Login

काय केले तुम्ही माझ्यासाठी? (भाग:-१)

मुलगा आणि सूनने बघूनही काय केले तुम्ही माझ्यासाठी विचारणाऱ्या सुमनला मुलगा नागेशने काय उत्तर दिले हे सांगणारी कथा
शीर्षक:- काय केले तुम्ही माझ्यासाठी?

भाग:- १

"आई ऽ आई गं..आ ऽ ऽ.." सुमनने विव्हळत कण्हत कुस वळवली.

"अहो आत्या, असे का करता? उठून बसण्याचा थोडं तरी प्रयत्न करा की." तिची सून सुजाता तिला उठून बसायला सांगत होती.

"मी का मुद्दाम करतेय का? मला जमत नाही त्याला मी करू?" सुमन थोडी चिडत म्हणाली.

"मी म्हणाले का तुम्ही मुद्दाम करताय म्हणून. तुमच्या चांगल्यासाठीच म्हणतेय ना मी." सुजाताला खरं तर तिच्या बोलण्याचा खूप राग आला होता. पण सुमनची प्रकृती पाहून ती शांत आवाजात म्हणाली.

"माझं भलं मला चांगलंच कळतं. तू नको सांगूस मला. तो नागा कुठे आहे बघ जरा. त्याला म्हणावं लवकर घरी ये. मला दवाखान्यात ने. नाही सहन होत आहे आता हे दुखणं मला." सुमन डोळ्यांत पाणी आणत कण्हत म्हणाली.

"हुं, विचारते ; पण तुम्ही असं भरल्या घरात पाणी गाळू‌ नका, आत्या!" सुजाता तिचा नवरा नागेशला फोन करण्यासाठी हातात मोबाईल घेत म्हणाली. तिने पाणी काढलेले तिला पटलं नाही.

"मला काय हौस आली होयं गं, पाणी गाळायला. दुखणं आलंय मला. सहन होईना तर काय करू मग." सुमन चिडचिड करत तिला म्हणाली.

यावर सुजाताने काही न बोलनच पसंत केले. एक सुस्कारा टाकत तिने नागेशला फोन केला.

"त्या देवाचा मुडदा बसवला. कुठं दडून बसलाय काय माहिती? किती देवधर्म केले पण काहीच उपयोग नाही. शेवटी तो दगडच आहे म्हणायचा." सुमनने आता मोर्चा देवाकडे वळवला. देवाच्या नावाने बोटे मोडत त्याला दुषणे देऊ लागली.

"अहो, आत्या दुखतंय म्हणून खूप रडत आहेत. आजच्या दिवशी लवकर या की. त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ." सुजाता नागेशला फोनवर म्हणाली.

"मला काय लवकर येता येणार नाही. एक काम कर तूच तिला घेऊन जा. वहिनी आहे तिला ने हवं तर. कोणत्या दवाखान्यात नेले ते मला कळवं, मी डायरेक्ट तिकडेच येतो. चल ठेवतो. मला पुढचा तास घ्यायचं आहे." नागेशने तिचे काही ऐकून न घेता तिला सांगून फोन ठेवलाही.

"हे यांच नेहमीच आहे. आता घरातलं करून यांना दवाखान्यात घेऊन जायचे. पुन्हा ॲडमिट केले की धावपळ आलीच. त्यात माझीही तब्येत ठीक नाहीये. हे कुणाला सांगू?" त्याने ठेवलेल्या फोनकडे बघत वैतागत ती मनात पुटपुटली.

तिने सुमनला सांगितले की नागेशला लवकर येता येणार नाही. 'आपण दोघी जाऊ रिक्षाने', असे तिला सांगून ती तिची जाऊ सुनिताला सांगायला गेली.

नागेश एका शाळेत मुख्याध्यापक होता. शिवाय मुलांना शिकवायचाही. त्याला एक भाऊ होता; पण त्याचे अपघाती निधन झाले होते. विधवा वहिनी व त्यांची मुलगी यांचा सांभाळही तो आणि सुजाताच करत होते. त्यात सुजाताच्याही तब्येतीच्या तक्रारीही होत्या.

सुनिता सांगेल तेवढेच काम करायची. माझा नवरा नाही तर मी का सर्वांचं करू असे तिचे मत होते. त्यामुळे सुजातालाच सर्व जबाबदाऱ्या पार पाडायला लागायच्या. मुले, नवरा, सासू या सर्वांचे तिलाच बघायला लागायचे.

सुनिताला सांगून सुजाता सुमनला दवाखान्यात घेऊन आली. डाॅक्टरांनी तपासले आणि तिला ॲडमिट व्हायला सांगितले.

क्रमशः

काय करेल आता सुजाता?