Login

कथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 2

प्रशांत आणि शामल च्या प्रेमाची कथा

शितल ठोंबरे (हळवा कोपरा )

कथा तुझी अन माझी..प्रेमापासून लग्नापर्यंत...(भाग2)

शामलची मोठी बहिण रेश्मा ...तिने नुकतच आपलं शिक्षण संपवलं होतं..तोच अचानक एक दिवस शामलचे चुलत काका त्यांच्या घरी आले...शामल चे वडिल नुकतेच कामावरून घरी आलेले...

'काय भालचंद्र कसा आहेस? आणि आज इकडची वाट कशी काय सापडली तुला? तुम्ही लोकं तर विसरूनच गेला आहात आम्हांला...'

'काय रे दादा तू पण...कामामुळे कुठे वेळ मिळतो आहे... कुठे येण्या जाण्याला...आणि तू तरी कुठे फिरकतोस  रे आम्हां गरिबाच्या घरी...'

दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले...

इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या...तोपर्यंत शामलची आई चहापाणी देऊन जेवणाच्या तयारीला लागली...

'भावोजी आता आला आहात तर जेवूनच जा..'

'नाही हो वहिनी जेवणासाठी पुन्हा कधीतरी येईन आता महत्वाच्या कामासाठी आलो होतो...तेवढं करतो अन निघतो...'

'ते काही असो जेवनाशिवाय जाऊच देणार नाही मी तुम्हालां .... तुम्ही मारा गप्पा तोपर्यंत मी जेवणाचं बघते'...असं म्हणतं शामल ची आई स्वयंपाक घरात शिरली...सोबतीला रेश्मा होतीच...

शामल ची बारावीची परिक्षा जवळ आली होती...ती आपली कोपर्यात बसून अभ्यास करत होती...तसंही शामल ला घरातल्या कोणत्याही कामात रस नव्हता...आपला अभ्यास एके अभ्यास...कधी आईने काही काम सांगितले तरी शामल अभ्यासाचा बहाणा करून मोकळी होई...

शामलच्या बाबांचा याबाबतीत तिला पूर्ण पाठिंबा होता...त्यामुळे शामल जरा जास्तच शेफारली होती...

इकडे शामल चे बाबा अन भालचंद्र काका गप्पा मारू लागले...भालचंद्र काकांनी शामल ची बहिण रेश्मा ला गावी एका कार्यक्रमात पाहीलेलं...त्या आधी खूप लहान असताना तिला पाहिले होते...त्या कार्यक्रमात रेश्मा सगळ्यांना कामात मदत करत होती...स्वभाव अगदी शांत...सगळेच कौतुक करत होते तिचे..त्यांनी रेश्मा ला बरोबर हेरलं...

भालचंद्र काकांचा एक मित्र आपल्या मुलासाठी मुलगी शोधत होता...काकांनी रेश्मा आणि तिच्या कुटुंबा बद्दल कल्पना दिली...आणि मुला कडची मंडळी मुलगी पाहण्यासाठी यायचं म्हणतं होते...

मुलाची अन त्याच्या कुटुंबाची सर्व माहिती भालचंद्र काकांनी शामल च्या वडिलांना सांगितली...

शामल चे वडिल म्हणाले...'स्थळ चांगल आहे पण आम्ही अजून रेश्मा च्या लग्नाचा विचार च केला नाही'

'अरे! मग आता कर ....चांगल स्थळ असं हातचं जायला नको...'

ते आहेच रे ...पण पैश्यांची काही सोय नको का करायला.... तुला तर माहित आहेच माझी नोकरी ही अशी...मुलांच शिक्षण अन घरखर्च ह्यातच सारा पैसा जातो...जमा पूँजी अशी काही नाही...पसंती झालीच तर पुढे कसं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे...'

'सगळी सोंग आणता येतात पण पैश्यांच सोंग कसं आणणारं'

'होईल रे सगळं व्यवस्थित...तो वर बसला आहे न त्याला सगळ्यांचीच काळजी आहे ...काहितरी सोय होईल...आता निदान पाहण्याचा कार्यक्रम तर करु पुढचं पुढे बघता येईल...'

हो नाही म्हणता शामल चे वडिल मुलगा पहायला तयार झाले...शामल एका कोपर्यात अभ्यास करत होती...पण तिच सारं लक्ष काका आणि बाबांच्या बोलण्याकाडे लागून होतं...

ताईचं लग्न अरे व्वा मज्जाच मज्जा...ताईच्या लग्नाबद्दल बोलतायत आणि ताईला माहितच नाही...आता बघतेच तुला...

शामल स्वयंपाक घरात आली...आई तुला काही मदत करु का ? म्हणत उगाच कामामध्ये लुडबुड करु लागली...तिला पाहून आई आणि ताई दोघीही म्हणाल्या...आज सूर्य कोणीकडे उगवला म्हणायचा...??

तू आणि मदत करणार??

शामल लटक्या रागात म्हणाली...'का मी काही काम करत नाहीच वाटतं..ते तर बाबा मला अभ्यासाला बसवतात म्हणून नाहितर मी काम करायला तयारच असते...'

आई आणी रेश्मा दोघीही हसू लागल्या...

'तसेही आता ताईची रवानगी झाल्यावर मलाच की करावी लागणार तुला कामात मदत...'

रेशमा ने शामलचा कान पकडला....'काय गं माझी कुठे रवानगी करतेस??'

'ताई कान दुखतोय गं...मी नाही काही आई बाबाच तुझी रवानगी करणार आहेत तुझ्या सासरी.... काका बाबांशी त्याबद्दलच बोलत आहेत...तुझ्या साठी स्थळ घेऊन आलेत'

'रेश्मा ने  शामल चा पिरगाळलेला कान सोडला...अन लाजली '

'ए आई ही ताई बघ लाजतेय... असं म्हणतं शामल जोरजोरात हसू लागली...

हो का तुमचा नंबर लागला की तुम्ही पण अश्याच लाजाल ही राणीसाहेबा'...आई हसत म्हणाली...

लग्न नाही ग बाई...या भानगडीत आपण नाही पडणार... कोण करणार ते रांधा वाढा उष्टी काढा...माझं शिक्षण आणि मी बरी आहे...असं म्हणतं शामल ने बाहेरच्या खोलीत धूम ठोकली...

रात्री झोपण्यापूर्वी बाबांनी घरात भालचंद्र काकांनी सांगितलेल्या स्थळाबद्दल सांगितले...सगळेच खुश होते येत्या रविवारी पाहुणे मंडळी रेश्मा ला पहायला येणार होते...

सगळेच तयारीला लागले...अगदी साफसफाई पासून मेनू काय बनवायचा इथपर्यंत जय्यत तयारी सुरु झाली...

चहाच्या नवीन कपांपासून बसण्याच्या सतरंजी पर्यंत नवीन खरेदी करण्यात आली....

पाहुणे आल्यावर पाणी कोणी द्यायचं,मुलीला बाहेर कधी अन कोणी आणायचं  इथपर्यंत सगळी पूर्वतयारी झाली...

शामल ची त्यावेळी नेमकी परिक्षा सुरु होती...तिच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून शामल च्या अभ्यासाची सोय शेजारच्या काकूंच्या घरात करण्यात आली होती...

शामलची फार इच्छा होती....ताईला पहायला येणारया मुलाला एकदा तरी पाहण्याची ....आपला जिजू कोण होणार नको का पहायला?

पण बाबांपुढे शामलच काही चालले नाही...पाहुणे येण्याआधीच तीची रवानगी शेजारच्या काकूंकडे झाली....

शामलचं अर्ध लक्ष अभ्यासात तर... अर्ध नवरा मुलगा कसा दिसत असेल बरं हा विचार करण्यात लागलं होतं...

ताईच्या लग्नाची गडबड सुरु असताना शामल आणि प्रशांत ची भेट कशी झाली असेल बरे?? प्रश्न पडलाय न तुम्हांला...तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन नक्की भेटेन पुढच्या भागात...कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा...तुमच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा आहे मला...

तोपर्यंत सायोनारा भेटुयात पुढच्या भागात....शामल आणि प्रशांत सोबत...

0

🎭 Series Post

View all