गेल्या भागात आपण पाहिले की, यश केतकीला कानाखाली मारून निघून जातो. यश निघून गेल्यावर ती देखील घराबाहेर पडते. पावलं जिथे जातील तिथे चालत जाते. बाकड्यावर बसून ती डोळे बंद करून रडत असते. कोणीतरी तिचा पाय घट्ट पकडतं. तिचे डोळे चमकतात. आता पाहू पुढे.
केतकीला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तिचे पाय घट्ट पकडून बसलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिचे बाबा होते.
ती स्वतःला चिमटा काढते. हे स्वप्न तर नाही ना ? नाही हे स्वप्न नसते. तिचे बाबाचं होते. तिचा कंठ दाटून येतो. ती डोळे भरून बाबाला बघू लागते. बाबाही तिला किती तरी महिन्याने पाहत होते. ती बाबांना घट्ट बिलगते.
" बाबा, मला माफ करा." रडावलेल्या सुरात केतकी म्हणाली.
तोच पाठून खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. ती मागे वळून बघते तर आई होती. आई लेकी एकमेकींना बिलगून रडू लागतात.
केतकीला अजूनही ती स्वप्न पाहत असल्याचा भास होत होता.
बाबांचा चेहरा खूप उतरला होता. वजनही खूप कमी झाले होते. डोळे अगदी खोल गेले होते. बाबा ओळखूच येत नव्हते.
आईने तिला सांगितले की, ती गेल्यापासून बाबा धड जेवत नव्हते. नेहमी उदास राहू लागले होते. एकही दिवस असा नव्हता की, केतकीची आठवण येत नव्हती. वरवर कठोर वागणारे, राग दाखवणारे बाबा स्वतः आतून कोलमडून गेले होते. तिला बाबांचा चेहरा बघवत नव्हता.
" बेटा,कशी आहेस?" तिच्या डोक्यावर बाबांनी हात ठेवून विचारले.
" बाबा,मी बरी आहे. तुम्ही कसे आहात?" केतकी म्हणाली.
" माझी लेक दुःखात असतांना मी सुखी असेन का?" बाबा डोळयांतील पाणी पुसतचं म्हणाले.
" बाबा, मी खुश आहे. यश खूप प्रेम करतो." डोळयांतील अश्रू पुसत आणि चेहऱ्यावर खोटे हसू आणून ती म्हणाली.
" केतकी, पुरे आता आणि तुझ्या गालाला काय झाले? त्यांनी निरखून पाहिले . बोटांच्या खुणा दिसत होत्या.
ज्या लेकीला इतकं जपलं त्या लेकीचा असा चेहरा बघून त्यांना फार राग आला.
" कोणी केलं हे?" बाबा चवताळून म्हणाले.
" बाबा, काही नाही मी पाय घसरून पडले तेव्हा लागलं." केतकी नजर चोरत म्हणाली.
" केतकी, खोटं बोलू नकोस. बाबा आहे मी तुझा. तू नजर चोरून बोलते आहेस, नक्कीच तू खोटं बोलते आहेस. माझ्या डोळ्यांत डोळे घालून बोल." बाबा बोलले.
केतकीचे डबडबलेले डोळे खूप काही सांगत होते.
" त्याची हिंमत कशी झाली तुझ्यावर हात उचलायची. आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत तू घरी चल. ह्यापुढे अजिबात त्रास सहन करायचा नाही." बाबा तिचा हात घट्ट धरत म्हणाले.
" बाबा, नाही मी नाही येऊ शकत. मी यशसोबत लग्न केले आहे. त्याच्यासोबत सात जन्म निभवायचे वचन घेतले आहे." केतकी व्याकुळ होऊन म्हणाली.
" केतकी, तू लग्न मनापासून निभावते आहेस पण तो निभावत नाही त्याचे काय?" बाबा चवताळून म्हणाले.
" बाबा, पहिल्यांदाच असे त्याने केले. पुन्हा नाही करणार." ती यशची बाजू सावरत म्हणाली.
" हा मार सहन करशील पण अविश्वासाचा मार सहन करशील?" बाबा कोड्यात बोलले.
" म्हणजे?" केतकी म्हणाली.
" केतकी, यश बाबतीत एक गोष्ट आम्हाला समजली आहे."
त्यांनी फोन काढला आणि यश आणि एका दुसऱ्या मुलीसोबतचे नको तसले फोटो तिला दाखवले.
केतकीच्या तर पायाखालची जमीन सरकली. ती मटकन खाली बसली.
बाबा पुढे बोलू लागले,
" केतकी, ही मुलगी नंदाच्या मैत्रिणीच्या नात्यातली आहे. नंदा एक दिवस तिच्या मैत्रिणीच्या घरी कार्यक्रमाला गेली तेव्हा तिने यशला हिच्यासोबत पाहिले. तिला त्या दोघांच्या वागण्यावरून शंका आली. तिने मैत्रिणीला विचारल्यावर तिने सांगितले की, हे दोघे थोड्या दिवसातच लग्न करणार आहे. नंदाने पुरावे गोळा केले. तेव्हाच मला तुझी काळजी वाटू लागली. म्हणून मी आज तुला घ्यायला आलो.
बाबा पुढे म्हणाले,
" केतकी, तू मनाने लग्न केले ह्याचा मला खूप राग आला होता. त्या क्षणाला वाटेल तसं मी बोललो पण तुझ्याशिवाय एकही दिवस सुखाचा गेला नाही. रोज तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. मला माफ कर केतकी. मी तुझ्याशी फार कठोर वागलो "
बाबांच्या डोळ्यांत अपराधीपणाचे भाव स्पष्टपणे दिसत होते.
