Login

कथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 5

प्रशांत आणि शामलच्या प्रेमाची कथा

शितल ठोंबरे( हळवा कोपरा )

कथा तुझी अन माझी...प्रेमापासून लग्नापर्यंत..(भाग5)

रेश्माची पाठवणी झाली...ती आपल्या घरी सुखात नांदू लागली...

शामल आणि प्रशांतची ती शेवटची भेट होती...त्यानंतर त्या दोघांची पुन्हा भेट झाली नाही...

दोघांच विश्व वेगळं होतं...दोघेही आपापल्या विश्वात रममाण होते...

रेश्मा कधी माहेरी आली तर...फक्त ख्यालीखुशाली पुरतं प्रशांतच्या कुटुंबाचा उल्लेख होई...प्रशांत बद्दल जे काही ऐकायला मिळे ते रेश्मा जेव्हा सासरच्या गप्पा करी त्यामधूनच....त्याव्यतिरीक्त शामल आणि प्रशांतचा कसलाच संबंध येत नव्हता...

शामल आणि प्रशांतच्या भेटीचा योग रेश्माच्या लग्नानंतर वर्षभराने आला...रेश्माच्या ननंदेच्या मुलीच्या बारशाच्या कार्यक्रमात...पण ते ही फक्त दोघांनी एकमेकांना स्माईल दिली इतकाच काय तो त्यांचा आमना सामना.... 

त्यानंतर थेट दोन वर्षांनी रेश्माला पहिला मुलगा झाला ...हर्ष तेव्हा त्याच्या वाढदिवसाला शामल अन प्रशांत पुन्हा भेटले...

शामलचा आपल्या भाच्यावर  अन प्रशांतचा आपल्या पुतण्या हर्ष वर खूप जीव होता...दोघांच्याही घरात तेच लहान मूल होते...त्यात दोघांनाही लहान मुलांची आवड...शामल आणि प्रशांत मधली ही एक कॉमन गोष्ट होती...

हर्षच्या वाढदिवसाची तयारी दोघेही अगदी सकाळपासून झटून करत होते...वाढदिवस अगदी जोरदार साजरा झाला...

रात्री उशिरापर्यंत सगळे पाहुणे निघून गेले... शामल मात्र ताईच्या मदतीसाठी ताईच्या इथेच थांबली... 

प्रशांतही आपल्या कुटुंबासमवेत बाहेर पडला...प्रशांत शामलशी काही न बोलताच निघून गेला...

त्यामुळे शामल नाराज झाली...

शामल आपल्या मनाशीच विचार करत होती ...'सकाळ पासून एकत्र आहोत पण घरात सगळे असल्यामूळे नीट बोलता ही नाही आलं...आणि आता हा खडूस काही न बोलताच निघून गेला...साध बाय करावसं ही वाटलं नाही त्याला...जाऊ दे नाही बोलला तर नाही मी का ऊगाच त्याचा विचार करतेय...'

तेवढ्यात प्रशांत मागे फिरला ...स्माईल देत त्याने शामल ला बाय म्हटलं...'भेटू पुन्हा' म्हणत तो नजरेआड ही झाला...

शामल पाहतच राहिली...शामल ची कळी पुन्हा खुलली...हसतच तिने त्याला बाय केलं...

शामलने आपलं ग्र्यज्युएशन फर्स्ट क्लास ने पास केलं... त्यानंतर तिने पुढिल शिक्षणासाठी मुंबई युनिवर्सिटी कलिना येथे एम.ए ला प्रवेश घेतला....शामल आपल्या शिक्षणाबाबत खूपच सिरियस होती...शामलच्या डोळ्यांत स्वप्न होती...ती स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द होती...तिला बी.एड करायचे होते...त्यासाठी तिने तयारीही सुरु केली होती...

पण प्रशांत मात्र शिक्षणाच्या बाबतीत अगदीच उदासीन होता...त्याने एफ.वाय नंतर आपले शिक्षण सोडून दिले होते....कम्प्यूटर्स चं कसलंसं काम सुरु केलं पण त्याच त्यातही मन लागत नव्हतं...प्रशांत कधीच एका गोष्टीत जास्त गुंतून पडत नसे...पटलं तर ठिक नाही तर ती गोष्ट अर्ध्यातच सोडून द्यायची अशी त्याची वृत्ती...

