काटेरी वाटेवरून चालताना भाग 68
आधीच्या भागात आपण पाहिले की,
आनंदीच राजीवशी जुडलेलं नात तुटलं. तिचं कॉलेज संपलं, ती घरी आली. आता ती काही दिवस घरीच राहणार होती.
अचानक निर्मलाची तब्बेत खराब झाली, आठ दिवस हॉस्पिटलमध्ये राहून ती या जगातून निघून गेली.
आनंदीने तिच्या देहाला मुखाग्नी दिला.
आता पुढे,
काही महिन्याने कॉलेज कॅम्पस थ्रू आनंदीला जॉब मिळाला. आनंदीचा जॉबला जाण्याचा पहिला दिवस होता. आनंदी सकाळी उठून छान आंघोळ करून तयार झाली. देवासमोर उभी राहून तिने नमस्कार केला, त्यानंतर ती निशा आणि विक्रमच्या पाया पडली.
“आई आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे, मला आशीर्वाद दे.”
“बाळा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे, खूप मोठी हो, खूप प्रगती कर.” निशाने तिच्या हातावर दही साखर ठेवला, ते घेऊन ती आतमध्ये पर्स आणायला गेली. तोवर विक्रमने गाडी काढली.
“बाबा तुम्ही कुठे जात आहात?” आनंदीने विक्रमला विचारलं.
आज आनंदीच्या तोंडून असं तुम्ही ऐकताना विक्रमला खूप वेगळं वाटलं ती नेहमी बाबा तू म्हणायची आधी विक्रमला अंकल म्हणायची मग बाबा म्हणायला लागली. आज तुम्ही ऐकल्यानंतर विक्रमला तिच्या बोलण्यात परकेपणा वाटला.
“आनंदी माझं काही चुकलं का?” विक्रमने तिला विचारलं.
“नाही बाबा असं का विचारताय?” आनंदी
“आज मला परक झाल्यासारखं वाटतंय, एकदम तुम्ही म्हणालीस ना म्हणून.” विक्रम
“नाही बाबा, आधी तुम्ही माझे फ्रेंड होतात आता तुम्ही माझे जबाबदार बाबा झाला आहात आणि माझ्या मनात तुमच्याविषयी खूप आदर आहे.” विक्रमने तिच्या डोक्यावर हात ठेवला.
“चल आज मी तुला ऑफिसला सोडतो. तुझा पहिला दिवस आहे ना.” विक्रम
“बाबा तुम्हाला कशाला त्रास घेताय मी जाईल ना.” आनंदी
“आज पहिला दिवस आहे ना, मी सोडतो तुला. का तुला आवडणार नाही का तुझ्या बाबांनी तुला सोडून दिलेलं.” विक्रम हसून बोलला.
“असं काही नाही, चला तुम्ही.”
दोघेही निघाले, निशाने घर आवडलं आणि ती निर्मलाच्या फोटो समोर उभी राहून बोलू लागली.
“आई बघितलं, आज आनंदीच्या जॉबचा पहिला दिवस आहे. आज तु असायला हवी होतीस ग. तुला तिला असं बघून खूप आनंद झाला असता. आता तिचं सगळं चांगलं होईल.
निशा तिच्या कामाला लागली, विक्रम आनंदीला सोडून आला.
“काय कसा आहे ऑफिस? गेली ना व्यवस्थित?” निशाने विक्रमला विचारलं.
“हो मोठी बिल्डिंग आहे, छान हे ऑफिस. कंपनी पण छान आहे, हळूहळू रुळायला लागेल.” विक्रम
“तिचं छान होऊ दे आणि तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळू दे.” निशाने देवासमोर प्रार्थना केली.
दोघेही ऑफिसला गेले, संध्याकाळी आनंदी लवकर घरी आली. दाराला लॉक होता, आज पहिला दिवस होता म्हणून ती चावी घेऊन गेलेली नव्हती आज नेमका निशाला उशीर झाला. विक्रम आणि निशा परतले तेव्हा आनंदी बाहेर पोर्चमध्ये बसलेली होती. तिला असं बाहेर बसलेलं बघून,
“आनंदी बेटा तू लवकर आलीस का? सॉरी सकाळी चावी देण्याचं लक्षातच राहिले नाही. सॉरी बाळा तुला इतका वेळ बाहेर बसावे लागले.”
“इट्स ओके आई, लवकर दार उघड आता.” निशाने दार उघडला, आनंदी आत गेली आणि सोफ्यावर जाऊन बसली. विक्रम तिच्या बाजूला जाऊन बसला.
“काय आनंदी कसा गेला पहिला दिवस?”
“खूप छान गेला बाबा, पण मला थकल्यासारखं होतं आहे.” आनंदी
“सगळ्यांशी ओळख झाली का?” बॉस वगैरे कसा आहे?”
“बॉस छान आहे पण माझा बॉस माझ्या मम्मीच्या बॉस सारखा नाहीये.” विक्रमकडे बघत इशाऱ्याने बोलली. तसं विक्रमने हलक स्मित हास्य केलं.
“तुला तुझ्या आईच्या बॉस सारखा बॉस हवाय?” विक्रम
“हो, चॉकलेट बॉय.” आनंदी
“बघ विचार कर, तो तुझ्या गळ्यात पडेल, मग चालेल तुला?” विक्रम
“तुमच्यासारखा प्रेमळ असेल तर मला चालेल.”
निशा पाणी घेऊन आली, तिच्या कानावर या गोष्टी पडल्या तिघेही हसायला लागले.
रात्रीचं जेवण करून सगळे आपापल्या खोलीत गेले. आनंदी आज बराच वेळ मोबाईल बघत बसलेली होती. तिला का कुणास ठाऊक झोप लागत नव्हती. बराच वेळ काहीतरी विचार केल्यानंतर तिचा डोळा लागला. पण मध्येच दचकून उठली. बराच वेळ बाल्कनीत उभी राहून वर मोकळ्या आकाशाकडे बघत राहिली. खूप वेळ एकाच ठिकाणी ताटकळत उभी होती. नंतर तिलाच कंटाळा आला आणि ती येऊन झोपली. पहाटे बराच वेळ झाला तरी आनंदी उठली नाही म्हणून निशा आनंदीच्या खोलीत गेली.
“आनंदी उठ, ऑफिसला जायला उशीर होईल. आज किती वेळ झोपतेस? उठ आता खुप उशीर झालाय. नाश्ता डबा सगळं बनवून ठेवलंय मी.”
“आई थोडा वेळ झोपू दे ना प्लिज.”
“नाही तुला ऑफिसला जायचंय आहे, आता जबाबदारी वाढली आहे तुझी, आता उशिरा उठून चालणार नाही. कॉलेजचं ठीक होतं थोडा उशीर झाला तरी चालत होतं पण ऑफिसमध्ये असं चालत नाही. तुझी नवीन नोकरी आहे तुला ती टिकवायला हवी आणि त्यासाठी वेळ सुद्धा पाळायला हवी. तू आज उशिरा गेली आणि रेड मार्क लागला तर तुझा नवीन बॉस तुझा पेमेंट कापेल आणि पेमेंटचं जाऊ दे पण ती सवय लागायला नको उशिरा जाण्याची.” निशाने तिचा हात धरुन तिला उठवलं, तिच्या हातात ब्रश दिला आणि तिला बाथरूम मध्ये पाठवलं.
निशा फ्रेश होऊन आली तोवर ऑफिसला जाण्याची वेळ होऊन गेलेली होती. तिने उभं राहूनच सँडविच खाल्ला आणि पटकन डब्बा घेऊन ऑफिसला जायला निघाली, ती दारापर्यंत गेली मागे वळून बघितलं ती विचारात पडली आज बाबा का उभे नाहीत माझ्या मागे. तिने बाबाला आवाज दिला,
“बाबा बाबा चला मला उशीर होतोय.” विक्रम तर आतून आलाच नाही पण निशा बोलली
“आज विक्रम तुला सोडायला येत नाहीये. तुझं तुला जायचं आहे.”
“का ग आई? काल तर बाबा आले होते.” आनंदी
“काल पहिला दिवस होता म्हणून तुझ्यासोबत आले होते ते. तुला रोज रोज नेऊन देणार नाही. तुला तुझं ट्रॅव्हलिंग एकटीने करायचं. तुझ्या पर्समध्ये मी पैसे ठेवलेत टॅक्सीने किंवा बसने तू रोजचा प्रवास कर.”
आनंदीने कंटाळल्यासारखं केलं.
“काय ग आई?”
“आनंदी कंटाळा करायचा नाही, तुझा नवीन जॉब आहे. तुला आता वेळेवर घरून निघून वेळेवर ऑफिसला पोहोचले पाहिजे. जबाबदारी घे, जबाबदारीने वागायला शिक. पटकन 09:15 ची बस मिळेल तुला, चल निघ लवकर.”
निशाने तिला दाराच्या बाहेर सोडलं, आनंदी धावत धावत बसस्टॉप वर गेली. तिथे तिला बस मिळाली, पोहोचायला अर्धा तास लागला, ऑफिसला गेली. बर अजून पाच मिनिट बाकी होते. पाच मिनिटे झाली त्यानंतर तिने तिचं काम सुरू केलं. थोड्या वेळाने तिथे एक वयस्कर माणूस तिच्या समोर येऊन उभा राहिला.
“मॅडम चहा-कॉफी काही आणू?”
“तुम्ही कोण?”
“माझं नाव हरीश, सगळे मला इथे हरीशकाका म्हणतात. त्यामुळे तुम्ही पण मला हरीश काकाच म्हणा. मी इथे सगळ्यांचे चहापाणी वगैरे बघतो, सगळी छोटी-मोठी कामे करतो. तुम्हाला कॉफी आणू का मॅडम?”
“चालेल..”
हरीश काकाने आनंदीला कॉफी आणून दिली. एक घुट कॉफी प्यायली आणि तिला खूप रिलॅक्स वाटलं. हरीश ने कॉफी देऊन तो वळला आनंदीने आवाज दिला.
“हरीश काका कॉपी खूप छान झाली. थँक यु सो मच.”
“अहो मॅडम थँक्यू काय म्हणताय? तुमची सेवा करणे हेच माझं काम आहे, त्याचे पैसे मिळतात मला. त्यामुळे तुम्ही थँक्यू वगैरे म्हणू नका.” असं म्हणून तो तिथून निघून गेला.
त्याच्या बोलण्यात इतका नम्रपणा होता आणि तो नम्रपणा आनंदीला खूप भावला. आनंदीने मनोमन हसली आणि तिच्या कामाला लागली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा