Login

कौशल्यानंदन ! पार्ट 2

.
राणी कैकेयी कोपभवनमध्ये गेली. मंथराने ही बातमी राजा दशरथापर्यंत पोहोचवली. राजा दशरथ तातडीने राणी कैकेयीजवळ पोहोचले. राजा दशरथविना कुणालाच महालात जाण्याची परवानगी नव्हती. राणी कैकेयीची ही अवस्था पाहून राजा दशरथाला वाईट वाटले. ते राणीच्या जवळ गेले.

" प्रिये , ही दुर्दशा का करून घेतली आहेस ?" राजा दशरथाने प्रेमाने विचारले.

" तुम्हाला जर माझे पूर्वीचेच रूप पाहायचे असेल माझे ते दोन वचन पूर्ण करावे लागतील. " राणी कैकेयी म्हणाली.

" कोणते दोन वचन ?" राजा दशरथ म्हणाले.

" विसरलात ? देवासुर संग्रामात मी तुमच्या रथाचे सारथ्य करत होते. " राणी कैकेयी म्हणाली.

" होय. मी जखमी झालो होतो. मी प्राणाला मुकलो असतो पण तू मला रणभूमीतून सुरक्षितपणे बाहेर काढले आणि माझ्यावर औषधोपचार करून माझे प्राण वाचवले. बोल प्रिये , काय हवे तुला ? आभूषणे , वस्त्रे ? तुझ्यासाठी हा दशरथ आपले प्राणही ओवाळून टाकेल. " राजा दशरथ म्हणाले.

" महाराज , प्राण नको तुमचे. तुम्हाला प्राणांहून प्रिय असलेला राम.." राणी कैकेयी म्हणाली.

" आता कळलं. रामाच्या राज्याभिषेकाचा निर्णय घाईत घेतला ते तुला आवडलं नाही ना ? कौशल्येपेक्षा तू रामावर जास्त प्रेम करतेस. तुला तयारी करण्याचा वेळच भेटला नाही ही तक्रार आहे का प्रिये?" राजा दशरथ म्हणाले.

" महाराज , राम सोडून तुम्हाला दुसरे काही सुचतच नाही का ? माझे दोन वचन आहेत की रामाला चौदा वर्षे वनवासाला पाठवा आणि भरतला राजा म्हणून घोषित करा. " राणी कैकेयी म्हणाली.

" कैकेयी , तुझी मती भंग पावली आहे का ? तुला कळत आहे तू काय म्हणत आहेस ? मी माझ्या तरुण मुलाला वनवासाला पाठवू ? कैकेयी , इतकी निष्ठुर का बनत आहेस ग ? काय बिघडवले आहे रामाने तुझे ?" राजा दशरथ म्हणाले.

" महाराज , मी माझे दोन वचन मागितले. क्षत्रियकन्या आहे मी. एका राजाची पुत्री , एका राजाची पत्नी. राज्य सोडून काय मागणार ? आभूषणे , वस्त्रे याची माझ्याकडे कमी नाही. रघुवंशीमध्ये वचन पूर्ण करण्याची परंपरा आहे. आता ही परंपरा पुढे न्यायची की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर निर्भर आहे. मला राम उद्याच वनवासी वेशभूषा घालून वनाकडे प्रस्थान करताना दिसला पाहिजे. जर ही वचने पूर्ण नाही झाली तर मी उद्याच विष ग्रहण करून आत्महत्या करेल. इश्वाकु वंशाची कीर्ती धुळीस मिळेल. तुम्ही स्वतःलाच नाही तर पूर्ण वंशाला कलंकित कराल. पुत्रप्रेमापोटी तुम्ही वचन तोडणार ?" राणी कैकेयी म्हणाली.

" माझ्या रामसाठी मी हे अपकीर्तीचे विष गिळून टाकायला तयार होईल. " राजा दशरथ म्हणाले.

" ठिके महाराज. इतके लक्षात ठेवा जर एकीकडे राम सिंहासनावर विराजमान झाला तर दुसरीकडे अश्वपतीपुत्री कैकेयीची चिता सजवली नाही. माझ्या हत्येसाठी केवळ तुम्हीच जबाबदार असणार. " राणी कैकेयी म्हणाली.

राजा दशरथ भूमीवर कोसळले. तेवढ्यात एक दासी धावत आली.

" युवराज राम भेटायला आले आहेत. " ती दासी म्हणाली.

" त्यांना आत यायला सांग. " राणी कैकेयी म्हणाली.

युवराज राम यांनी धीमी पावले टाकत राणी कैकेयीच्या महालात प्रवेश केला. प्रभूंचे रूप ते काय वर्णावे ? माझी लेखणी अजून तेवढी धारदार नाही. प्रत्येकजण ईश्वराला आपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे आणि व्यक्तिमत्वाप्रमाणे मनात रेखाटतो. श्रीरामांच्या मुखावर सूर्याइतके तेज होते. नेत्रे इतकी सुंदर होती की मनात राग धरून आलेल्या व्यक्तीचा राग क्षणार्धात मावळायचा. खुप मनमोहक नेत्रे होती. म्हणून मंथराने राणी कैकेयीला निक्षून सांगितले होते की रामच्या नेत्रांमध्ये नको बघू. राम संमोहित करतो. खरे होते तिचे. प्रभू आपल्या उदार अंतःकरणाने आणि प्रेमाने प्रत्येक भक्ताला संमोहित करतात. शरीर बांधेसूद होते. विविध पुरुषी सुवर्णअलंकाराने त्या राजस राजबिंडा रुपाला जणू कळसच चढत होता. पण या सर्व आभूषणापेक्षा सर्वात अद्वितीय आभूषण प्रभूंपाशी होते. ते आभूषण म्हणजे करुणा. प्रभू तर शत्रूंचाही मत्सर करत नसत. एकवेळ लक्ष्मण रागाच्या भरात काहीतरी बोल लावेल पण प्रभूंची शांतता ढळत नसे. वागण्या-बोलण्यात कमालीची नम्रता असे. प्रजेविषयी विशेष आत्मीयता असे. प्रजा तर जीव ओवाळून टाकत. सामान्य माणसालाही ते रूप पाहून हा कुणीतरी अवतारी पुरूष आहे असा भास होत. युवराजांनी येताच माता कैकेयी आणि पिता दशरथ यांचे चरणस्पर्श केले.

" पिताश्री , तुम्ही इतके अस्वस्थ का दिसत आहात ? उठा. मी तुमच्यासाठी जल आणतो. " प्रभू म्हणाले.

" राम , तू तुझ्या पित्याचे दुःख दूर करू शकतो. " राणी कैकेयी म्हणाली.

" नको कैकेयी. मी हात जोडतो. रामाला काही सांगू नको. " राजा दशरथ म्हणाले.

" पिताश्री , तुमचे दुःख दूर करण्यासाठी हा राम एकवेळ त्याचे प्राणही त्यागेल. मातोश्री , तुम्ही सांगावे. " प्रभू म्हणाले.

" देवासुर संग्रामात प्राण वाचवले म्हणून महाराजांनी मला दोन वचने मागायला सांगितली. मी महाराजांना ती दोन वचने आता मागितली. पण आता महाराज नकार देताय. " राणी कैकेयी म्हणाली.

" कोणती दोन वचने माते ?" प्रभू म्हणाले.

" एक तू 14 वर्षे वनवासाला जायचे आणि दुसरे भरताला राजा म्हणून घोषित करायचे. " राणी कैकेयी म्हणाली.

" इतकेच ? पिताश्री , या दोन्ही वचनांमध्ये विलाप करण्यासारखी कोणती गोष्ट आहे ? मातोश्रींनी तर माझ्यावर उपकार केलेत. चौदा वर्षे मला ऋषीमुनींचा सहवास प्राप्त होईल. आणि भरत कुणी परका थोडी आहे ? आम्ही चौघे भाऊ वेगळे कधीपासून झालो ? राजा मी बनू किंवा भरत काय फरक पडतो ? भरतमध्ये एका उत्तम राजाचे सर्व गुण आहेत. भरतच्या छत्राखाली अवधेच्या प्रजेचे हितच होणारे. हे माता कैकेयी , मी उद्याच वनाकडे प्रस्थान करेल. हे कौशल्यानंदनचे वचन आहे. " प्रभू म्हणाले.

क्रमश...

🎭 Series Post

View all