Login

कथा एका निष्पाप जीवाची भाग ३

Katha Eka Nishpaap Jeevachi Bhag 3
शीर्षक - कथा एका निष्पाप जीवाची भाग ३

नवऱ्याचा भरभक्कम आधार गमावलेल्या रश्मीचा पायांनी सुद्धा आधार सोडला होता. तिला आता कुबड्या घेऊन चालावे लागणार होते. अजून काय काय आपल्या नशिबात आहे? कां एखाद्याला देव एवढी जबरदस्त शिक्षा देतो? दोष कुणाचा? असंख्य प्रश्न तेही अनुत्तरीत.
पण असंख्य प्रश्नांचा गुंता सोडवत थांबण्यात अर्थ नव्हता. तिला तिची दोन मुलं समोर दिसत होती. तिने पुन्हा आपले बळ एकवटले. कारण हिम्मत हारून चालणार नव्हते. रश्मीने पुन्हा नोकरीवर जाणे सुरू केले. नोकरीवर जाताना तिला कुबड्यांचा आधार घेऊन जावे लागे. परंतु ठीक आहे. आपली मुले तर ठीक आहेत नां! त्यांना काही झाले असते तर?
नकारात्मक विचार झटकून टाकत जगत होती. तिने मुलांना योग्य संस्कार दिले. शिक्षण दिले. त्याही परिस्थितीत तिने मुलांना काही कमी पडू दिले नाही.
ऑफिसमधूनही तिला सर्वांची साथ मिळत होती. तिचे मन हळूहळू उभारी घेऊ लागले. मुलंही अनुभवाने समंजस होत गेली.
रश्मीच्या मोठ्या मुलाचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याला नोकरी सुद्धा मिळाली. रश्मीला खूप आनंद झाला. एक पाडाव तिने पूर्ण केला होता. आता मुलाच्या लग्नाचा विचार तिच्या मनात येऊ लागला.
मुलाचे लग्न झाले तर आपल्याला सुनेची थोडीफार मदत होऊ शकते. असे तिला वाटू लागले तिच्या आई-वडिलांनाही तेच वाटत होते. अखेर रश्मीच्या मुलाचे म्हणजे अविचे लग्न करायचे ठरले. पाहणी सुरू झाली. आणि एका तोलामोलाच्या घरच्या मुलीशी अविचे लग्न ठरले. अविची पत्नी माही सून म्हणून घरात आली. घरात सर्वांना आनंद झाला. रश्मीची मुलगी रिताला सुद्धा नोकरी मिळाली. ती तिच्या नोकरीच्या ठिकाणी दुसऱ्या शहरात निघून गेली. रश्मीच्या सर्व चिंता मिटल्या. तिला आता थोडेसे हायसे वाटू लागले. परंतु आता एका तिसऱ्या वादळाची सुरुवात झाली. माही एक बिनधास्त स्वभावाची मुलगी होती. तिला तिच्या सासूचा सहवास नको होता. मदत तर सोडाच पण थोड्या थोड्या कारणावरून ती रश्मीवर गुरगुरायची. रश्मीला आपला भविष्यकाळ स्पष्ट दिसू लागला. तरीही तिच्या समजूतदार स्वभावानुसार ती माहीला समजून घ्यायची. मात्र दिवसेंदिवस माहीचे वागणे रश्मीच्या सहनशक्ती पलीकडचे झाले. रवि नोकरीहून घरी आल्यावर माही त्याचे कान भरायची. तो माहीला म्हणायचा,

"नाही, माही तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. माझ्या आईचा स्वभाव मला चांगला माहित आहे तुझेच काहीतरी चुकत असणार."

असे म्हणत रवि माहीला समजवायचा. परंतु ती ऐकण्याच्या पलीकडची होती.
रश्मीला आपला भूतकाळ आठवायचा. अशीच रोजची कटकट आठवायची. फक्त पात्र बदलली आहेत. माझी सासू मला बोलायची, वाटेल ते आरोप करायची, आता सून बोलत आहे. फरक एवढाच.
कधी कधी ती एकटीच रडत बसायची. हळूहळू मुलगाही सुनेचेच ऐकायला लागला. कधी तर आपण जीवाचेच काहीतरी करून टाकावे असेही रश्मीला वाटू लागले. पण अजून मुलीची जबाबदारी तिच्यावर होती. तिचे लग्न व्हायचे होते. घरच्या रोजच्या कटकटी मुळे रविला दारूचे व्यसन लागले. आता तर त्याचे पिण्याचे प्रमाण खूपच वाढले होते. मुलगा म्हणून आईप्रती असलेले त्याचे कर्तव्य पार पाडायचे तर सोडाच पण उलट तोच आईशी वाद घालू लागला. मनुष्य परिस्थितीपुढे किती हतबल होऊन जातो पहा. रश्मी साठी सारे काही कल्पनाशक्तीच्या पलीकडचे होते.
आता मुलीचे लग्न करून टाकायचे व मोकळे व्हायचे आणि एखाद्या वृद्धाश्रमाचा मार्ग स्वीकारायचा असे रश्मीने ठरविले. रश्मी सेवानिवृत्त झाली. आता सुनेचा डोळा तिला मिळणाऱ्या पैशावर पडला. तिच्या वेगवेगळ्या मागण्या सुरू झाल्या.

"मुलीचे लग्न झाल्याशिवाय कुणालाच एक छदाम सुद्धा मिळणार नाही." रश्मीने निक्षून सांगितले.

मात्र परिस्थिती चिघळतच चालली होती. शेवटी रश्मीने आपल्या मुलाला व सुनेला दुसऱ्या ठिकाणी राहायला जाण्यास सांगितले. आता मुलीच्या लग्नासाठी तिने स्थळ पाहणे सुरू केले. आणि लवकरच तिच्या मुलीचे म्हणजे रविनाचे लग्न ठरले. आपण सासरी गेल्यावर आपल्या आईकडे कोण बघणार? एक तर तिला अपघातामुळे अपंगत्व आले आहे. रविनाला सारखी आईची काळजी वाटायची.
परंतु रश्मीने तिला समजावले.

"तू माझी काळजी करू नकोस रविना. मी काय एकटा जीव सदाशिव."

अखेर रविना चे लग्न सुद्धा थाटामाटात पार पडले. ती दुसऱ्या शहरात सासरी राहायला गेली. आता तर माहीला रानच मोकळे झाले.परंतु परिस्थितीशी झगडता झगडता एक प्रकारची आत्मिक शक्ती रश्मीला मिळाली होती.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all