काटेरी वाटेवरून चालताना भाग 71
आधीच्या भागात आपण पाहिले की,
रियाच्या लग्नाची खरेदी झाली. प्रिन्सि आणि आनंदी दोघीही रियाच्या घरी गेल्या. संगीत, मेहंदी, हळद सगळे विधी छान पार पडले. लग्नाचा दिवस आला. रिया आता दूर जाणार या विचाराने तिघीही भावुक झाल्या.
एकमेकींच्या गळ्यात गळा टाकून रडल्या.
आता पुढे,
रियाचं लग्न झालं, लग्नाच्या सगळ्या विधी पार पडल्या आणि रियाची पाठवणी झाली. त्यानंतर प्रिन्सी, आनंदी घरी आल्या.
दुसऱ्या दिवसापासून आनंदीच ऑफिस रुटीन सुरू झालं.
काही दिवसातच आनंदीसाठी स्थळ चालून आलं. मुलगा इंजिनीअर होता, चांगल्या कंपनीत उच्च पदावर नोकरी करत होता. त्याने आनंदीला कुठेतरी बघितलेलं आणि त्याला आनंदी आवडली होती म्हणून त्याने त्याच्या घरच्यांना सांगितलेलं होतं. त्याच्या घरच्यांनी बघण्याचा कार्यक्रम ठरवला आणि रीतसर आनंदीला ते बघायला आले.
आनंदीला बघायला आल्यानंतर एकमेकांची ओळख झाली. घरच्यांशी ओळख झाली, त्यानंतर सगळ्यांनी आपापल्या फॅमिली विषय सांगितलं तर सहज निशानेही तिच्या भूतकाळाविषयी संपूर्ण माहिती त्यांना सांगितली.
आधी ते लोक खूप आनंदात होते आणि निशा बद्दल ऐकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी झाला. आम्ही सांगतो असं म्हणून ते निघून गेले.
बरेच दिवस झाले तरी त्यांचा निरोप आलेला नव्हता. निशाला जे काही समजायचं होतं ती समजली होती. आनंदीचा जॉब चांगला चाललेला होता. ती तिच्या कामात व्यस्त होती त्यामुळे तिने जास्त त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नव्हतं.
काही महिन्यानंतर पुन्हा एक स्थळ चालून आलं. तो मुलगा डॉक्टर होता, त्याची पण फॅमिली चांगली शिकलेली होती. त्यांचाही बघण्याचा कार्यक्रम झालेला होता आणि निशा बद्दल ऐकून त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली.
निशा सिंगल मदर होती आणि नंतर तिचा पुनर्विवाह झाला या गोष्टीचं बाऊ करून सगळे आनंदीला नकार देत होते.
त्यानंतर आनंदीला तिसरा मुलगा बघायला आला. आनंदी छान साडी वगैरे घालून तयार झाली. त्यांच्यासमोर गेली, मुलाच्या वडिलांनी प्रश्न केला.
“तुझं नाव काय?”
“आनंदी..” तिने सांगितलं. त्यांनी शिक्षण वगैरे विचारलं त्यानंतर त्यांनी आनंदीकडे बघून
“आम्हाला चालून दाखव.” असं म्हटलं. आनंदीला खूप विचित्र वाटलं. निशा आणि विक्रम एकमेकांकडे बघतच राहीले. तरी जाऊ दे असं म्हणत आनंदीने त्यांना चालून दाखवलं.
त्यानंतर त्यांनी,
“आम्हाला गाणं म्हणून दाखव.” असं म्हटलं.
तेही आनंदीने केलं.
मग शेवटी
“तुला स्वयंपाक येतो का? तुला घरातली कोणती कोणती कामे येतात? तुला कपडे धुता येतात का. भांडी घासता येतात का?” असे बरेच प्रश्न विचारण्यात आले.
शेवटी निशाला राहवलं नाही. निशाने बोलायला सुरुवात केली,
“बस आता, आता पुन्हा आम्हाला तुमचे प्रश्न नकोत. तुम्हाला तुमच्या घरी काम करणारी मोलकरीण हवी आहे का सून हवी आहे?” तिने प्रश्न विचारला.
त्यावर मुलाचे बाबा बोलले,
“तिला काही येते की नाही आम्हाला बघायला नको का? असं बघितलं आणि लग्न केलं असं होतं का कुठे? आम्हाला आमचं काम करू द्या.”
“माफ करा आम्हाला हे स्थळ नकोय. आता ही स्थिती आहे तर लग्नानंतर माझ्या मुलीचे काय हाल होतील.” असं म्हणून निशाने त्या स्थळाला नकार दिला.
बरेच महिने लोटून गेले, स्थळ यायचे आणि निशाचा पास्ट बघून नकार द्यायचे. आता निशाला या सगळ्याचा खूप कंटाळा आलेला होता. एका रात्री ती अशीच विचार करत बसलेली होती. खूप विचार केला तिने आणि त्यानंतर ती घराबाहेर पडली.
सकाळी विक्रम उठला, त्याला निशा दिसली नाही त्याला वाटलं की किचनमध्ये असेल म्हणून त्याने किचनमध्ये बघितलं. निशा तिथे नव्हती त्याने आवाज दिला.
“निशा निशा, अगं कुठे आहेस?”
तिचा आवाज ऐकून आनंदी खोलीतून बाहेर आली.
“काय झालं बाबा?”
“अग आई कुठे आहे? तुला दिसली का? कुठे गेली सकाळी सकाळी बघ ना, किती वेळ झाला मी शोधतोय. दिसत नाहीये. दोघांना वाटलं की सकाळी कुठेतरी मार्केटमध्ये गेली असेल किंवा फिरायला गेली असेल किंवा बाजूच्या घरी कुणाशी तरी बोलत असेल. हा विचार करून ते दोघे आपापल्या कामाला लागले. पण आता अकरा वाजून गेले तरी निशाचा यायचा पता नही. चला अजून थोडा वेळ वाट बघूया म्हणून त्यांनी वाट बघितली. सकाळची दुपार झाली निशा घरी आलीच नाही. आता मात्र विक्रमला खूप काळजी लागलेली होती, कुठे गेली असेल? कशी असेल? या विचाराने तो कासावीस झाला. त्याने लगेच गाडी काढली आणि तो तिला शोधायला निघाला.
आनंदी पण प्रिन्सिला घेऊन तिच्या गाडीवर निशाला शोधायला निघाली.
बरीच शोधाशोध केल्यानंतर, गार्डनमध्ये बाकावर निशा बसलेली दिसली. विक्रमने लगेच आनंदीला फोन केला आणि तिला तिथे बोलवून घेतलं.
विक्रम तिच्या जवळ गेला,
“निशा इथे का बसलीस? कधीच शोधतोय आम्ही तुला.” विक्रम बोलत-बोलत तिच्याजवळ गेला. पण निशा काहीच बोलली नाही. ती फक्त बसून होती. विक्रमने तिला हाताने हलवलं तशी ती खाली पडली. विक्रमने तिला हलवलं.
“निशा.. निशा काय झालं? काय झालं निशा?” ती खाली पडली आणि तिच्या तोंडातून फेस यायला लागला.
विक्रमला सगळ कळलं आणि तो लगेच तिला हॉस्पिटलला घेऊन गेला. आनंदीला पण तिथे बोलावून घेतलं. डॉक्टरने ट्रीटमेंट सुरू केली, काही तासानंतर डॉक्टर बाहेर आले.
“डॉक्टर निशा कशी आहे आता?”
“तुम्ही वेळेवर आणले बर केलंत, थोडा जरी उशीर केला असतात तर आज तुमची मिसेस आपल्यात नसत्या. त्या आता धोक्याबाहेर आहेत. धोका टळलेला आहे पण तरी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. त्यांना अंडर ऑबजर्वेशन ठेवलेल आहे, सध्या तरी आपण त्यांना डिस्चार्ज देऊ शकणार नाही. तुम्ही काळजी घ्या.” असं म्हणून डॉक्टर तिथून निघून गेले.
विक्रम आणि आनंदी दोघेही आत गेले. निशाकडे बघून आनंदी खूप रडायला लागली. विक्रमने तिला सांभाळलं. विक्रम भावुक झाला होता पण त्याने स्वतःला सावरलं.
“काय केलस निशा? का असं वागलीस? तू आम्हाला सोडून जाण्याचा विचार करत होतीस? तू गेल्या नंतर आमचं काय झालं असतं याचा जरा तरी विचार केलास? जिच्यासाठी तू अख्ख आयुष्य घालवलं, इतक्या खस्ता खाल्ल्या, इतकं सगळं सहन केलं. जिच्यासाठी सगळ्या संकटावर मात केली, एकटीने लढली, तिला सोडून जाणार होतीस तू? काय मिळवलस हे सगळं करून? बघ तुझी लेक रडून रडून बेहाल झाली. हा दिवस बघण्यासाठी तिला इतकं मोठं केलंस? का बोल ना निशा का असं केलं?
असं काय घडलं होतं की तुला हे पाऊल उचलावं वाटलं? मग का आयुष्यभर इतकं सगळं सहन केलं? मोठ्या मोठ्या डोंगरांना पार करून आलीस तू आणि आता हे असं काय घडलं? कुठलं संकट ओढवलं तुझ्यावर की तू हे पाऊल उचललं? मलाही काही बोलली नाहीस. का आम्ही परके झालो तुझ्यासाठी की तुला मला काही सांगावस देखील वाटलं नाही. बोल ना निशा.”
विक्रमला आता खरंच रडायला आलं. आनंदीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
“बाबा प्लिज तुम्ही रडू नका ना, आई बरी होईल.” आनंदी
“बघ ना आईने आपल्या दोघांना परकं केलं. तिला आपल्याला काही सांगावसं वाटलं नाही. आपल्याशी ती काहीच बोलली नाही, जर तिला खरच काही प्रॉब्लेम असेल तर तिने आपल्याशी शेअर करायला हवं होतं पण तिने तसे काही केले नाही. तिने तिथून पळ काढून मार्ग मोकळा केला. आता येऊ दे शुद्धीवर मी बोलणारच नाही तुझ्या आईशी.” असं म्हणत विक्रम आनंदीला बिलगला.
“बाबा प्लिज रडू नका ना, मला खूप रडायला येतं. आता मी पण आईशी कट्टी होणार.” आनंदीने मिठी घट्ट केली आणि दोघेही रडायला लागले.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा