Login

कथा एका निष्पाप जीवाची भाग ५

Katha Eka Nishpaap Jeevachi Bhag 5
शीर्षक - कथा एका निष्पाप जीवाची भाग ५

अगदी खरंच, चांगलं जर व्हायचं असेल तर निश्चितच चांगल्या घटना घडायला लागतात. आनंदरावांचा ते ज्या ठिकाणी राहत होते तो पत्ता मिळाला. अगदी जर्जर अवस्थेत असलेल्या आनंदरावांना सुद्धा रश्मीने परत आणले. सासू-सासरे, मुलगा, सून, नातवंड एक भरलं गोकुळ तिथे दिसत होतं. कारण असेही असेल कदाचित की त्यांच्या " मायेचा विसावा" या वृद्धाश्रमात राहत असलेल्या अनेक लोकांचे आशीर्वादही असू शकतील. आपण कुणाचे चांगले जर करत असू तर देव सुद्धा त्याची दखल घेतो. आता कमी होती ती रश्मीच्या आई-बाबांची. त्यांनाही म्हातारपणात आधार हवा होता. आपल्या मुलीची प्रचंड मेहनत, तीने झेललेले नियतीचे प्रहार, तरीसुद्धा आज एखाद्या भक्कम वटवृक्षाप्रमाणे ती पाय रोवून उभी आहे. याचा यथार्थ अभिमान तिच्या मातापित्यांना होता. ते ही आता म्हातारे झाले होते. आपल्या मुलीने केलेला प्रेमळ आग्रह ते टाळू शकले नाही आणि रश्मी आपल्या आई-वडिलांनाही मायेच्या विसाव्यात घेऊन आली.आता ती एकटी नव्हती तर संपूर्ण सासर माहेर तिच्या पाठीशी होतं. सर्वांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी होते.
लवकरच तिने आपल्या संस्थेचा विस्तार वाढवला. प्रत्येकाकडे तिचं बारकाईने लक्ष असायचं अगदी मुलीप्रमाणे ती सर्वांची काळजी घ्यायची. आता प्रत्येकासाठी वेगवेगळ्या खोल्या, प्रत्येकांसाठी एक केअर टेकर यामुळे सर्वजण अगदी आनंदात होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते रश्मी जणू सर्वांची आई बनली होती.
एक दिवस निवांत बसली असताना तिने आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन केले. झाल्या गोष्टीचा परत मागोवा घेतला. खरंच हे सर्व आपल्या बाबतीत घडेल याची तिने कल्पनाही केली नव्हती. मात्र जसजशा घटना घडत गेल्या तशी तशी अधिक मजबूत होऊन ती पुढे जात होती. ती तिथेच मुळूमुळू रडत बसली असती तर?
कदाचित परिस्थितीनेच आपल्याला घडवलं असेल. काही गोष्टी जीवनात अशा घडत जातात की कोणी त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. तसे पहिले तर "माणूस परिस्थितीची निर्मिती नाही तर परिस्थिती ही माणसाची निर्मिती आहे."
काहींना सुख हे आयत मिळतं तर काहींना ते मिळवावं लागतं. मग ते शेवटी का मिळेना. पण उद्दिष्ट गाठणं महत्त्वाचं.
रश्मी विचार करत होती, माझा तर काहीच दोष नव्हता. मग कां मला एवढ्या मरण यातना भोगाव्या लागल्या? कां एवढे कष्ट सोसावे लागले? कदाचित परमेश्वराचा देखील यामागे काही उद्देश असेल.
एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन मला चालावयाचे असेल म्हणूनही हे सर्व घडले असेल कदाचित.
पण आज रश्मी खूप समाधानी होती. आता आपल्या नातवंडांकडे लक्ष देण्याची गरज आहे असं तिला वाटू लागलं. त्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. रविची दोन्ही मुलं हुशार होती. पण आई-वडिलांच्या सततच्या भांडणामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता. रविचा मुलगा राजीवने आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण केले. व नोकरी सुद्धा मिळवली. आणि मुलगी राजेश्वरी हिने सुद्धा आजीला मदत करता करता, आजीच्या स्नेहपूर्ण देखरेखीखाली स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. आता राजीव आणि राजेश्वरी दोघेही बहिण भाऊ उपवर झाले होते. रश्मीने राजेश्वरी चे शुभमंगल उरकले. होतकरू जावई तिला मिळाला लवकरच राजेश्वरीला बँकेत नोकरी लागली. ही सुद्धा जबाबदारी रश्मीने योग्य रीतीने पार पाडली होती. आता राजीव चे लग्न ठरले. त्यालाही त्याच्या साजेशी अगदी सुस्वभावी पत्नी मिळाली.
रश्मीच्या आनंदाला सीमाच उरली नाही. रविची पत्नी माही आता रश्मीला संस्थेच्या कामात मदत करू लागली.रविने सुद्धा स्वेच्छा निवृत्ती घेऊन रश्मीच्या संस्थेच्या कामात स्वतःला झोकून दिले. अर्थातच एकमेकांच्या सहकार्याने "मायेचा विसावा " या त्यांच्या संस्थेने खूप नावलौकिक मिळवला. ठिकठिकाणी रश्मीचा सत्कार होऊ लागला.
रश्मीची जीवन कहाणी खरोखरच अनोखी होती. एखाद्या पहाडाप्रमाणे परिस्थितीचे अनेक तडाके झेलत ती आज अगदी स्थितप्रज्ञ अवस्थेत उभी दिसते हे केवळ आणि केवळ तिच्या मनो निश्चयाने.
मला यावेळी कुठेतरी वाचलेल्या ओळी आठवल्या.
जन्माला आलास जगून बघ. जीवनात सुख दुःखे आहेत सोसून बघ.
चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस. दुःखाचे पहाड चढून बघ.
अपयश येतं निरखून बघ. डाव मांडणं सोपं असतं. खेळ खेळून बघ.
घरटं बांधणं सोपं असतं. थोडी मेहनत करून बघ.
जगणं कठीण, मरणं सोपं असतं. दोन्हीतल्या वेदना झेलून बघ.
जीवन मरण एक कोड असतं, जाता जाता एवढं सोडवून बघ.
जाता जाता एवढं सोडवून बघ.
खरंच जीवनाचा संपूर्ण अनुभव या ओळी सांगून जातात.

आयुष्य खूप साधं असतं.कधीकधी खूप रटाळ असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाही. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे. कुणीतरी लिहिलेल्या या ओळी सुद्धा बरंच काही सांगून जातात.