Login

केतकी (भाग १)

Loving Wrong Person Is Big Crime
" केतकी कितीवेळा सांगितले आहे तुझं काम झाल्यावर गिझर बंद करत जा." यश तिचा नवरा केतकीला रागानेच म्हणाला.

" यश, मी गिझर बंद केला होता." केतकी म्हणाली.

" म्हणजे मी खोटं बोलतोय का ?" यश खुर्चीवर बसत म्हणाला."

" यश, खरंच माझ्या लक्षात आहे. मी गिझर बंद करूनचं बाहेर आले होते." केतकी म्हणाली.

दोघांचे बोलणे बाजूला बसलेली यशची आई देवकी ऐकत होती.
ती यशच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली,

" केतकी, सकाळी सकाळी नको तू तोंडाला लागूस. तू गप्प रहा. त्याला एकतर कामाला जायचं आहे आणि दुसरी गोष्ट तुझा वेंधळेपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जरा काम करताना लक्ष देत जा. सतत मोबाईल मध्ये डोकं खूपसून असतेस. एकाग्रतेने काम केलं तर असं होत नाही पण तुझं अर्ध लक्ष एकीकडे आणि अर्ध लक्ष दुसरीकडे असं असतं. जाऊ दे सोड आता सर्व, त्याला नाश्ता दे त्याला उशीर होईलं."

केतकी पुढे काही बोललीच नाही. तिला माहीतच होतं शेवटी आई स्वतःच्या मुलाचीच बाजू घेणार.

केतकीने यशचा टिफिन पॅक केला आणि त्याला नाश्ता दिला. पहिला घास खाल्ला तसा यश पुन्हा तिच्यावर भडकला,

" काय हे केतकी ? पुन्हा पोह्यामध्ये केस. किती वेळा सांगितलं आहे तुला केस बांधून जेवण बनवत जा. काल माझ्या डब्यामध्ये पण केस मिळाला होता, सर्व ऑफिसच्या सहकाऱ्यांसमोर किती ओशाळल्यागत झाले माहित आहे का तुला? सर्वांसमोर माझं हसू झाले."

यशने पोह्याची प्लेट रागानेच सरकवली आणि म्हणाला ,

" तूच खा हे असले पोहे. तुझ्याच्याने एक काम धड होत नाही."

तो पाय आपटतच ऑफिसची बॅग घेऊन निघून गेला. केतकीला फार वाईट वाटले. सकाळपासून इतक्या मेहनतीने जेवण, नाश्ता बनवून देखील यशने असे वागावे?

यश जसा घराबाहेर पडला तसा सासूच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.
" तुझ्यामुळे माझ्या मुलाला आज उपाशीपोटी जावं लागलं आणि तुझ्यामुळेच आज त्याला बाहेरचं जेवण जेवावं लागणार. तुला किती वेळा सांगितलं आहे, जेवण बनवताना स्वच्छतेचे पालन करत जा म्हणून. किचनमध्ये येण्याआधीच तू केस का नाही बांधत ?"


" अहो आई, मी बेडरूममध्येचं माझे केस बांधले आणि मगच किचनमध्ये आले. मला खरंच माहित नाही हा केस कसा आला?"

" राहू दे, मला तू काहीच सांगू नकोस. एका कामात तुझं धड लक्ष नसतं. प्रत्येक वेळी आपल्या स्वतःच्या दुनियेत मग्न असतेस. आजकालच्या मुलींना घरातली कामचं नको. घरातली कामं करायची म्हंटली की अगदी जीवावर येते हल्लीच्या मुलींना." सासू तावातावाने म्हणाली.

केतकीला आता काय बोलावे सुचत नव्हते. सकाळपासून घरातली सगळी कामं करून देखील हे ऐकावे लागत होते.

छोट्या मोठ्या गोष्टीवरून सतत यश आणि केतकीमध्ये हल्ली वाद होऊ लागले होते. सासू वाद मिटवत तर नव्हती उलट केतकीलाच टोचून टोचून बोलत होती. तिच्या मनाला लागेल असंच काहीतरी बोलून मोकळी होत होती.

केतकीचे डोळे भरून आले होते. ती सासूला काहीच बोलली नाही, कारण तिला माहित होतं काहीही बोललं तरी सासू काही तिचं एकही ऐकणार नाही उलट तिलाच दोषी ठरवणार, त्यामुळे ती बेडरूममध्ये निघून गेली.


आज केतकीला आई, बाबा आणि तिची छोटी बहीण नंदा या तिघांची खूप आठवण येत होती.

'आपल्यावर आपले आईबाबा किती प्रेम करत होते, प्रत्येक गोष्ट मागण्या आधीच मिळायची.'

किती सुखात होती आणि आज आई, बाबा दोघांशी बोलायची खूप इच्छा होत असूनही बोलू शकत नाही याची तिला खूप खंत वाटत होती.


मोबाईल मधील आई-बाबा आणि नंदा यांचा फोटो बघून तिला एकाएकी खूप रडावेसे वाटत होते. असं वाटत होतं, आत्ताच्या आत्ता जाऊन आईला मिठी मारावी. माहेरच्या प्रेमासाठी ती जणू तडफडत होती.


आईने तसाच प्रेमाचा हात डोक्यावर ठेवावा जसा आधी ठेवायची. तिला जराही त्रास झाला तरी आधी आईच आठवायची. आईच्या प्रेमाची फुंकर तिचा त्रास क्षणात नाहीसा करायची. त्या प्रेमाची, मायेच्या स्पर्शाची तिला नितांत गरज होती. आलेलं रितेपण फक्त आणि फक्त माहेरच भरून काढणार होते. केतकी माहेरापासून का दुरावली होती?

पाहूया पुढील भागात.........