Login

"कौतुकाचे दोन शब्द"

कौतुकाचे दोन शब्द
कौतुकाचे दोन शब्द

नेहमीप्रमाणे सोनल आणि प्रांजल या दोघी मैत्रिणी आपसात गोष्टी करीत होत्या.

अगं सोनल, काल एक गंमतच झाली. आमच्या ऑफिस मधील मैत्रिणींची भिसी पार्टी सुरू होती. मनसोक्त गप्पा सुरू झाल्या. गप्पा गप्पांच्या ओघात एकीने प्रश्न विचारला, "फेस ग्लो" म्हणजे नेमकं काय?

आमच्यापैकी प्रत्येकीने कोणी आंतरिक चमक, कोणी सतेज चेहरा, कोणी चेहऱ्यावरची चकाकी अशी उत्तरे दिली.

सोनल प्रांजलची गोष्ट कान देऊन ऐकत होती. बरं मग पुढे काय झालं?

"अगं ऐक नां"

मी काय उत्तर दिलं असेल. मी म्हटलं ऑफिसमधून नेहमीप्रमाणे सोबत घरी आल्यानंतर "अगं तू आराम कर आज मी चहा करून आणतो तुझ्यासाठी." असं जेव्हा नवरा म्हणतो किंवा दिवसभर घरासाठी झटणारी, सर्व कामं पटापट आटोपून नवऱ्याचा डबा, मुलांचा टिफिन पॅक करून मुलांना व नवऱ्याला दारापर्यंत सोडत बाय करते. तेव्हा नवरा मागे वळून म्हणतो, "तू थकल्यासारखी दिसतेस. आता आराम कर थोडा.त्या क्षणाला जो सात्विक आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतो त्याला "फेस ग्लो" म्हणतात. आणि काय सांगू सोनल या माझ्या उत्तराला भरपूर टाळ्या मिळाल्या बघ.

"अरे वा! किती छान उत्तर दिलं तू"

खरं आहे गं. प्रत्येक स्त्री आपल्या घरासाठी, मुलांसाठी झटत असते. आपल्या नवऱ्याला स्वतःच्या हातचं गरम गरम जेवू घालायला तिला आवडतं. कारण ती तिची मनापासूनची इच्छा असते. म्हणूनच ती प्रश्न विचारते. "काय हो, भाजी कशी झाली?" ऐकेनासं करत त्याचं जेवनही उरकून जातं. उत्तराची वाट ती बघत नाही. कारण तिचं कौतुक कुणालाच नसतं. जणू त्याची तिला सवयच झालेली असते. तिलाही ऑफिसला जायचं असतं. मग ती पुढची काम भराभर आटोपते. उभ्यानेच एका हाताने काम करत जेवनही उरकून घेते.

सोनल, कधी कधी असं वाटतं स्त्री आणि पुरुष या चष्म्यातून न बघता केवळ माणूस म्हणून एकमेकांच्या भावनांचा, विचारांचा आणि संवेदनांचा विचार केला आणि त्यांचा आदर केला नां तर सगळं कसं छान होईल.

हो प्रांजल, अगदी बरोबर आहे तुझं.

ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा ती प्रसन्न चेहऱ्याने, आनंदी वातावरणात ऑफिसची काम पार पाडते. घरी नवऱ्याने केलेली चिडचिड, सासूबाईंचे टोमणे, कधी कधी व्यक्त केलेला संताप, अपमान तिला ऑफिसमध्ये जाणवू द्यायचा नसतो. अशावेळी स्त्रीने नेमकं काय करावं? जगावं लागतं म्हणून आयुष्य काढावं? की, तिला जगायचं आहे म्हणून आयुष्य स्वीकारावं. प्रश्न अतिशय साधे आहेत पण कायम पाठलाग करणारे भेडसावणारे आणि कधीही न सुटणारे आहेत. मनासारखं जगणं आणि मन मारून जगणं यातील तफावत शोधताना स्वतःलाच ती कर्तव्याची जाणीव करून देते. पुरुषांसारखे स्त्रिलाही मन आहे, हृदय आहे. कौतुक आणि प्रेम तिलाही हवं असतं. म्हणूनच कौतुकाचे दोन शब्द तिच्यासाठी पुरेसे असतात.

सौ. रेखा देशमुख
0