तिला कानात कोणीतरी गरम तेल ओतते आहे असे झाले. किती हा अविश्वास? यशवर खरं प्रेम केल्याच्या बदल्यात हे सारं मिळालं ?
" बाबा, माफी तर मला मागायला हवी. तुम्ही मला लहानाचे मोठे केले , शिक्षण दिले, प्रेम दिले, माया दिली, काय हवं नको ते सारं दिले आणि मी मात्र ह्या खोट्या प्रेमामध्ये वाहून तुम्हालाच दुःख दिले." ती हात जोडून म्हणाली.
ती पुढे बोलू लागली.
" बाबा, खरंतर जे माझ्यासोबत झालं त्याला मीच जबाबदार आहे. मी प्रेम केलं ते आंधळेपणाने. हे वयच असे असते ना बाबा ? काही कळतंच नाही. एका वेगळ्या दुनियेत वावरत होते. प्रेमाच्या मायाजाळात फसले. प्रेम करणं खरं तर गुन्हा नाही, चुकीच्या माणसावर खरं प्रेम करणं हा खूप मोठा गुन्हा आहे."
बाबा,आई मला माफ करा." असे म्हणत ती ढसाढसा रडली.
केतकीचा फोन वाजला.
यशचा फोन होता.
त्याचा फोन उचलायची अजिबात इच्छा नव्हती पण तरीही तिने उचलला. शेवटचं संभाषण करण्यासाठी.
तेथून यश बोलू लागला.
" केतकी, डिअर मला माफ कर.मी असे वागायला नको होते."
" यश, हे आपलं शेवटचं बोलणं आहे. ह्यापुढे तुझे तोंड दाखवू नकोस. खरं प्रेम केल्याची खूप छान भेट दिलीस रे." खूपच रागाने म्हणाली.
" बायको, प्लिज सोड ना राग." यश म्हणाला.
" पुन्हा मला बायको म्हणालास तर याद राख, जीभ हासडून हातात देईन. तुझा माझा संबंध कायमचा संपला आहे. आता तुझी ही सारी नाटकं बंद कर. माझ्यापुढे खोटा मुखवटा घेऊन वावरत होतास. प्रेम तर उरलंच नव्हतं, वरून प्रेम असल्याची नाटके करत होतास."
" केतकी,इतकं काय झालं?..." यश.
त्याचे बोलणं अर्धवट होतं तोवर ती म्हणाली,
" काय झालं ? किती साळसूदपणाचा आव आणतोस रे. थांब, मी सांगते तुला काय झाले?"
तिने यशचे आणि त्या मुलीचे फोटो त्याला पाठवले.
" बघ, तुझ्या फोनमध्ये काय झालं ते."
यशने ते फोटो पाहिले. त्याला खूप घाम आला.
" केतकी, मला कोणीतरी फसवत आहे, मला माहीत नाही ही मुलगी कोण आहे?" यश.
" यश,पुरे आता हा ढोंग. कोणीतरी फसवत नाही. तू फसवत आहेस मला. असं करतांना जराही लाज वाटली नाही. किती प्रेम केले मी आणि तू शी!
यश, तुला मी सर्वस्व मानलं आणि तू माझं सर्वस्व हिरावून घेतलंस. लाज वाटते मला माझी, तुझ्यासारख्या मुलावर मी डोळे झाकून प्रेम केले, विश्वास ठेवला. तुला ह्या नको असलेल्या नात्यातून मी लवकरच मुक्त करणार आहे."
असे बोलून तिने फोन कट केला. त्याचा नंबरही ब्लॉक केला.
आई बाबा सोबत ती माहेरी निघून गेली.
तिने यशला सोडचिठ्ठी दिली.
यशने दिलेले घाव भरायला वेळ लागला पण आई ,बाबा आणि नंदा ह्यांच्या साथीने, प्रेमामुळे तिच्यात पुन्हा आत्मविश्वास आला.
एका मोठ्या कंपनीत ती कामाला लागली. पुन्हा नव्याने आयुष्याला सुरवात केली.
तिला इतकंच माहीत होतं, यश तिच्या आयुष्याच्या पुस्तकातलं एक नको असलेलं फक्त पान होतं. पुस्तक नव्हतं. त्या पानावर तिला अडकून राहायचे नव्हते. पुढे येणारे सुख तिला वेचायचे होते. ती तिच्या आयुष्यात सुखाची, आनंदाची पानं वाचण्यात मग्न झाली होती. तिने भूतकाळ केव्हाच पाठी सोडून पुढे उंच भरारी घेतली होती आणि भक्कम साथ होती तिच्यावर खरं प्रेम करणाऱ्या माणसांची.
खरंय ना? परिस्थिती कितीही बिकट असो. आयुष्यात कितीही वाईट काळ येवोत पण आपल्या माणसांची आपल्याला साथ असली, खंबीर आधार असला की, त्या वाईट परिस्थितीशी दोन हात करण्याचे बळ वाढते.
समाप्त.
©® अश्विनी ओगले.
कशी वाटली केतकीची कथा नक्की कंमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास लाईक, शेअर जरूर करा. मला फॉलो करायला विसरु नका. धन्यवाद.
कशी वाटली केतकीची कथा नक्की कंमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास लाईक, शेअर जरूर करा. मला फॉलो करायला विसरु नका. धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा