Login

कथा : पुरणपोळी

.
कथा : पुरणपोळी

शनिवारचा दिवस होता. सखीच्या ब्युटी पार्लरमध्ये गर्दी होती. बारीक शरीरयष्टी लाभलेली , गौरवर्णीय कांती आणि कुरळे काळे केस असलेली " सखी " एक तृतीयपंथी होती. दहा वर्षांपूर्वी ती दिल्लीला आली होती आणि आज स्वतःचे ब्युटीपार्लर चालवत होती. अचानक तिला एक फोन आला.

" बोल रमेश. " सखी म्हणाली.

" दादा सॉरी.."

" बोल ना. "

" बाबा आजारी आहेत. पैसे हवेत. " रमेश रडू लागला.

" रमेश , रडू नको. काय झाले बाबांना ? मी येऊ का तिकडे ?"

" तू नको येऊ. बाबांना तू आवडत नाहीस. "

सखी भूतकाळात गेली. तिचे मूळ नाव " सुरेश " होते. सुरेश " पुरुष " म्हणून जन्माला आला असला तरी लहानपणीपासून त्याला " स्त्री " म्हणून राहायला आवडायचे. बायकांचे कपडे घालणे , बायकांप्रमाणे सजणे , वागणे वगैरे त्याला आवडत. अर्थातच घरून याला विरोध होता. वडिलांच्या मारहाणीला कंटाळून तो पळाला आणि दिल्लीला पोहोचला. तिथे त्याला भीक मागून जगावे लागले. बलात्कारासारखे प्रसंगही ओढावले. परंतु त्याने हार मानली नाही. काही तृतीयपंथीचा त्याला आधार मिळाला. तो मिळेल ते काम करू लागला. एका एनजीओमध्ये त्याला प्रवेश मिळाला. मेकअपची आवड लहानपणीपासून होती. त्या क्षेत्रातला कोर्स पूर्ण करून त्याने दुसऱ्यांच्या ब्यूटी पार्लरमध्ये काम शोधायला सुरुवात केली. त्याने स्वतःला एक " स्त्री " म्हणून स्वीकारले होतेच. परंतु नंतर जुनी ओळख पूर्णपणे पुसून त्याने "सखी " ही नवीन ओळख स्वीकारली. आपल्या गोड स्वभावाने तिने ग्राहकांचा विश्वास जिंकला होता. वडील संपर्कात नसले तरी लहान भाऊ अजूनही संपर्कात होता. सखीने ताबडतोब लहान भावाला पैसे पाठवले. वडीलांना तिच्या हातची पुरणपोळी फार आवडत. समोरून कधी कौतुक करत नसले तरी मागे मागे फार कौतुक करत. जेव्हा वडीलांची आठवण येत तेव्हा सखी पुरणपोळी बनवत. रात्री तिला झोप लागत नव्हती. सतत डोळ्यासमोर वडिलांचा चेहरा यायचा.

" मी स्वार्थी वागले. स्वतःचे स्त्रीत्व जपत मी जगाच्या नजरेत पुरुष म्हणून वावरू शकले असते. बाबांना माझ्यामुळे त्रास झाला. कारण मी " मर्द " नाही. पण मनात होणारी ती घुसमट मला स्वस्थ बसू देत नव्हती. एखाद्या पिंजऱ्यात अडकल्यासारखे वाटायचे. माझ्यामुळे लोक बाबांनाही कोतीचे वडील म्हणून हिनवायचे. "

सखी रडू लागली. तिच्या मनात वडीलांना भेटायची इच्छा तीव्र झाली. ती वडिलांना भेटायला निघाली. स्वतःची ओळख लपवत , मास्क घालत तिने घराजवळ चौकशी केली तर वडील ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्याचे नाव कळले. हॉस्पिटलमध्ये जाताच तिने चौकशी केली. आपला भाऊ वडिलांना ऍडमिट करून पळून गेल्याचे तिला कळले. तिने सर्व पेंडींग बिल पे केले. भावाचा शोध घेतला. तर भाऊ मित्रांसोबत पार्टी करत होता. सखी ताबडतोब तिथे पोहोचली. मद्याच्या नशेत असलेल्या भावाला पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने त्याला थोबाडीत मारली.

" लाज वाटत नाही ? बाप तिथं आजारी पडलाय आणि तू दारू पितोय ?"

" ए तू कोण मला सांगणारा सॉरी सांगणारी. छक्का कुठला. जा सिग्नलवर टाळ्या वाजव आणि दहा रुपये माग. "

" मी भीक मागत नाही तर स्वतःच्या कष्टाने कमावते."

" माहिती आहे तुझे कष्ट. ट्रकच्या मागे काय धंदे चालतात तुमचे ?"

" मग पैसे का मागत होता माझ्याकडून ? मी ब्युटीपार्लर चालवते. चांगल्या मार्गाने पैसे कमावते. तुला दरवेळी पैसे पाठवते. तरी तू बाबांच्या हॉस्पिटलचे बिल पे केले नाही. "

" उडवले तुझे ते पैसे. जा तूच सांभाळ तुझ्या बापाला. मी कमीत कमी मर्द तर आहे. तुझ्यासारखा हिजडा तर नाही. "

" मर्द ? एक रुपया कमावण्याची अक्कल नाही ? नोकरी नाही , ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही. बापाची पेन्शन खातो आणि माझेही पैसे असे उडवतो. जर मर्द असले असतील तर बरं झालं मी नामर्द आहे. "

भावाला बोलून काही फायदा नाही हे जाणून सखी परत हॉस्पिटलमध्ये गेली. वडीलांसमोर येऊन त्यांना मनस्ताप द्यायचा नाही हे तिने ठरवले होते. वडील शुद्धीवर यावे यासाठी ती मनोमन प्रार्थना करत होती. अखेरीस वडील शुद्धीवर आले. हॉस्पिटलमध्ये तिने सर्वाना विनंती केली की त्यांनी लहान भावानेच सर्व बिल वगैरे पे केले असे वडिलांना सांगावे. सखीने रागावल्यावर लहान भाऊही अधूनमधून हॉस्पिटलमध्ये येऊ लागला. एका नर्सच्या हातून सखीने वडिलांसाठी पुरणपोळी पाठवली. काही दिवसांनी वडिलांना डिस्चार्ज भेटला. सखी दिल्लीला परतली.

***

एक वर्ष उलटला. वडिलांचा मृत्यू झाला. सखीही मास्क घालून अंत्यविधीला आली. वडिलांच्या चितेला रमेश अग्नी देत होता पण सखीच्या वडिलांचे मित्र जाधवरावांनी त्याला अडवले.

" रमेश , हा अधिकार पहिल्या मुलाचा आहे. अग्नी देण्याचा मान सखीला भेटायला हवा. "

" जिच्यामुळे बाबांची मान खाली गेली तिला मान देऊ ?" रमेश म्हणाला.

" हो. कारण तुझ्या वडिलांची हीच इच्छा होती. "

जाधवरावांनी समजवल्यानंतर सखी पुढे आली. तिने पित्याच्या चितेला अग्नी दिला.

घरी गेल्यावर जाधवराव सखीला भेटले.

" सखी , तू हॉस्पिटलमध्ये सर्व बिल पे केले. समोर न येताच पित्याची सेवा केली. डॉक्टर आणि नर्सने ही गोष्ट लपवली तरी मी स्वतःला रोखू शकलो नाही. कारण तुझा भाऊ हॉस्पिटलच्या खर्चासाठी मित्राकडून उधार घेतल्याचे सांगून तुझ्या वडिलांना लुबाडत होता. पैसे मागत होता. जेव्हा तुझ्या वडिलांना सत्य समजले तेव्हा त्यांना पश्चाताप झाला. त्यांनी तुझ्यासाठी एक चिठ्ठी सोडली आहे. " जाधवराव यांनी चिठ्ठी सखीला दिली.

सखीने ती उघडली.

" बाळा , मी जीवनभर तुझा द्वेष केला तरी तू माझी सेवा केली. ज्या मुलाचा लाड केला तो तर वाया गेला. नालायक ठरला. तुझी आई आपल्याला लहानपणीच सोडून गेली पण मी तुला आईचे प्रेम देऊ शकलो नाही आणि वडिलांची छायाही देऊ शकलो नाही. तू लहानपणी पुरणपोळी बनवायची. ती अगदी तुझ्या आईसारखी लागायची. मी मेल्यावर पिंडात तशी पुरणपोळी बनवून ठेव. खूप इच्छा आहे ती खाण्याची. देवाने तुझ्यासारखा मुलगा सर्वांना द्यायला पाहिजे. फक्त माझ्यासारखा कठोर बाप कुणाला भेटू नये. तुला भेटायची फार इच्छा होती पण कोणत्या तोंडाने भेटावं कळत नव्हतं. या देशात बँक बुडवणारे खुलेआम फिरतात , घरगुती हिंसाचार करणारे तसेच भ्रष्टाचारी लोक पण अभिमानाने समाजात वावरतात. पण नैसर्गिक असलेले समलैंगिक व्यक्तिमत्त्व आपण स्वीकारत नाही. असो. मला माफ कर.
-तुझाच दुर्दैवी बाबा. "

सखी चिठ्ठी वाचताच रडू लागली. पिंडात तिने पुरणपोळी बनवून ठेवली. कावळ्यानेही लगेच त्या पुरणपोळीला शिवले.

©® पार्थ धवन
0