घरचे त्याच्या मागे लागलेले शिक्षण पूर्ण कर...काही कोर्स कर ...पुढे नोकरी मिळवताना फार अडचणी आहेत...आताच योग्य निर्णय घे...पण प्रशांत स्वत: च्याच धुंदीत असायचा...कोणाचं ऐकायचं नाही आपल्या मनाचच करायचं...हा त्याच्या लाइफ चा फंडा...

रेश्माच्या लहान दिराचे लग्न ठरले ...लग्न वाईला होते...शामल आपल्या ताईसोबत काही दिवस आधीच या लग्नासाठी गेली...

प्रशांतही आपल्या कुटुंबा सोबत आला होता...

घरात मेहेंदीचा कार्यक्रम सुरु होता...शामल मेहेंदी काढण्यात एक्सपर्ट होती...त्यामुळे प्रत्येक जण तिच्याकडून मेहेंदी काढून घेत होता...

तोच अचानक प्रशांत कोठून आला आणि पटकन शामलच्या समोर हात धरला...'आमच्या हातावर मेहेंदी काढली तरी चालेल म्हटलं...'

शामल त्याला हसत म्हणाली...' मुलं मेहेंदी काढत नाहीत...पण तुम्हाला भारीच की हौस दिसतेय...'

'मेहेंदी नाही नाव तर काढू शकतेस...'

'कोणाचं नाव काढू...???' ...शामल म्हणाली...

रमेश तिथेच होता तो म्हणाला...'त्याच्या होणारया बायकोचे आणखी कोणाचं काढणारं...'

शामल नाक उडवत म्हणाली ...'आम्हांला काय माहित यांची होणारी बायको कोण आहे..???'

प्रशांत हसत म्हणाला...'होणारया बायकोचे जाऊ दे ..ती भेटेल तेव्हा बघू ...आत्ता तर माझे नाव तर लिहीशील माझ्या हातावर...'

शामल ने प्रशांतचा हात हाती घेतला...'बोला काय लिहायचयं? तुमच्या मागे इतरही मेंबर्स ची रांग लागली आहे '

प्रशांत हळूच  म्हणाला ...'माझं हृदय '

शामलने प्रशांत कडे कटाक्ष टाकला...

'अगं हार्ट काढ माझं माझ्या हातावर'....प्रशांत हसत म्हणाला..

शामल ने हार्ट काढले अन प्रशांत कडे पाहून म्हणाली ...'बोला लवकर ....आता काय काढू???'

'त्यात माझ्या नावाचा छोटासा P काढ...'

शामलने P काढताच प्रशांत म्हणाला ....'त्याच्या बाजूला आता  छोटासा S काढ...'

हे ऐकताच शामल चपापली...प्रशांत तिच्याकडे पाहून हसत होता...

शामल म्हणाली....' नक्की S काढू का? कारण मेहेंदीचा रंग एकदा चढला की तो लवकर जाणार नाही...'

प्रशांत तिच्याकडे पाहून मिश्किलपणे हसत  होता....'काढ की मी काय कोणाला घाबरतो की काय???'

शामल ने S काढताच...प्रशांत म्हणाला...'पुढे T लिही त्याच्या...'

शामल ला काही समजले नाही ...ती प्रशांत कडे पाहतच राहिली...

अगं P.S.T म्हणजे प्रशांत सुधीर ठोंबरे...तुला काय वाटलं???

काही नाही ....म्हणत शामल प्रशांत कडे पाहत हसू लागली...

लग्नात खूप धमाल केली सगळ्यांनी ....मुंबईला परतत असताना प्रशांत आणि शामल चे कुटुंब एकाच बस मधून निघाले....रात्रीचा प्रवास त्यात शामल चे कुटुंब पुढे तर प्रशांतचे कुटुंब मागे बसलेले...

पहाटे चार वाजता शामल चे कुटुंब गाडीतून उतरले...बस मधील लाइट बंद असल्याने शामल आणि प्रशांत उतरताना एकमेकांना पाहूही शकले नाही...की निरोप ही घेऊ शकले नाही...

घरी पोहोचल्यावर शामल सहज आपला फोन चाळत असताना तिला प्रशांतच्या नावाने नंबर सेव असलेला दिसला...'हा नंबर माझ्या फोन मधे कसा काय ?? मी तर घेतला नाही ...पण मग प्रशांतने तर नसेल दिला??

'काय करू फोन करून पाहू का?? काय म्हणेल तो...उगाच काही गैरसमज नको व्हायला...'

त्याला गरज असेल तर तोच करेल मला फोन असं म्हणत शामल ने प्रशांत ला फोन करायचा विचार सोडून दिला...

दोन तीन दिवस असेच गेले पण प्रशांतचा काही फोन आला नाही...शामलच्या डोक्यातून प्रशांत नावाचं वादळ काही शांत होतं नव्हतं...

कदाचित त्याने फक्त त्याचा नंबर दिला असेल आणि माझा घेतलाच नसेल तर...मी जशी त्याच्या फोन ची वाट पाहत आहे तो ही असचं माझ्या फोन ची वाट तर पाहत नसेल...नाना विचार शामल च्या डोक्यात घूमत होते...

शेवटी न रहावून शामलने प्रशांतला कॉल केला...ती पहिल्यांदाच प्रशांतशी फोन वर बोलत होती...
'हेलो प्रशांत...'

हा बोलतोय आपण कोण??

मी शामल!!

शामल... बोल कसा काय फोन केलास मला तर वाटले होते मुंबईला आल्यावर तू मला पूर्ण विसरूनच गेलीस...

विसरलेही असते पण जाणूनबूजून कोणीतरी लक्षात ठेवायला लावलं

मी नाही समजलो...काहिच माहित नसल्याचा आव आणत प्रशांत म्हणाला...

हो का ??आता उगाच कोणी मी तो नव्हेच असं नको दाखवायला...एक तर फोन नंबर सेव केला आणि मला सांगितलंही नाही...

प्रशांत हसू लागला...

मी फोनच केला नसता तर...शामल म्हणाली...

मला खात्री होती तू फोन करशील...

हो का??

हो ....आणि तू ही  केलास फोन ....मी तर फक्त नंबर दिला... फोन करायला थोडेच सांगितलं होतं

रेश्मा ने जीभ चावली..लटक्या रागात म्हणाली...मी फक्त चेक करत होते कोणत्या प्रशांतचा नंबर आहे मला काय माहित तो तुमचाच आहे...

का??आणखीही कोणी प्रशांत आहे का???

नाही नाही अजिबात नाही...शामल पटकन म्हणाली...
शामलच्या या उत्तरावर दोघेही हसू लागले....

शामल आता आपण फ्रेंडस झालोच आहोत तर हे आहो जाहो च प्रकरण आधी बंद कर बरं...मला नाही आवडतं...

फ्रेंडस ???पण मी अजून तुमच्याशी मैत्री केलीय कुठे?? शामल प्रशांत ला चिडवत म्हणाली..

मैत्री केली नाही मग आता करुयात त्यात काय एवढं..नेकी और पूँछ  पूँछ...
मुझसे दोस्ती करोगी??..प्रशांत ने अगदी फिल्मी स्टाईल मध्ये म्हटलं...

देखूँगी...सोचूँगी...सोच कर बताउँगी...फिल्मी स्टाईल मधेच उत्तर देत... शामलने पटकन फोन कट केला...

शामलने असं फोन कट करणं प्रशांतला मुळीच आवडलं नाही....

प्रशांत ने शामल च्या फोन मध्ये तिच्याही नकळत त्याचा नंबर सेव्ह केला होता...तो नंबरच दोघांमधील संपर्काचा दुवा बनला...शामल आणि प्रशांत दोघांची मैत्री होईल का???त्यांच हे नातं पुढे कोणतं वळण घेईल???जाणून घेण्यासाठी भेटूयात पुढच्या भागात 
तोपर्यंत सायोनारा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा...कथेला दिलेल्या भरघोस प्रतिसादा बद्दल धन्यवाद...

0

🎭 Series Post

View all