Login

कथा एका निष्पाप जीवाची भाग ४

Katha Eka Nishpaap Jeevachi Bhag 4
शीर्षक - कथा एका निष्पाप जीवाची भाग ४

परिस्थितीशी झगडता झगडता एक प्रकारची आत्मिक शक्ती रश्मीला मिळाली होती. तिला आता कोणाच्याच कचाट्यात सापडायचे नव्हते. तिने स्वतःसाठी एक वेगळी योजना आखली होती. तिच्यासारख्या अगतिक, परिस्थितीचे लक्ष्य बनलेल्या स्त्रियांसाठी रश्मीने एक वृद्धाश्रम सुरू करण्याचे ठरविले. त्यादृष्टीने तिने हालचाली सुरू केल्या. त्यासाठी काही सहृदय व्यक्तींची सुद्धा तिला मदत मिळाली. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेल्या पैशातून तिने एक इमारत बांधली आणि " मायेचा विसावा " या नावाने एक वृद्धाश्रम सुरू केला. आणि अनेक असहाय्य महिलांची ती जणू माता बनली. हे सर्व करत असताना तिला मानसिक समाधान तर मिळू लागलेच, पण एक सुरक्षितता सुद्धा मिळाली.
हळूहळू या वृद्धाश्रमाची ख्याती सर्वदूर पसरली. या सर्व कालौघात इकडे तिच्या सासूला म्हणजे आनंदी बाईला अर्धांगवायू झाला. जणू तिला तिच्या कर्माचे प्रायश्चित मिळाले होते. कुणीतरी आनंदीबाईला रश्मीच्या वृद्धाश्रमाची माहिती दिली.
आनंदीबाईला केल्या कृत्याचा खूप पश्चाताप वाटत होता पण अशा म्हातारपणात कुणाचातरी आधारही हवा होता शेवटी आनंदीबाईंनी रश्मीला वृद्धाश्रमात येऊन राहण्याची विचारणा केली. धीरोदात्त आणि सहनशक्तीचे भांडार असलेल्या रश्मीला सासुबाईंचे हाल पाहवले नाही आणि रश्मी आनंदीबाईंना आपल्या वृद्धाश्रमात घेऊन आली. आनंदीबाईंनीही त्यांच्याजवळ असलेला पैसा अडका, घर सर्व रश्मीला देऊन टाकले आणि रश्मीने सुद्धा त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करून घेत आपल्या वृद्धाश्रमाचा नावलौकिक वाढवला.
इकडे रश्मीचा मुलगा रवि व सून माही यांचेही आपसात पटेनासे झाले. म्हणतात ना, " प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात."त्याप्रमाणे. माहीला रश्मीचा फक्त पैसा दिसत होता. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. दुसऱ्यांवर हक्क दाखवताना कर्तव्याचे ही भान ठेवले पाहिजे.
आपल्या सासूला आपली गरज आहे . दुर्दैवाने अपंगत्व आलेली ती एक स्त्री आहे हे सुद्धा ती विसरली होती. पण जेव्हा तिची मुलं मोठी होऊ लागली. बेताल वागू लागली. " इतिहासाची पुनरावृत्ती होते." असं म्हणतात. तेव्हा मात्र माहीला तिची चूक समजली. आपण आपल्या सासूशी असं वागायला नको होतं असं तिला वाटू लागलं. रविला सुद्धा केल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. पण आता करणार काय? कुठे शोधणार आपल्या आईला? म्हणूनच मुलांनी आपल्या विवेक बुद्धीने विचार करायला पाहिजे. आई ही आईच असते. क्षणिक सुखासाठी आपण केवढी मोठी चूक करून बसतो. पण वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला अर्थ नसतो.
आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले. त्यांना त्यांची कर्तव्य पार पाडताना किती यातना झाल्या असतील याचा निदान विचार तरी करायला हवा. मुलींनीही आपल्या आई-वडिलांप्रमाणे सासू-सासऱ्यांचा सांभाळ करावा. आणि मोठ्यांनीही आपली हुकूमत न गाजवता थोडीफार तडजोड करायलाच हवी.एकदा वेळ निघून गेली की ती परत येत नाही ज्याप्रमाणे दोरी किंवा रबर जास्त ताणला तर तुटतो व एकदा तुटल्यावर पुन्हा तो जोडता येत नाही. म्हणून वेळीच भानावर यायला हवे.
रविने आपल्या आईचा म्हणजे रश्मीचा चा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. पण एवढ्या मोठ्या शहरात काय माहित पडणार. मात्र एक दिवस पेपर मध्ये आपल्या आईच्या नावाची बातमी त्याने वाचली. पेपर मध्ये ठळक अक्षरात "मायेचा विसावा" संस्थापिका रश्मी. असे नाव व आपल्या आईचा फोटो पाहून तो खूप आनंदीत झाला. अनमोल ठेवा मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. लगेच रविने माहिती मिळवली व तो तिथे जाऊन सुद्धा पोहोचला. माय लेकरांच्या मिलनाचा तो अत्युच्च आनंदाचा क्षण होता. ते पाहून पाहणाऱ्यांची डोळे सुद्धा पाणावले. शेवटी" आई ती आईच." मुलाने घरची संपूर्ण परिस्थिती आई समोर विशद केली. मुलं कशी बिघडली, त्याला दोषी आम्हीच आहोत, पण आता तू मला पदरात घे, आता मी वाईट वागणार नाही. असे खूप काही तो बोलत होता. रश्मीला तर मुलगा मिळाल्याचा आनंद होताच. आता तिने सुनेला व नातवंडांना सुद्धा बोलावून घेतले. पूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आले. आता कमी होती ती आनंदरावांची म्हणजे तिच्या सासऱ्यांची. ते कुठे गेले काहीच पत्ता नव्हता. पोलिसांनी सुद्धा त्यांचा शोध घेतला होता. पण म्हणतात नां "चांगले व्हायचे असेल तर चांगल्या घटना आपोआपच घडत जातात."

क्रमशः
0

🎭 Series Post

View all