रेखाच्या माहेरहून कुणीही आलं तरी सासूबाईंचं लक्ष ते काय घेऊन आले याकडे असायचं..त्यांची मुलगी जेव्हा घरी यायची तेव्हा तिची बोळवण करतांना चार चार पिशव्या भरून द्यायचे, रेखाने सुद्धा माहेराहून असंच आणत जावं ही त्यांची अपेक्षा..
रेखाच्या नवऱ्याचं फिरतीचं काम, त्यामुळे तो सतत बाहेर असायचा. यावेळी तर पंधरा दिवसांसाठी तो परदेशी गेला आणि रेखाला संकट पडलं. नवरा घरी नसायचा तेव्हा सासूबाईंना चांगलाच जोर यायचा टोमणे मारायला. ज्याची भीती होती तेच झालं, त्या रेखाला म्हणाल्या,
"रेखा एखादी मोठी पिशवी आहे का गं?"
"आहे ना, कशाला हवीय?"
"यावेळी मिनू आणि तिची आई येईल तेव्हा तिच्याजवळ भरपूर सामान पाठवायचं आहे बरं.."
रेखाला रोख समजला, प्रत्यक्षात तिच्या नणंदेला जे सामान जाई त्यातलं अर्ध्याहून जास्त रेखाच देत असे. तिला नवीन कपडे, नवीन वस्तू, कॉस्मेटिक्स, शोभेच्या वस्तू हे सगळं रेखा आणून ठेवे आणि नणंदबाई आल्या की त्यांना देई..यावेळी रेखाने ठरवलं, आपणही सासुबाईंच्याच भाषेत उत्तर द्यायचं..
"ताईंची मजा आहे हो, माहेराहून सगळं मिळतं त्यांना.."
"का गं? तुला का नाही देत??"
"माझ्या भावाचं लग्न कुठे झालंय अजून..मलाही एखादी वहिनी असती तर मलाही चार चार बॅग भरून मिळाल्या असत्या.."
सासूबाई यावर अगदी निरुत्तर झाल्या..रेखाला मात्र जाम समाधान मिळालं, सासूबाईंच्या या वागण्यावर एका क्षणात तिने लगाम लावलेला..
रेखाचा नवरा परत यायला अजून चार दिवस बाकी होते, रेखा त्याचीच येण्याची वाट बघत होती.
संध्याकाळची वेळ होती. रेखा स्वयंपाकघरात होती आणि सासूबाई tv बघत बसल्या होत्या. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं..त्या सोफ्यावरच आडव्या झाल्या..रेखाचे सासरेही बाहेरगावी होते, घरात रेखा, साक्षी आणि सासूबाई होत्या फक्त. साक्षीने आजीला असं पाहिलं आणि ती घाबरली,
"आई..आई..आजीला बघ ना काय झालंय.."
रेखा धावतच बाहेर आली..तिने वेळ न दवडता रुग्णवाहिका बोलावली, दवाखान्यात नेलं..
डॉक्टरांनी सांगितलं,
"तातडीने सर्जरी करावी लागेल..तुम्ही फॉर्म भरा.."
रेखा फॉर्म भरायला गेली, सर्जरीचा खर्च बघून तिला चक्करच आली..रेखाकडे जेवढे पैसे होते त्याहून तिप्पट रक्कम गरजेची होती..आता काय करावं? सासरेबुवा आले, त्यांच्याकडेही फारशी शिल्लक नव्हती..रेखाच्या नवऱ्याचा फोन लागत नव्हता..
रेखाने वेळ न घालवता भावाला फोन केला आणि दुसऱ्याच मिनिटाला भावाने सगळी रक्कम रेखाला पाठवली, काही मिनिटात तोही हॉस्पिटलमध्ये हजर झाला..
सर्जरी झाली, काही दिवस दवाखान्यातच देखरेखीखाली ठेवण्यात आलं..एव्हाना रेखाचा नवराही आला. हॉस्पिटलमध्ये बेडवर सासूबाई निपचित पडून होत्या, परिस्थिती आता कंट्रोलमध्ये होती, डॉक्टर म्हणाले,
"वेळेवर आणलंत, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर गेली असती.."
सासूबाईंनी मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या,
"फार खर्च आला का रे पोरा?"
रेखाच्या नवऱ्याने रेखाकडे पाहिलं, रेखा म्हणाली,
"सगळा खर्च माझ्या भावाने केलाय..भलेही त्याने येताना चार पिशव्या भरून आणल्या नसतील..पण आज तुमचे प्राण मात्र परत आणले.."