कठपुतळीचा खेळ (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
कठपुतळीचा खेळ

रामा विचार करत करतच घरी झोक्यावर येऊन बसला. शारदा काहीतरी काम करत होती तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं.

“उचला” ती म्हणाली.

तरीही रामाचं तिच्याकडे लक्ष नव्हतं म्हणून ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली.

“उचला.” ती पुन्हा म्हणाली.

“काय उचलू?” त्याने विचारातच विचारलं.

“तुम्ही गुंडप्पाच्या घंटीवर बसला आहात त्या उचला. लक्ष कुठे आहे?” ती म्हणाली.

त्याने घंटी बाजूला काढल्या. ती त्याला दमला आहात का?, भूक लागली आहे का? असे विचारत होती तरीही त्याचं त्याकडे लक्ष नव्हतं. तो विचारेल त्याच्या काहीतरी वेगळंच उत्तर देत होता. शेवटी तिने त्याच्या तोंडावर पाणी शिंपडले आणि त्याला भानावर आणले.

“हे काय सुरू आहे तुमचं? लक्ष कुठे आहे? काय बडबड करताय?” तिने विचारलं.

“अगं शारदा आज दरबारात काय झालं हे ऐकलंस तर तुझंही डोकं चक्रावेल.” रामा म्हणाला आणि त्याने दरबारात काय झालं ते सांगितलं.

“हे काय सुरू आहे सगळं? माणसं कमी होती की काय म्हणून आता तुमच्या मागे सगळे जीवजंतू लागले आहेत. एका पोपटाने तुमचा भर दरबारात अपमान केला?” शारदा म्हणाली.

“प्रश्न माझ्या अपमानाचा नाहीये शारदा. प्रश्न आहे तो पोपट माझ्याबद्दल असं खोटं का बोलला? एका पक्ष्याचा यात काय स्वार्थ असू शकतो?” रामा म्हणाला.

इतक्यात अम्मा तिथे आली. तिने काठी आपटून संकेत द्यायला सुरुवात केली आणि शारदा बोलू लागली; “यांनी ऐकलं आहे सगळं. आधी ते माकड कमी होतं की काय म्हणून आता हा पोपट आला आहे. रोज तू दरबारात जातोस तेव्हा मला भीती वाटत असते. आज खबर घेऊन येईल की, उद्या आपल्याला हे घर रिकामं करायचं आहे, सगळं आवरायला घ्या.”

“एक.. एक.. एक क्षण! आत्ता काय म्हणालीस?” रामाने पुन्हा विचारलं.

शारदा आणि अम्मा याला काय आता ऐकूही येत नाहीये का अश्या काळजीत पडल्या. त्याने त्या दोघींना उजव्या, डाव्या, पाठमोऱ्या, समोरासमोर असे सगळीकडे फिरवून, जागा बदलून पुन्हा तेच तेच बोलायला लावलं. अम्मा त्याच खुणा करत होती आणि शारदा तेच बोलत होती. शेवटी त्या दोघी वैतागल्या.

“बुध्दी भ्रष्ट झाली आहे का?” शारदा म्हणाली.

“काय?” रामा ओरडला.

“असं मी नाही अम्मा म्हणतायत.” शारदा म्हणाली.

“पण तिने तर काही संकेत दिलेच नाहीत.” रामा म्हणाला.

“हो. देणारच होत्या. विचारा विचारा. हो ना अम्मा?” शारदा म्हणाली.

तिनेही हो म्हणले इतक्यात बाहेरून गुंडप्पा आला.

“आज इते कतपुतलीचा खेल आहे. वलशातून एकदा असतो. जाऊया?” तो म्हणाला.

“हो सगळेच जाऊया. मजा करूया.” शारदा म्हणाली.

त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

“जाऊया ना आपण? आता नाही म्हणू नका.” शारदा म्हणाली.

“नाही.” रामा म्हणाला.

अम्मा त्याला काठीने मारायला जाणार इतक्यात तो पुन्हा बोलू लागला; “नाही. आजच संध्याकाळी जाऊया. काय पुढच्या वर्षीपर्यंत वाट थोडी बघायची? सगळे मिळून जाऊ.”

सगळे खुश झाले.

“रामा तुला काहीतरी समजून आलंय असं वाटतंय.” बंधू म्हणाली.

“हो बंधू. थोडंफार तर समजतंय. बघूया याही वेळी देवी आईच साथ देईल.” रामा म्हणाला.
*************************
इथे आचार्यच्या घरी धनी आणि मणी त्या पोपटासमोर बसले होते. त्या पोपटाला एका थाळीत पेरू, मिरच्या आणि बरेच पदार्थ खायला ठेवले होते.

“मणी तुला वाटत नाही का या पोपटाचे मानसिक संतुलन बिघडले आहे? कोणी वेडाच असल्या पापी आणि लोभी माणसाला सज्जन म्हणू शकतो.” धनी म्हणाला.

“नाहीतर काय! त्या म्हाताऱ्याने आजवर कधी पुण्य केलंय?” मणी म्हणाला.

ते दोघं पोपटाला पुन्हा बोलतं करायचा प्रयत्न करू लागले पण तो काही बोलत नव्हता. मणीने त्याच्या समोरची पेरूची फोड उचलायचा प्रयत्न केल्यावर पोपट त्याला चावला. इतक्यात पोपटाचा मालक शमशेर खान तिथे आला आणि मागून आचार्य. त्याबरोबर दोघे गप्प बसले.

“शौक फर्माईये.” शमशेर खान आचार्य समोर पानाचा डबा करत म्हणाला.

“काय?” आचार्यने गोंधळून विचारलं.

“पान घ्या.” तो म्हणाला.

“नाही. नाही. आम्ही हे सगळं खात नाही. तुम्ही खा.” आचार्य म्हणाला.

त्याने पान तोंडात टाकले आणि आचार्यच्या आदरातिथ्याचे कौतुक केले.

“तू काय तिथे दरबारात वेड्यासारखा वागलास? आम्ही तुला सरळ महाराजांच्या समोर पाठवलं आणि मागितलं काय? तर फक्त एक लाख सुवर्ण मुद्रा? ते तर आम्ही मध्ये पडलो म्हणून नाहीतर फक्त एक लाख सुवर्ण मुद्रा मिळाल्या असत्या. लक्षात आहे ना? त्यातून आमचाही अर्धा हिस्सा आहे.” आचार्य म्हणाला.

“हो. तुमच्या बुध्दीला मानलं पाहिजे. तुम्ही एक लाख मुद्रांचे सरळ पाच लाख मुद्रांमध्ये रूपांतर केले आणि त्या पंडित रामाची पण चांगलीच वाजवली.” तो म्हणाला.

“हम्म. तुझ्या या पोपटाला अजून आमची प्रशंसा करायला शिकव.” आचार्य म्हणाला.

“अच्छा धनी! हे सर्व कुकर्म आपल्याच म्हाताऱ्याने केलं आहे म्हणून पोपट चांगलं चांगलं बोलला.” मणी कुजबुजला.

“हम्म. किती पोहोचलेला आहे बघ पण जाऊदे. आपल्याला काय! पाच लाख सुवर्ण मुद्रांमधून दोन चार तरी पदरी पडतील. ” धनी म्हणाला.

“ए! काय कुजबुज सुरू आहे?” आचार्यने विचारलं.

“काही नाही गुरुजी. तुमची प्रशंसा करतोय. आज त्या पंडित रामाला कळलंच नसेल हा पोपट असा त्याच्याबद्दल वाईट का बोलला ते.” मणी म्हणाला.

“त्याला कधीच कळणार नाहीये हे सगळं आम्ही रचलेलं कुचक्र आहे.” आचार्य टकलावरून हात फिरवत म्हणाला.

“पण मला एक वेगळीच भीती वाटतेय तो पंडित रामा काही करणार तर नाही ना?” शमशेर खानने विचारलं.

“तो यावेळी काहीच करूच शकणार नाही.” आचार्य म्हणाला.

“गुरुजी! पण या पोपटाची प्रतिभा खालावली आहे. जेव्हापासून इथे आला आहे एक शब्दही बोलला नाहीये.” मणी म्हणाला.

शमशेर खानने लगेच पोपटाला स्वतःच्या हातावर बोलवलं आणि त्याला बोलायला लावलं.

“मिठू! सांग यांना तुला यांचा पाहुणचार कसा वाटला?” त्याने विचारलं.

“खूप छान. धन्यवाद आचार्य. सर्व काही खूप छान आहे पण हे तुमचे दोन पोपट तुमच्या विषयी बोलत होते.” पोपट म्हणाला.

“कोण दोन पोपट?” आचार्यने विचारलं.

“हेच जे तुमच्या बाजूला आहेत ते. एक वाळका पोपट आणि एक जाड पोपट. ते तुम्हाला कुकर्मी, अधर्मी, पापी, लोभी म्हणत होते.” पोपट म्हणाला.

आचार्यने त्या दोघांकडे रागाने पाहिले. पोपट ते दोघे जे काही बोलले ते सर्व त्याला सांगत होता.

“म्हणजे हा अती शहाणा पोपट न बोलता फक्त आपण काय बोलतोय हे ऐकून पाठ करत होता.” मणी म्हणाला.

आचार्य खूप चिडला होता त्याचा अवतार बघून त्या दोघांनी लगेच त्याचे पाय धरले. त्याने रागात त्यांना उठवले.

“जा तुझ्या या पोपटाला अजून आमच्याबद्दल चांगलं बोलायला शिकव.” आचार्य म्हणाला.
**************************
इथे संध्याकाळी रामा आणि त्याचे कुटुंबीय खेळ पाहायला आले होते. कठपुतळीवाला माकड आणि मगरीची गोष्ट सांगत होता. तो एवढ्या सफाई आणि रांगतदरपणे ती सांगत होता की जेव्हा मगर पाण्याच्या मधोमध माकडाला त्याचे काळीज मागते त्या ओळीला तर अम्मा खुणा करत उठून उभी राहिली आणि शारदा बोलू लागली; “माकडा तू काळजी करू नकोस. या दुष्ट मगरीला मी बघते.”

रामाने कसेबसे तिला शांत करून खाली बसवले.

“अम्मा हा खेळ आहे. इथे खरं काहीच घडत नाहीये. गप्प बस आणि खेळ बघ आणि शारदा तुझं काय? लागली लगेच इथेही अम्माचे संकेत सांगायला. शांत बसून बघा.” रामा म्हणाला.

थोडावेळ रामाने निरीक्षण केले आणि तो पुढे जाऊन बसला. त्याने पडद्याच्या वर पाहिले तर एक माणूस त्या बाहुल्यांचे दोर हलवत होता आणि वेगवेगळे आवाज काढून बोलत होता पण त्याचे ओठ मात्र हलत नव्हते.

“मिळाला. मिळाला.” रामा अचानक ओरडला.

त्या माणसाने नाराजीने त्याच्याकडे पाहिले आणि रामा माफी मागून आनंदात पुन्हा जागेवर बसला.

“काय झालं? एवढे उत्साहात का ओरडलात?” शारदाने विचारलं.

“त्या पोपटाचे गुपित समजले शारदा. तो पोपट माझ्याबद्दल वाईट आणि आचार्यबद्दल चांगले कसे बोलला हे समजले.” रामा म्हणाला.

“म्हणजे?” शारदाने विचारलं.

“म्हणजे आत्ता बघ हा खेळ चालू होता तेव्हा या बाहुल्यांचे फक्त ओठ हलताना दिसले पण तो माणूस सर्व बोलत होता याचाच अर्थ त्या पोपटाची देखील फक्त चोच हलत होती बोलणारी एक व्यक्ती होती. त्याचे लक्ष राजकोषातील धनावर आहे आणि मी ते होऊ देणार नाही.” रामा म्हणाला.

“काय करणार तुम्ही?” शारदाने विचारलं.

रामा विचार करू लागला.

“रामा आता दे शारदाच्या प्रश्नाचे उत्तर. काय करणार आहेस?” बंधू म्हणाली.

अश्यातच खेळ संपला आणि रामा मागे थांबला. तो माणूस सर्व आवरून जेव्हा बाहेर आला तेव्हा रामाने त्याला अडवले. तो काकडी खात खात येत होता.

“आता काय तुमचे? खेळ संपला. आता कशात विघ्न आणणार तुम्ही?” तो जरा खोचकपणे म्हणाला.

“माफ करा महोदय माझ्या आणि माझ्या कुटुंबामुळे तुमच्या खेळात व्यत्यय आला पण काय करणार तुमची कला खूप छान आहे. असे वाटत होते ही गोष्ट नसून खरे घडत आहे.” रामा म्हणाला.

“धन्यवाद.” तो म्हणाला आणि पुढे जाऊ लागला.

“अरे अरे थांबा. मी तुमच्या कलेची प्रशंसा करायला आलो आहे. तुमचे नाव?” रामाने विचारलं.

“कोटेश्वरम्” तो म्हणाला.

“खरंच खूप अद्भुत कला आहे तुमची. ओठ न हलवता एवढ्या वेगवेगळ्या आवाजात कसे बोलता तुम्ही?” रामाने विचारलं.

“हे तर आमचे पिढीजात काम आहे. वर्षानुवर्षांचा अभ्यास आणि साधना यामुळे हे शक्य आहे. घ्या काकडी खा.” तो म्हणाला.

“नको. याला काय म्हणतात?” रामाने विचारलं.

“सगळे तर काकडीच म्हणतात.” तो म्हणाला.

“ते नाही. या कलेला काय म्हणतात? ही शिकता येते का?” रामाने विचारलं.

“अशी कोणतीच कला नाही जी शिकता येत नाही. घ्या काकडी खा.” तो म्हणाला.

“नको. मला शिकता येईल? किती वेळ लागेल?” रामाने विचारलं.

“का नाही येणार? येईल पण किती वेळ लागेल हे ज्याच्या त्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे.” तो म्हणाला आणि पुढे जाऊ लागला.

“थांबा. थांबा. मला ही कला शिकवाल का?” रामाने विचारलं.

तो माणूस बघतच राहिला. त्याला काही रामाला शिकवण्यात रस नव्हता.

“जर मी तुमच्या वेळेचे मूल्य दिले तर शिकवाल?” रामाने विचारलं आणि त्याच्या गळ्यातील एक सोन्याचा हार काढून त्याच्या हातात दिला.

तो माणूस तो हार बघत होता.

“तुम्हाला एवढी गुरुदक्षिणा तर मी देऊच शकतो पण कृपया मला शिकवा.” रामा म्हणाला.

“तुम्हाला काय वाटलं हा सोन्याचा हार बघून मी तयार होईन?” तो माणूस म्हणाला.

रामाला वाटले हा काही शिकवणार नाही इतक्यात तोच पुढे बोलू लागला; “तयार झालो समजा पण एक सांगतो मी काही यात पारंगत नाही. मला फक्त याची योग्य पद्धत येते ती मी शिकवेन बाकी सर्व तुमच्या ग्रहण क्षमतेवर आहे.”

“चालेल. मला पूर्ण विश्वास आहे यात देवी आई माझी साथ देईल. कधी पासून अभ्यास सुरू करायचा?” रामाने विचारलं.

“उद्या संध्याकाळी नगराबाहेर माझ्या घरी भेटा. फक्त लक्षात ठेवा उपाशी पोटी या.” तो म्हणाला.

“ठीक आहे. उपाशी पोटी येईन.” रामा म्हणाला.

त्याने रामाला पुन्हा काकडी घेण्याबद्दल विचारले.

“आता गुरुची आज्ञा कशी मोडणार? द्या.” रामा म्हणाला आणि दोघे आपापल्या मार्गाने निघाले.

क्रमशः…

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all