Login

केतकी (भाग २)

Fall In Love With Wrong Person Is Big Crime

गेल्या भागात आपण पाहिले की, केतकी आणि तिचा नवरा यश दोघांमध्ये वाद होत होते आणि तिची सासू भांडण मिटवण्याऐवजी केतकीला बोल लावत होती. केतकीला तिच्या आई बाबांची आठवण येत असून देखील ती त्यांना भेटू शकत नव्हती.

आता पाहू पुढे.

केतकीने विचार केला आईला भेटू शकत नाही पण कमीत कमी बोलू तरी शकते. फार वेळ विचार करून तिने आईला फोन लावला.

आईला फोन लावायला जाणार तोच तिने फोन कट केला. एक अशी गोष्ट आठवली, ज्यामुळे तिने हातातील मोबाईल बाजूला ठेवून दिला. हात थरथर करू लागले.

तिला बाबांचे शब्द आठवले. तिला रडू कोसळले.

बाबांचा असा रुद्र अवतार तिने कधीच पाहिला नव्हता. आज तेच रूप तिला पुन्हा आठवले. काळजात कोणीतरी धारधार शस्त्र खुपसत आहे असेच जाणवले. बाबांचा तो आवाज पुन्हा तिच्या कानात घुमू लागला.

" खबरदार ! पुन्हा फोन केलास तर. आमचं मेलेलं तोंड पाहशील. आजपासून तू आमच्यासाठी मेली आहेस. मला एकच मुलगी आहे नंदा. तुला मी ओळखत नाही."

आजही ती वाक्यं केतकीला जशीच्या तशी आठवत होती. फोनवर आईचा रडण्याचा आवाज येत होता शेवटी ती आईच होती. काहीही झाले तरी मातृत्वाची नाळ तुटता तुटत नाही हे तिच्या आईचे हुंदके स्पष्टपणे ग्वाही देत होते.

तिने "प्रेमविवाह" करून खूप मोठा अपराध केला होता का? हा प्रश्न तिला आजही सतावत होता. आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर करणारी गोष्ट अपराधचं असतो ही गोष्ट मनात पक्की घर करून बसली होती.


" बाबा, मला माफ करा." हे तिचे वाक्य बाबांनी ऐकण्याआधीच फोन कट केला होता. ज्या लाडक्या लेकीवर बाबा जीवापाड प्रेम करायचे, तिला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपायचे त्याचं लेकीशी बाबांनी कायमचे संबंध तोडून टाकले होते."

जुन्या वेदनादायी आठवणी तिला वेदनाच देणार हे माहीत असून देखील ती त्यात रमली होती. प्रेम करणाऱ्या माणसांनी दिलेलं दुःख कुरवाळत बसण्यात एक वेगळं सुख ती जणू अनुभवत होती. तिचे आईबाबा तिच्या आयुष्याचा भाग नाही; पण आठवणींचा भाग होते हेचं काय तिचे सुख.


डोळ्यांतील दुःखद अश्रू एकाएकी आनंदाश्रुमध्ये परावर्तीत झाले.

तिने फोन हातात घेतला. बाबांचा फोटो शोधून काढला . जो एका रेस्टॉरंटमध्ये काढला होता. तिचे बाबा आणि ती.

बाबांच्या फोटोवर हात फिरवला.
बाबांशी बोलू लागली.

" बाबा, हा फोटो माझ्यासाठी खूप खास आहे .
तुम्हाला आठवतंय बाबा? आईने मला नावडता नाश्ता बनवला होता म्हणून तुम्ही आम्हाला सगळ्यांना दुपारच्या जेवणासाठी माझ्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला होता आणि म्हणाला होता पिहू, तुला काय हवं ते ऑर्डर कर. हा त्याच रेस्टॉरंटमधला फोटो आहे बाबा.

बाबा, मला नाश्ता आवडला नाही म्हणून तुम्ही मला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला होता आणि आज तुमची पिहू ह्या आयुष्यालाच कंटाळली आहे, बाबा मला कुठेतरी घेऊन चला. बाबा, तुमची मला खूप गरज आहे. खूप एकटं एकटं वाटतंय.


तोच देवकी तिच्या बेडरूमचा दरवाजा वाजवत म्हणाली,

"केतकी, दुपारच्या जेवणाचे बघ. काय आराम करायचा तो नंतर करत बस. महाराणी कामाच्या वेळेला निवांत जाऊन बेडरुममध्ये बसली आहे."

केतकीने डोळे पुसले. बाथरूममध्ये जाऊन चेहऱ्यावर सपासप पाणी मारले. रडून रडून डोळे सुजले होते. लाल झाले होते. त्याची पर्वा कोणालाही नव्हती. अशीही तिला ह्या गोष्टीची सवय झाली होती. सवय झाली असली तरीदेखील, स्वीकार करणं जड झालं होतं. मुळात भावुक असणारी केतकी प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेत होती.

यशचा फोन आला. आतापर्यंत रडणारी केतकी लगेच खुश झाली. आई,बाबानंतर तिने जीवापाड प्रेम केलं होतं तर यशवर. त्याचा फोन येण्यानेच तिला बळ आलं. मनावरचं ओझं दूर झालं. आता आयुष्यात यशचं तिचं सर्वस्व झाला होता.

तिच्या मनाला तिने समजावलं,
'आला असेल राग यशला, जेवणात केस निघाला तर मलाही राग येणारचं .'

तिने पटकन फोन उचलला.