कथा नितीनच्या संसाराची भाग - ४

Katha eka purushya tyagachi

     
   #कथा नितीनच्या संसाराची भाग - ४

  मागच्या भागात आपण पाहिले की, कलेक्टर येऊन नितीनच्या घरच्यांना आणि नितीनला आपल्या जाळ्यात पूर्ण फसवून गेले. कोणालाच काही त्यांनी बोलू दिले नाही. जाताना रेखा आणि त्यांच्यासोबत आलेल्या तरूणाची नजरानजर होते. आता पुढे... 

    
   नितीनला कलेक्टरच्या बोलण्याचा अर्थ लागत नव्हता. ' का ते त्यांच्या मुलीला नितीनला भेटू देत नव्हते. नक्की काय लपवत होते. आपण तर तिच्या पायाला दोन बोटे नसल्याचे व्यंग मान्य केले आहे. मग अजून काय लपवत आहेत हे? 

 आप्पांना सांगू या का ह्या मुलीला पूर्ण ओळखल्याशिवाय मी लग्न करणार नाही. पण आप्पांना धक्का बसेल. होत्याचे नव्हते व्हायचे. काय करू ?' नितीन आपल्या विचारांतच असताना आप्पा त्याच्याजवळ आले. 

 " बेटा नितीन मला माफ कर, मी पुरता त्यांच्या जाळ्यात फसलो आहे. तुझ्या मनात जर काही वादळ चालू असेल तर चक्क नकार दे. फक्त नोकरीच जाईल माझी. बघूया पुढचे पुढे. काही तरी धंदा पाणी करू आपण "

  " नाही आप्पा असे काही नाही. मी तयार आहे लग्नाला. साखरपुड्याची तारीख ठरवून टाका. सगळे या महिन्यातच पार पाडा म्हणजे मला पुढच्या अभ्यासाला लागता येईल." नितीन म्हणाला.

    " ठिक आहे बाळा, उद्याच बोलतो मला माहीत आहे तू कुटुंबासाठी तुझ्या भविष्याचा त्याग करतो आहेस. याची मला व तुझ्या आईला कायम जाणीव राहिल. देव तुला कायम यशच देईल." अप्पा म्हणाले. 

  त्या दिवशी सगळे गुपचूप होते. कोण कोणाशी जास्त बोलले नाही. 

  दुसऱ्या दिवशी सकाळीचं शेजारच्या मंदाकाकू साखर उसनी मागण्याच्या निमित्ताने मालतीबाईंकडे आल्या. 

 " काय हो मालतीबाई बडी असामी आली होती काल तुमच्याकडे? काय रेखाला बघायला का? मुलगा छान आहे हो आम्ही बघितला. जोडा छान आहे हो भाग्यवान आहे रेखा. चला तोंड गोड करा. चहाला साखर द्या थोडी वाटीभर दुपारी परत देते." म्हणत काहीही ऐकू न घेता साखर घेऊन गेल्या पण. 

  " आई आता हे काय नवीन ? रेखाचं  लग्न, माझं लग्न काय चालले आहे सगळे ?" नितीनने विचारले.

  " जाऊदे, त्यांना साखर हवी होती म्हणून निमित्त काढून आल्या होत्या."

 सकाळी आप्पांनी कलेक्टर साहेबांना फोन करून सांगितले. साखरपुडा येत्या रविवारी करूया असे ठरले. 

 रात्र थोडी सोंग फार. साखरपुड्याला मोजकीच मंडळी ठरली. इकडे मित्रांच्या घरी नितीनच्या लग्नाची कुजबुज लागली होतीच. प्रत्येक जण आपापल्या मुलांना विचारून खात्री करून घेत होते. 

    साखरपुड्याचा रविवार आला. नातेवाईकात गाजावाजा न करता नितीनचे चार मित्र आणि घरची मंडळी साखरपुड्याला गेली.

  मुलीकडे जय्यत तयारी झाली होती. आदरातिथ्य मस्त झाले. 
साखरपुड्याच्या वेळी पहिल्यांदाच नितीनने सुषमाला पाहिले. सर्वसामान्य होती. अबोल वाटली, काहीच बोलली नाही पण तिलाही सगळे अनपेक्षित असेल असे वाटून नितीनचे थोडे टेंशन कमी झाले. 

   साखरपुडा छान पार पडला. लग्नाची तारीख काढली. पंधरा दिवसात लग्न. तयारीला पण वेळ नव्हता. 

   कलेक्टर साहेब शब्द दिल्याप्रमाणे सगळे व्यवस्थित पार पाडत होते. लग्नाची आमंत्रणे झाली. कलेक्टरच्या मुलीशी लग्न म्हणून सगळे नातेवाईक खुश होती. आपली छोटेमोठी कामे आता होतील यांच्या वशिलाने याचे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते.

 कोणाला कशाचे तर कोणाला कशाचे समाधान होते एवढेच. 

   रेखा पण खुश दिसत होती. कारण तो तरुण म्हणजे सुषमाचा मोठा भाऊ होता. तो काहीबाही काम काढून तिच्या मागे पुढे करत होता. 

  रेखा त्याच्या प्रेमात पडत होती. हे तिच्या चेहर्‍यावरून दिसत होते. हे तिची छोटी बहीण वसुधाच्या लक्षात आले होते. 

 लग्न थाटामाटात पार पडले. कोठेही उणे दाखवायला कलेक्टर साहेबांनी जागा ठेवली नाही. नातेवाईकांना अल्पावधीतच झालेला लग्नसोहळा स्मरणात राहण्यासारखा वाटला. 

  सुषमा लक्ष्मीच्या पावलांनी नितीनच्या घरी आली. तरीही अबोल. नवीन घर तिच्या मोठ्या घरातून लहान घरात आली म्हणून बावरली असेल. म्हणून थोडं सगळ्यांनी दुर्लक्ष केले.

  निघताना तिच्या आईने सांगितलेच होते " ती खूप अबोल आहे. रूळायला उशीर लागेल हो समजून घ्या."

 कलेक्टर साहेबांनी घरच्या सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी हनीमूनची तिकिटे नितीनच्या हातात दिली. महाबळेश्वरला मस्त फिरून या मजा करा असे सांगितले. 

    नितिनला हे सगळं नको होते. आत्ताच त्याला संसारात अडकायचे नव्हते. पण तिथेही कलेक्टर साहेबांनी त्याला चक्क धमकवलेच. 

  " जावई तुम्ही आता शिक्षणासाठी शहरात जाणार. सुषमा परत एकटीच तिला तर काही तुम्ही इतक्या लवकर शहरात नेणार नाही. मग या फिरून." अक्षरशः त्यांनी नितीनला गळचं घातली. 

    शेवटी नाईलाजाने नितीन सुषमाला घेऊन महाबळेश्वरला गेला. 

     इतके सुंदर वातावरण,
 पण सुषमा जेवढ्यास तेवढे बोलत होती. नितीनने तिला विचारले. " तू शिकली का नाहीस ? त्यावर तिने स्पष्ट सांगितले की, " मला शिक्षण आवडत नाही. जेमतेम सातवी पास झाले."
 
 पहिला धक्का होता तो नितीनला. सुषमाचे शिक्षण दहावीचे सातवीवर आले.

   " नितीन हो मी आपणाला नितीन म्हणाले तर चालेल का ?" अबोल सुषमा इतके बोलली मात्र नितीनला समजलेच नाही.

   " हो म्हण की, मला आवडेल." नितीन म्हणाला.

" नितीन मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. समजून घ्याल मला." सुषमा घाबरतचं म्हणाली." नितीन मी अबोल का झाले त्यामागे खुप मोठी कहाणी आहे."

 " काय बोलायचे आहे ? बोल मोकळेपणाने. आता आपल्यात एक पवित्र नातं आहे. कोणताही किंतु मनात नको ठेवूस." नितीनने सुषमाचा हात हातात घेत तिला वचन दिले. 

  " नितीन या पिढीतील मुलीला शिक्षणाची आवड नसेल असे होईल का?" सुषमाने नितीनला विचारले. 

   " हो खरंच ! ह्या गोष्टीवर माझा देखील विश्वास बसला नाही.नितीन म्हणाला. 

   " हो नितीन मला देखील शिक्षणाची आवड होती. नव्हे वर्गात मी हुशार होते. सगळ्या गोष्टी शिकून त्या आत्मसात करण्याच्या माझा कल होता.
अर्थातच टॉम बाय होते.खुप  बिनधास्त असायचे. 
  पण बाबांचा स्वभाव कडक होता. त्यामुळे बाबा घरी असले की आम्ही चिडीचूप असायचो.
    बाबांना कोणाकडे गेलेले किंवा घरी कोणी आले तरी चालायचं नाही. आमची अवस्था पिंजऱ्यात कोंडलेल्या पोपटाप्रमाणे होती. 
एका ठराविक वयात मी  देखील एका मुलाच्या प्रेमात पडले. घरचं वातावरण मला माहीत होतं. आपलं प्रेम यशस्वी होणार नाही.पण प्रेमाला हे कोठे माहित होतं ?
   व्हायचे तेच झाले आणि बाबांना जेंव्हा समजले तेंव्हा बाबांनी रागात माझ्या पायावर जोरात हातोडी घातली.आता कशी बाहेर जाशील असे म्हणाले. 
   मी त्या क्षणी चक्कर येऊन पडले. पाय रक्तबंबाळ. मी मेले की काय? असेच आईला क्षणभर वाटले.
   मी दिवसभर बाहेर असतो तुम्हांला साधं घरसंसार पण सांभाळता येत नाही म्हणून आईला देखील त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली.
   मला दवाखान्यात नेले. पायावर जड वस्तू पडल्याचे कारण देऊन पायावर उपचार झाले. त्याची निशाणी माझ्या पायाच्या दोन बोटांना मला कायम मुकावे लागले.
  त्याचबरोबर शाळेला पण कायमचा राजीनामा द्यावा लागला.
   नंतर बाबांचीआपल्या सत्तेचा वापर करून त्यांनी त्या मुलाचा व त्यांच्या कुटुंबियांना पण गावातून कायम हद्दपार केले. आजगायत तो कुठे आहे मला माहित नाही. 
   नंतर बाबांनी त्या गावातून दुसऱ्या गावात आपली बदली करून घेतली. ते गाव, शाळा, मित्रमैत्रिणी सगळे मग मागे पडले.
  दुसऱ्या गावात मला घराच्या बाहेर पडायला बंदी होती. बाहेर जाऊन परत आपले नाक कापेल ही कार्टी असे म्हणाले.
    माझी घरात घुसमट होत होती. समजा काही बोलले तर बाबा आपली जीभ हासडून टाकतील की काय अशी भिती मनाला वाटत होती म्हणून मी बोलणेचं बंद केले.
   नितीन मी अबोल नाही किंवा मुकी पण नाही हो." म्हणत सुषमा नितीनच्या गळ्यात पडून रडू लागली.

  बापरे किती निर्दयी आहे हा माणूस? ह्याला विरोध केला की हा काहीही करू शकतो.

   नितीनने सुषमाला शांत केले. आता तुला माझ्या घरात मोकळं वातावरणात मिळेल. तुझे खरे बोलणे मला आवडले. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता तुझे चुकीचे पाऊल कदापिही पडणार नाही." म्हणत नितीनने तिच्या पाठीवर थोपटले.
   नकार देणारा नितीन नकळतपणे सुषमाच्या प्रेमात पडू लागला. 

चार दिवस हनिमूनसाठी म्हणून नाइलाजाने आलेला नितीन नकळत सुषमाच्या प्रेमात पडला. दोघेही हळूवारपणे एकमेकांना समजून घेत होते. सुषमाने नितीनला एकट्याला शहरात जाऊन पुढील शिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली. मी आई आणि आप्पांसोबतचं राहेन हे कबूल केले.

    नितीनने तिला पुढील शिक्षणासाठी आग्रह केला.पण बघूया पुढे म्हणून सध्या तरी तिने विषय बाजूला ठेवला.

   दिवस सरत होते. पण नितीन मात्र सुषमात गुंतत चालला आहे हे त्याच्या मित्रांच्या नजरेतून सुटले नाही.

  वेळीच सावध हो म्हणून मित्रांनी  त्याला बजावले. पण सुषमाचा इतिहास त्याने त्यांना सांगितला तेव्हा ते देखील अवाक् झाले. प्रकाश तर म्हणाला आपल्या हातात पॉवर आली की आपण काहीही करू शकतो का? त्यापेक्षा मला आता कलेक्टर व्हायचेचं नाही.

    मित्रांनी त्याची समजूत घातली. आपल्या पदाचा समाजासाठी चांगला उपयोग कर पण तू कलेक्टरचं हो हे सांगितलं.

 नितीनच्या बाबतीत मात्र दैव लिला वेगळेच रंग दाखवून गेली. निसर्गाने आपले कार्य केले.

    सुषमाने गोड बातमी दिली. नको होते तेच झाले.पण सुषमाने दिलेला शब्द पाळला. तुम्ही जा शेवटी परमेश्वराला जे मंजूर ते होईल म्हणाली.

  आई आप्पांनी सुषमाची  छान काळजी घेतली. सुषमा पण सासरी पोषक वातावरण मिळाल्याने दिवसेंदिवस खुलत होती.

   पण आईने माहेरी बोलावले तरी माहेरी जायचं मात्र टाळतच होती. ती आईलाचं बोलावून घेत असे. लेक सासरी सुखी आहे हे पाहून आईची देखील चिंता मिटली. 

पण सुषमाच्या भावाच्या हेमंतच्या नितीनच्या बहिणीला भेटण्याच्या निमित्ताने सुषमाच्या घरी चकरा वाढल्या होत्या. घरी आल्यावर या ना त्या कारणाने तो रेखाशी संवाद साधत असे. 

  एकदा सुषमाने त्याला समजावले.  " हेमंत सारखे घरी येत जाऊ नकोस. माझ्या सासरचे लोक चांगले आहेत. त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. नाहीतर मला स्पष्ट शब्दात तुला समजावे लागेल."

   हेमंतने तिला सांगितले की, तुझी नणंदचं माझ्या प्रेमात पडली आहे. त्यामुळे आमचे प्रेम आम्हांला एकमेकांकडे खेचून आणते. नाईलाज आहे ताई."

  " हेमंत, तुझे पराक्रम मला माहित आहेत. तू आधी सुधार, नको तिच्या भावनांशी खेळू." सुषमा म्हणाली.

 " ताई तुला कोणाचे चांगले झालेले बघवत नाही का? " असे म्हणून हुज्जत घालून हेमंत त्या दिवशी सुषमाच्या घरातून बाहेर पडला.

    रेखाने हे दुरुन पाहिले. आपली वहिनी आपल्या प्रेमात अडथळा आहे हे तिला जाणवले. खरे कारण न समजावून घेता त्या दिवसापासून तिने वहिनीशी बोलणे सोडले.

  काय असेल हेमंतमध्ये म्हणून सुषमा त्याला बोलली असेल. पाहूया पुढील भागात.....


  क्रमशः

🎭 Series Post

View all