कथा नितीनच्या संसाराची भाग -५

Katha eka purushya tyagachi

  
 # कथा नितीनच्या संसाराची!.भाग - ५

  मागच्या भागात आपण पाहिले. सुषमाने सगळे सत्य नितीनला सांगितले. सुषमाला टाळणारा नितीन सुषमाचा प्रामाणिकपणा पाहून तिच्या प्रेमात पडला. निसर्गाने देखील आपले काम चोख बजावले होते. 

  सुषमा आई होणार होती. एवढी आनंदाची बातमी पण तिला माहेरी जायची इच्छा नव्हती. आई इकडे येऊन तिचे कोडकौतुक करायची.

   याच काळात सुषमाचा भाऊ हेमंत याचे नितीनच्या बहिणीला भेटण्याचे निमित्त काढून सुषमाच्या सासरी येणे जाणे वाढले.

    कारण रेखाचे व त्याचे प्रेमप्रकरण चालू झाले होते. 

    सुषमाने हेमंतला समजावयाचा खुप प्रयत्न केला. पण त्याचा गैरअर्थ हेमंतने घेतला. रेखाला तर सुषमा आपल्या प्रेमातला अडथळा वाटू लागली.

    हेमंत अति लाडाने वाया गेला होता. पैशाचा माज होता. वडिलांच्या अपरोक्ष तो मुलींना फिरवत असे. शिक्षणाला तर केव्हाच त्याने राजीनामा दिला होता.

     सुषमा त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करत होती. पण तो सुधारण्याचा पलिकडे गेला होता. सुषमाचे वडील मात्र या सगळ्या प्रकरणाकडे डोळे झाक करत.

   मुलगा आहे म्हणून पाठीशी घालत. सुषमाने हे प्रकरण नितीनच्या कानावर घातले. रेखाला समज दे म्हणून सांगितले.

    माझाच भाऊ आहे. पण रेखाच्या आयुष्याची मी वाताहत होऊ देणार नाही. असा विश्वास परत नितीनला दिला.

    पण रेखा हेमंतच्या प्रेमात पूर्ण वाहून गेली. आणि तिच्या अभ्यासाची गती मंदावली.

    दोघेही आता लग्न करणार म्हणून हट्ट धरून बसले. पण हे लग्न कलेक्टर साहेबांना मान्य नव्हते.

    त्यांना त्यांच्या तोलामोलाची सून घरात आणायची होती. पण लाडके चिरंजीव काय दिवे लावतात याची सुतराम कल्पना त्यांना नव्हती.

    या प्रकरणामुळे घरातील वातावरण नेहमीच कलुषित असे. याचा परिणाम सुषमावर आणि परिणामी तिच्या गर्भावर पण होत असे.

    दिवस दिवस सुषमा जेवत पण नसे. आई आप्पापण तिच्या काळजीत असायचे. कलेक्टर साहेब आता या प्रकरणातून हळूहळू हात काढून घेत होते.

    शेवटी जे होईल ते होईल म्हणून नितीनने सुषमाचा व आई आप्पांचा विरोध पत्करून रेखा व हेमंतचे एका मंदिरात जाऊन लग्न लावून दिले.

  व्हायचे तेच परिणाम झाले. दोघांनाही दोन्हीही घराचे दरवाजे बंद झाले. नितीनने आपल्या तुटपुंज्या मिळकतीवर दोघांनाही आपल्याबरोबर शहरात बस्तान बांधून दिले.. 

   इकडे यथावकाश सुषमा बाळंत झाली. मुलगी झाली. ती माहेरी गेली नाही. तिचीआईच लेकीच्या बाळंतपणासाठी आली.

   आता हळूहळू सुषमा संसारात रमत होती. मुलीच्या बाळलीलात आई आप्पा पण रमले होते. नितीन मधून मधून येत होता.

  थोड्या दिवसांनी नितिनला स्वकर्तृत्वाने  गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागली.

   आई आप्पांच्या इच्छेखातर तो सुषमाला आणि छोट्या प्रियांकाला घेऊन नोकरीच्या गावी गेला.

    मधून मधून आई आप्पा येत. थोड्या दिवसांनी परत सुषमाला दिवस गेले. इतक्यात नको प्रियांका निदान दोन वर्षांची तरी व्हावी म्हणत असताना. आई आप्पाने प्रियांकाची जबाबदारी घेतली. यावेळी मात्र सुषमाला जुळे झाले.

    दोन्हीही मुले. पण नशीब पहा मुले गोड होती अगदी लवांकुश पण वयोमानानुसार त्यांची बुद्धी मंद होती. दोघेही तसेच.

  नितीनने खूप प्रयत्न केले पण थोडी सुधारणा झाली. पण दोघेही दुर्दैवाने मतीमंदच राहिले. फार मोठा अघात होता हा कुटुंबावर. या सगळ्याचा परिणाम सुषमावर झाला ती थोडी डिप्रेशनमध्ये गेली. 

    तिची परत ट्रिटमेंट सूरू झाली. नितीनचा  सगळा पगार औषध, दवाखाना यावर खर्च होत असे. 
मुलगी मात्र गोड होती. आता वयात येत होती. 

  परत नको नको म्हणताना परत सुषमाला दिवस गेले. मित्रांनी नितिनला समजावले. गर्भलिंग तपासणी करून घे, मुलगा, मुलगी काही असू दे. फक्त सुदृढ असो एवढेच. करून घे  तपासणी गर्भाची. मुलगी पण आता मोठी झाली आहे. वहिनींची पण तब्येत बरी नसते थांबव आता. सतीश डॉक्टर होता. त्याची बायको पण डॉक्टर होती. त्यांनी नितीनला खूप समजावले.

  पण नितीनला वाटले. काही दिवसांनी मुलगी लग्न होऊन सासरी जाईल. ही दोन्ही मुले अशी, आपल्याला म्हातारपणी आधार हवा.

   व्हायचे तेच झाले. सुषमा घेत असलेल्या औषध गोळ्यांचा परिणाम तिच्या पोटात वाढणाऱ्या गर्भावर झाला. तिसरी संतती पण चक्क मतीमंदच जन्माला आली.

  आता मात्र नितीनला पश्चात्ताप झाला. त्याने सुषमाचे कुटुंब नियोजनचे ऑपरेशन करून घेतले. दिवसेंदिवस घरातील वातावरण बिघडत गेले.

    आई आप्पा वयापेक्षा मानसिक चिंतेनेच खूप खचले होते. एक दिवस एकामागोमाग दोघांनीही जगाचा निरोप घेतला.

   सुषमाची आई मधून मधून यायची. तीच काय आता नितीनला आधार होती. तिन्हीही मुले तीन प्रकारच्या आजारांनी त्रस्त मानसिक संतुलन बिघडलेली.

   एक काय ती प्रियांकाच तेवढी हुशार होती. या सगळ्यातून तिची सुटका करण्यासाठी नितीनने तिचे लवकर लग्न करायचे ठरवलं.

   एकदा प्रियांका सुरेशकडे येऊन म्हणाली, " काका ! बाबांना समजावा. मला अजून खूप शिकायचे आहे. पण बाबा माझ्या लग्नाचे बघत आहेत. काका पण प्रत्येक ठिकाणी मला नकार येत आहे. कारण तुम्हाला माहित आहे."

  " हो समजावतो मी नितीनला. आम्ही सगळे मिळून घरी येतो. काळजी नको करू." सुरेशने प्रियंकाला दिलासा दिला.

    पण सगळ्यांचा एकत्र मेळ बसून नितीनकडे जायला थोडा उशीर झाला.

    एक चिठ्ठी लिहून ठेवून प्रियांकाने आपला जीव दिला. घरातील वातावरण यामुळे माझे शिक्षण अर्धवट आणि बाबांनी घातलेला लग्नाचा घाट, स्थळांकडून येणारा नकार मी पचवू शकत नाही. माझे शिक्षण पण होणार नाही आणि लग्न तर त्याहूनही नाही. मला तुमचे ओझे नाही व्हायचे. बाबा मला माफ करा.

   सगळे सुन्न झाले. नितीन एवढा हुशार, मोठा आॉफीसर, दिमतीला गाडी, घर पण कसलेच सुख त्याच्या नशिबात नव्हते.

 आज नितीनचे सगळे मित्र चांगले स्थिरस्थावर आहेत. गलेलठ्ठ पगार कमावतात.

   गावात पण सगळ्या सोयीसुविधा त्यांनी केल्या. नितीनचा पण यात फार मोठा वाटा आहे. रेखा पण हेमंत बरोबर सुखात आहे. तिने हेमंतला पूर्ण बदलवले.

  छोटी वसूधा पण खूप शिकली. आपल्या पायावर उभी राहिली. नितीनने चांगले स्थळ पाहून तिचे  लग्न करून दिले. तिच्या संसारात ती सुखी आहे.


 नितीनने एक भाऊ, एक मुलगा व जावई म्हणून सगळ्या जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडल्या. नातेवाईकांना पण जमेल तशी मदत केली.

  कलेक्टरसाहेबांची आजारपणात शेवटची सेवा देखील हेमंतपेक्षा नितीननेच केली. कित्येकांचे संसार उभे केले. 

    आजही मित्र जेव्हा नितीनच्या घरी जातात तेव्हा 
हे चित्र पाहतात. मुले मोठी झाली आहेत. फक्त ते स्वतःची  सगळी कामं करतात. बाकी काहीही समजत नाही. सुषमा शुन्यात नजर लावून आढयाकडे बघत बसलेली असते. 

    ' नक्की देवा कोणत्या जन्माची शिक्षा नितीनला दिली ' असा प्रश्न सुरेश,सतीश आणि प्रकाश देवाला विचारतात. 

 परत नितीनला धीर देतात. काळजी करू नकोस आम्ही कायम तुझ्या पाठीशी नाही तर बरोबरच आहोत.

  नितीन नेहमीप्रमाणे शर्टाच्या बाहीला आपले डोळे पुसून म्हणतो आता सगळे संपले रे!

  लग्नापर्यंत आई आप्पांचा निर्णय होता. पुढे तर माझ्याच हातात होते. एका चुकीची एवढी मोठी शिक्षा!.. 
  
  या प्रश्नाचे कोणाकडेच उत्तर नसते हे मात्र खरं. कारण नियतीने माणसाच्या दैवात काही भोग लिहिलेले असतात आणि माणसाला ते भोगावेच लागतात. टाळताच येत नाही. दुसरे काय आपण म्हणू शकतो? 

 " शेवटी जिवन में उल्झन ही उल्झन है उसे  कोई सुलझा नही सकता, रोता तो दिल है, लेकिन आसू बहानेंसें फायदाही क्या ?"

समाप्त

🎭 Series Post

View all