कथा मालिका
शिर्षक- कथा आणि व्यथा (भाग २ )
विषय - सामाजिक कथा
फेरी- ईरा राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा
हर्षल चे लग्न अगदी साधेपणाने पार पडले आता पुढील भाग.
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो...
दैव लेख ना कधी कुणा टळला .
वडिलांच्या तब्येतीमुळे हर्षलने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आणि अगदी व्यवस्थितपणे हर्षलचे लग्न पार पडले. संतोष रावांच्या
चेहऱ्यावर हास्य उमटले. ते पाहून सर्वांनाच बरे वाटले. आता आईला
थोडा आराम मिळेल या आशेने हर्षल ला सुद्धा बरे वाटत होते.
हर्षल ची पत्नी श्वेता. नव्या नवलाईचे काही दिवस बरे गेले.
सुरुवातीपासूनच श्वेता फारशी कोणातही मिसळत नव्हती.
सर्वांना वाटले नवीन नवरी, थोडा बुजरेपणा असेल म्हणून सर्वांनी
दुर्लक्ष केले. सोनल, शितल आपापल्या गावी निघून गेल्या.
श्वेता लाडात वाढलेली, आई वडिलांची एकुलती एक मुलगी.
सकाळी उशिरा उठणे, घरातल्या कोणत्याही कामाला ती हात
लावायची नाही. शीलाताई आधीच सहनशील. त्यांनी कधीच तिला
ब्र शब्दाने म्हटले नाही.
सकाळीच डबा घेऊन हर्षल ऑफिस मध्ये निघून जायचा.
सुरुवातीला त्यालाही वाटले, हळूहळू होईल श्वेताला कामाची सवय.
नसेल सुचत तिला. परंतु आता हे रोजचेच झाले. आपल्या आईलाच
सर्व कामे करावी लागतात याचे हर्षल ला वाईट वाटे. त्याने एकदा
श्वेताला याबाबतीत म्हटले "अगं श्वेता, आई थकली आता. खूप
कष्ट घेतले तिने 'मात्र त्याचे वाक्य संपते न संपते तोच श्वेताने
आवाज वाढवला. " मी काय इथे कामवाली म्हणून आले कां ?
मी नाही करणार काम. ठेवा तुमची ऐपत असेल तर नोकरचाकर. "
संतोष रावांनी श्वेताचे बोलणे ऐकले. त्यांचे तर अवसानच गळाले.
परंतु शीलाताईने त्यांना सावरले. "अहो श्रीमंत घरची लाडाची लेक
ती. होईल सवय तिला हळूहळू सर्व गोष्टींची."अशा तऱ्हेने
शीलाताई वेळ मारून न्यायच्या. पण दिवसेंदिवस श्वेताचा
उर्मट पणा वाढत गेला. सोनल, शितल यांच्याशी सुद्धा ती तशीच
वागायची. त्या दोघींचा मानपान तर दूरच पण त्या येताचं ती...
कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद घालायची. आता मात्र
सर्वांचाच संयम सुटत चालला होता.
दोन्ही मुलींना वडिलांच्या तब्येतीची काळजी वाटायची. हर्षल तर
पुरता गांगरून गेला होता. एकीकडे आई-बाबा, बहिणी आणि
श्वेताचे असे वागणे. मधल्या मध्ये तो अगदी पिचला जात होता.
प्रत्येक दिवशी नवीन वाद. एक दिवस संतोष रावांनी हर्षल ला
समजावून सांगितले. अरे हर्षल वाईट वाटून घेऊ नको. श्वेताला
आमची अडचण होत असेल तर तुम्ही दोघे दुसरे घर घ्या व तिथे रहा.
परंतु श्वेताने साफ सांगितले. मी येथून कुठेही जाणार नाही. त्यापेक्षा
तुमच्या आई-वडिलांना दुसरीकडे जाऊन राहायला सांगा.
आता तर श्वेताने अगदी क्षुल्लक कारणांवरून "मी माझ्या जीवाचे
बरे वाईट करेन. "अशा धमक्या सुद्धा द्यायला सुरुवात केली.
मात्र या सर्व गोष्टींचा परिणाम संतोष रावांच्या तब्येतीवर होत गेला.
त्यांची तब्येत दिवसेंदिवस जास्त खालावत चालली. डायलेसिस
सुरू झाले. घरातील सारी रौनकच हरवून गेली. शितल आणि
सोनलने येणेच कमी केले.
आता सर्वांनी ठरवले की आई-बाबांसाठी वेगळी रूम घ्यायची.
आणि त्यांना तिथे ठेवायचे कारण तब्येतीमुळे मुलीकडेही जायची
त्यांची इच्छा नव्हती. अशा तऱ्हेने संतोषराव आणि शीलाताई...
वेगळी रूम घेऊन राहू लागले. हर्षल चे पूर्ण लक्ष त्यांच्याकडेच...
असायचे. हर्षल ला खूप वाईट वाटे. पण इलाज नव्हता.
अलीकडे तर हर्षल सारखा विचारमग्न दिसायचा. त्याला
आई-वडिलांचे कष्ट आठवायचे. केव्हाही घरी येताचं हर्षल
दारातूनच आईला आवाज द्यायचा आई खूप भूक लागली आहे.
आई लगबगीने त्याच्यासाठी गरम गरम पोळ्या करायची. मुलांना
जे जे आवडते ते शीलाताई करून द्यायच्या. हर्षल ला हे सर्व
आठवत होते. आपल्याला जेव्हा बरं नसायचं तेव्हा आई-बाबा
आपल्या तब्येतीसाठी किती त्रास घ्यायचे. आणि आता...
आपण त्यांना वेगळं ठेवत आहोत. या गोष्टीचा त्याला खूप
त्रास होत होता.
आणि एक दिवस काळाकुट्ट उगवला. संतोष राव सर्वांना सोडून
देवाघरी निघून गेलेत. शीलाताई, सोनल, शितल, हर्षल यांचा
आकांत उपस्थितांचे हृदय हेलावणारा होता. श्वेता मात्र अगदी
मक्खपणे, निर्विकार चेहऱ्याने उभी होती. उभा जन्म कष्ट
उपसण्यात गेलेल्या शीलाताईंची अवस्था बघवत नव्हती.
तूटपुंज्या मिळकतीत सुद्धा आपल्या मुलांचे वाढदिवस छोट्याशा
प्रमाणात का होईना वृद्धाश्रमात किंवा अनाथाश्रमात साजरे करणारे
हे कुटुंब. दुसऱ्यां प्रति संवेदनशील असणारे हे कुटुंब. आज अगदी
निराधार झाल्यासारखे वाटत होते. कसेबसे स्वतःला सावरत
शीला ताईंनी मुलांना धीर दिला.
आता संतोष रावांना जाऊन एक महिना उलटला होता. एक
दिवस शीला ताईंनी आपल्या दोन मुली, जावई, हर्षल आणि श्वेता
यांना एकत्र बसविले. आणि आपला निर्णय त्यांच्यापुढे जाहीर केला.
"आता मी यापुढे स्वेच्छेने वृद्धाश्रमात राहणार. आणि हा माझा
अंतिम निर्णय आहे. मला आता कुणीही अडवणार नाही. "
सर्वांनाच आपण काय ऐकत आहोत हे कळेना. शीला ताईंनी..
पुढे बोलायला सुरुवात केली.
अरे मुलांनो, तुम्हाला आठवतं का? आपण जेव्हा जेव्हा
तुमचे वाढदिवस साजरे करण्यासाठी वृद्धाश्रमात जायचो.
तेव्हा घरी आल्यावर तुम्ही मला नेहमी नाना प्रश्न विचारायचे.
" आई, कां गं त्या काकू वृद्धाश्रमात राहतात. ?
" आई, तिथली आजी का रडत होती गं? "
बाबांना सुद्धा तुम्ही असेच प्रश्न विचारायचे.
" बाबा, ते आजोबा सांगत होते की मला दोन मुले आहेत.
मग का ते इथे राहतात?"
कदाचित मला वाटतं आज तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली
असतील. ज्या माता पित्यांमुळे आपण या जगात आलो ते आज
जड झालेत. हा पराकोटीचा स्वार्थीपणा आहे. जरी काही कारणांमुळे
वृद्ध पालक तरुणांना नको वाटत असले तरी ही त्यांना
चांगल्या प्रकारे प्रेमाने सांभाळणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
सर्वजण अगदी कानात प्राण आणून शीला ताईंच बोलणे ऐकत
होते. सर्वांची अवस्था जणू पुतळ्यागत झाली होती.
शीलाताई उठून उभ्या राहिल्या. आणि अगदी निर्विकार चेहऱ्याने
मागे वळून सुद्धा न पाहता बाहेर पडल्या. कधीही परत न ...
येण्यासाठी.
आज घरी दारी वृद्धांची काळजी घ्यायला कोणी नाही. अशी
बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
" लहानपण देगा देवा, पण म्हातारपण नको रे बाबा ."
अशी म्हण रुढ होण्याची वेळ वृद्धांवर आली आहे. म्हणूनच मुलांनो
आई-वडिलांचा आदर करा. आज तुम्ही आपल्या आई-वडिलांसोबत
असे वागाल तर उद्या तुमची मुलेही तुमच्यासोबत तशीच
वागतील. म्हणून मुलांवर योग्य संस्कार करा. त्यांना थोरामोठ्यांचा
आदर करायला शिकवा.
लहानपणीच संस्कार करा मुलांवर...
थोरामोठ्यांचा आदर करण्याचे....
वृद्धांवर दिवस येणार नाहीत...
आपल्याच मुलांपासून दुरावण्याचे.
वाचता वाचता वेचलेल्या काही ओळी.
आधार नसलेल्या हाताला..
आधार कुणी द्यावा...
बाप म्हातारा झाला म्हणून...
कां वृद्धाश्रमात न्यावा...
आईची माया लवकर...
विसरला रे तू भावा...
आधार नसलेल्या हाताला...
खरंच आधार कुणी द्यावा.
समाप्त.
धन्यवाद
लेखिका - सौ.रेखा देशमुख
टीम - अमरावती
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा