमला कळलं होतं हे सगळं कुणी केलं, त्याने पोलीसात तक्रार नोंदवली. काही दिवसांच्या आत या प्रकरणाचा तपास लागला. समीर आणि त्याच्या हाताशी असलेल्या माणसांवर गुन्हा दाखल झाला.
आता निशानेही विक्रम जवळ तिच्या प्रेमाची कबुली दिली होती.
काही दिवस दोघेही एकत्र राहिले, एकमेकांना जाणून घेतलं, समजून घेतलं.
तब्बल तीन महिन्यानंतर निशा आणि विक्रमने रजिस्टर मॅरेज केलं.
निर्मला, आनंदी आणि तिच्या मैत्रिणी या सगळ्यांच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला. दोघांनीही निर्मलाचा आशीर्वाद घेतला.
दुसऱ्या दिवशी दोघेही कुलदैवताच्या दर्शनाला निघाले.
छान दर्शन झाले, तिथून दोघेही फिरायला गेले. दोन दिवस फिरून घरी आले, घरी आल्या आल्या बघतात तर काय आनंदी रडत बसली होती आणि निर्मला तिची समजूत घालत होती.
निशा पटकन आत गेली,
“आनंदी काय झालं? अशी का रडतेस?”
“आई माझा रिझल्ट लागला, माझा एक सब्जेक्ट बॅक राहिला. आई मी अभ्यास केला होता तुला माहीत आहे ना मी अभ्यासात हलगर्जीपणा करत नाही, तरी हे कसं झालं.” आनंदीने निशाला सगळं सांगितलं.
“आणि निशा ही जीव द्यायला निघाली होती, बर त्या तिच्या मैत्रिणी त्यांनी तिला वाचवलं.” निर्मला
“काय? आनंदी हा काय वेडेपणा आहे? यानंतर असं कसं नाही करायचं. वेडी आहेस का? अग राहीला तर राहिला नेक्स्ट टाईम निघेल, या एवढ्याश्या गोष्टीसाठी तू तुझा जीव द्यायला निघाली होतीस. तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? आनंदी तुझ्याशिवाय कोण आहे ग मला? तुझ्याविना मी माझ्या जीवनाचा विचारही करू शकत नाही.” निशाने आनंदीला धीर दिला.
“आय एम सॉरी आई, पण माझं हे पहिलं वर्ष होत मला चांगले परसेंटेज घ्यायचे होते, कॉलेजमध्ये सगळे काय विचार करतील माझ्याबद्दल.” आनंदीने तिची व्यथा सांगितली.
“आनंदी ट्रस्ट युवरसेल्फ, तू हुशार आहेस. एखादया वेळी पदरात अपयश आलं म्हणजे सगळं संपलं असं नसतं. ही तर यशाची पहिली पायरी आहे, तू पायऱ्या चढताना पडलीस तर तू वर चढण सोडशील का? नाही ना ,पुन्हा तू जोमाने पायऱ्या चढशील आणि वर जाशील, हो ना. असं हरायचं नाही हिमतींने उभं राहायचं आणि लढायचं, यश नक्की मिळतं.” निशाने तिला जवळ घेत समजावलं.
“थँक यु आई.”
या तिघीचं एकमेकींशी बोलत होत्या. विक्रम शांत एका बाजूला उभा होता.
आनंदीचं त्याच्याकडे लक्ष गेलं.
“विक्रम अंकल..” म्हणत ती उठून त्याच्याजवळ गेली.
“काय हा वेडेपणा?” विक्रम
“यानंतर कधीही करणार नाही, प्रॉमिस.” आनंदी
दोघांना असं बघून निशाला बर वाटलं.
“आनंदी अग अंकल काय म्हणतेस? बाबा आहे तो तुझा.” निर्मला
“आजी,प्लिज मला अंकलच म्हणू दे.”
“आनंदी तुला जे बोलण्यात कॉन्फर्ट वाटतं ना तेच बोल, उगाच नात्याचं बर्डन घेऊ नकोस.” विक्रम
“ थँक यु अंकल.”
आनंदी पुन्हा जोमाने अभ्यासाला लागली, ती दिवस रात्र अभ्यास करायची.
एका रात्री ती अभ्यास करत असताना विक्रम तिच्यासाठी दूध घेऊन गेला.
“आनंदी दूध आणलंय.”
“अंकल तुम्ही का आणलंत? आई घेऊन आली असती.”
“ती किचनचं काम आवरत होती ना म्हणून मी घेऊन आलो.”
विक्रम तिच्या बाजूला बसला,
“कसा चाललाय अभ्यास?”
आनंदी दूध पिता पिता
“मस्त..”
ती पूर्ण दूध प्यायली त्यांनतर विक्रमशी गप्पा मारायला सुरुवात केली.
“अंकल एक विचारू?” आनंदी
“हम्म बोल ना.” विक्रम
“तुमची फॅमिली कुठे असते? आनंदी
विक्रमने स्मितहास्य केलं आणि आनंदीला सांगितलं.
“आनंदी माझी फॅमिली ना इथेच आहे माझ्या डोळ्यासमोर.” विक्रम
“म्हणजे?”
“आनंदी यु आर लकी, तू खूप लकी आहेस की तुझ्याजवळ इतकी प्रेम करणारी माणसे आहेत. मला हे कधीच मिळालं नाही.”
विक्रम थोडा भावुक झाला.
क्रमशः