Login

केतकी (भाग ३)

Fall In Love With Wrong Person Is Big Crime
गेल्या भागात आपण पाहिले की, केतकीने प्रेमविवाह केला होता म्हणून तिच्या आई बाबांनी तिच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. ती जुन्या आठवणीत रमते. तिला यशचा फोन येतो. ती खुश होते. आता पाहू पुढे.

केतकी यशचा फोन उचलते.

" सॉरी डार्लिंग, मी असे सकाळी वागायला नको होते. खरंच सॉरी. माफ कर मला."

हे ऐकताच केतकी रडायला लागते.

" केतकी, सॉरी म्हणालो ना? माफ कर प्लिज. तू अशी रडणार असशील तर मी समजेन तू मला माफ केले नाहीस." यश लाडिकपणे बोलत होता.

इथे केतकी स्वतःचे डोळे पुसत म्हणाली,
" यश, तुझ्याशिवाय माझं आहे तरी कोण? तुझा आवाज ऐकला आणि मन भरून आले."

"बरं, म्हणजे तू मला माफ केलंस?" यश.

"उलट मीचं तुझी माफी मागते. माझंच चुकलं. पुढच्यावेळी मी जेवण बनवताना काळजी घेईन." केतकी.

" मी किती नशीबवान आहे. देवाने मला इतकी समजूतदार बायको दिली आहे. लव्ह यू बायको. बरं आज मी लवकर घरी येईन, आपण बाहेर जेवायला जाऊयात आणि त्यांनतर मस्त मुव्ही पाहूयात." यश म्हणाला.

" हो चालेल." केतकी म्हणाली.

" चल आता फोन ठेवतो, खूप काम आहे." यश म्हणाला.

यशसोबत बोलणं झाल्यावर केतकी खूप खुश झाली. तिने दुपारची कामं पटापट आवरली.

संध्याकाळी यश लवकरच घरी आला होता. त्याने आल्याआल्या देवकीला ते दोघे बाहेर जात असल्याचे सांगितले.

हे ऐकताच देवकीचा चेहरा उतरला होता. आता नाही तर म्हणू शकत नाही. म्हणून ती यशला म्हणाली,

" तुझ्या बायकोला माझं रात्रीचे जेवण बनवून जायला सांग."

असंही केतकीने तिचे जेवण बनवले होते. यश आणि केतकीची नजरा नजर झाली. तिने देवकीचे जेवण बनवले आहे हे डोळ्यांनेच इशारा करून सांगितले.

" आई, तिने जेवण बनवले आहे." यश.

" बरं ठीक आहे. लवकर या जास्त उशीर करू नका." देवकी नाखुषीनेच म्हणाली.

यश आणि केतकी दोघेही फिरायला बाहेर पडले. केतकीने, यशने तिला वाढदिवसाला गिफ्ट केलेली साडी नेसली होती. नाजूक डिजाईन असलेली लाल रंगाची साडी तिच्यावर खुलून दिसत होती. तिने त्यावर साजेसा मेकअप केला होता. कानात डायमंडचे कानातले घातले होते. तिचे रेशमी सोडलेले काळेभोर केस, चेहऱ्यावर आलेली बट तिचे सौंदर्य कैकपटीने खुलवत होती.

यश तर तिच्याकडे एकटक पहात होता.
हॉटेलमध्ये पोहोचल्यावर त्याने केतकीच्या आवडीचे पदार्थ मागवले होते. केतकीला खूप बरं वाटत होते. यशचा सहवास, त्याचे प्रेम बस इतकंच पुरेसं होतं तिच्या आनंदासाठी.

जेवण झाल्यावर दोघेही मुव्ही बघायला गेले.
एकमेकांचा सहवास दोघांना सुखावत होता.

घरी जायची वेळ झाली तेव्हा केतकीचा चेहरा पडला होता.

" केतकी, काय झाले अचानक तुझा चेहरा उतरला." यश तिच्या चेहऱ्यावर आलेली बट अलगद सारत म्हणाला.

" यश,आज मला आईबाबांची खूप आठवण आली. तू सकाळी रागाने निघून गेलास. मला खूप एकटं एकटं वाटत होतं. यश मी तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या आई बाबांना सोडून आले आहे. जेव्हा तू असा राग राग करतो तेव्हा मला फार त्रास होतो. असं वाटतं माझं ह्या जगात कोणीच नाही. मला खूप एकटं वाटतं .त्यात आईंना मी आवडत नाही. पाहिलेस ना निघताना कशा म्हणाल्या तुझ्या बायकोला जेवण बनवायला सांग. त्या माझं नाव घेऊन बोलू शकत होत्या ना? तू देखील प्रेमविवाह केला आहे . मुलगा म्हणून त्यांनी तुला माफ केले मग माझ्याशी असे विक्षिप्तपणे किती दिवस वागणार?"

केतकीने यशचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली,

" यश,सारं जग माझ्याशी कसेही वागू देत पण प्लिज तू नको असा वागू. तू असा वागतो तेव्हा मी आतून खूप तुटून जाते रे. प्लिज यश असं नको वागू. काही महिनेचं झाले आहेत आपल्या लग्नाला. आपल्यात वाद होतात अगदी क्षुल्लक गोष्टीवरून ह्याचा मला खूप त्रास होतो आहे. असं वाटतं आपलं नातं तुटून तर जाणार नाही ना. मला काळजी वाटते. मला आपलं नातं भक्कम हवे आहे अगदी शेवटपर्यंत."


यश केतकीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला,

" केतकी, आपलं नातं असंच राहणारं. तू काळजी करू नकोस. तू खूप विचार करते आहेस. सगळं काही ठीक आहे. तुला तर माहीत आहे माझ्या बाबानंतर माझी आईच माझं सर्वस्व आहे. तू तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. तिला तू दुखावू नकोस. तिचं बोलणं मनाला नको लावून घेऊस. मला तुझा आनंद महत्वाचा आहे. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो."

केतकी, यशला घट्ट मिठी मारत म्हणाली,
"यश, असं वाटतं हा क्षण इथेच थांबावा. तुझा सहवास असला की खूप शांत वाटतं."

"केतकी, मी तर नेहमीच तुझ्यासोबत आहे."
तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला.

दुसऱ्या दिवशी केतकीने यशला आवडतो म्हणून डोसा बनवला होता. त्याने पोटभरून नाश्ता केला. केतकी आणि देवकी नाश्ता करायला बसल्या.

तोचं यश बाहेर आला आणि त्याने केतकीच्या जोरात कानाखाली मारली.

यशने इतक्या जोरात कानाखाली मारली की तिच्या गालावर पाचही बोटं उमटली.